सरस्वती- विपर्यास


सरस्वती नदीच्या अस्तित्वाचे विविध उल्लेख, संशोधकांचे सरस्वतीचा जलमार्ग शोधायचे प्रयत्न आणि त्यायोगे नवीन मांडले गेलेले पुरावे आणि गृहीतके असा बराच गोपाळकाला आपण आधीच्या भागामंध्ये बघितला.

ब्रिटिश काळा पूर्वी, सरस्वती अस्तित्वात नव्हतीच पण अशी नदी नक्की होती ही लोकमानसाची ठाम धारणा होती. इंग्रजांच्या भारताविषयीच्या कुतुहलामुळे  म्हणा किंवा त्यांच्या राजकीय मजबूरीमुळे  म्हणा, पण त्यांनी ह्या देशाचा भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अभ्यास करायचा प्रारंभ केला आणि तशा सर्वंकष अभ्यासाचा पायंडाच पडला.  त्यांनाही सरस्वती नदी लुप्त झालेली जुन्या ग्रंथामधून समजली आणि ती कुठली असावी याचे आडाखे त्यांनीही बांधले. बऱ्याच पुरातत्त्व संशोधकांच्या मते घग्गर-हाक्रा-नारा हाच पुरातन सरस्वती नदीचा प्रवाह मार्ग असावा. त्याचे विविध कंगोरे आपण यापूर्वीच्या लेखांका मध्ये बघितले.

पण तरीही काही अभ्यासकांना घग्गर ही  सरस्वती असू शकत नाही असे वाटते. अगदी १८०० मध्ये रुडॉल्फ फॉन रूथ  ह्या भाषा तज्ज्ञांच्या मते सरस्वती नदी भारतामधून वाहत नव्हती.

त्यांच्या मते, घग्गर ही डोंगर-दऱ्या तून वाहणारी  नदी नाही तसेच तिला  सर्वकाळ पाणी पुरवठा करणारी हिमनदी उगमाशी नाही   सतलज घग्गर ला मिळाली तरी त्या संगमानंतर फार तर घग्गर(सरस्वतीला) भरपूर पाण्याची नदी म्हणता येईल . पण जिथे सरस्वती नदी वरची तीर्थे आहेत जसे की स्थानेश्वर तिथे तिला तरीही फारसे पाणी, वैदिक काळामध्ये पण असू शकत नाही. काही शास्त्रज्ञांच्या मते एखादी मोठी नदी जरी या भूभागामध्ये वाहत असली तरी तो  कालखंड ८-१० हजार वर्षे जुना असावा. त्यामुळे ती  सध्या प्रमाणित असलेल्या वेदकाला पूर्वी वाहत असावी.  त्यामुळे पुन्हा घग्गरला सरस्वती म्हणणे  योग्य नाही असे मत मांडले आहे.

सरस्वती अशी  हिमालयापासून समुद्रापर्यंत वाहणारी मोठी नदी अगदी वैदिक काळामध्ये पण हरियाणा राजस्थान मध्ये नव्हतीच असेही  काही जणांचे म्हणणे आहे. 

पण मग  सरस्वती आहे कुठे त्यांच्या मते ?


 सध्याची क्षीण सरसुती ही वैदिक सरस्वतीच्या वर्णनांशी अजिबातच मिळती जुळती नाही हे सत्य आहे. त्यामुळेच  'ती नदीतमा, अंबितमा अशी  मोठी नदी' भारताबाहेर असली पाहिजे. किंवा ती सिंधू, सतलुज किंवा यमुना यापैकी कोणीतरी असावी असे मत मांडले गेले. भारताबाहेर सरस्वती ला शोधण्यामागे आर्य प्रश्नाची पार्श्वभूमी आहे. वैदिक आर्य भारतामध्ये इराण -अफगाणिस्तान मार्गे आले आणि नंतर पंजाब प्रांतामध्ये त्यांनी वसती केली असा सिद्धांत गृहीत धरून सरस्वती भारताबाहेर शोधण्याचे प्रयत्न काही अभ्यासकांनी केले.

अगदी सुरुवातीला  १८८६ मध्ये थॉमस ई याने सरस्वती म्हणजे अफगाणिस्तानमधली हेल्मन्ड नदी असावी असे मत मांडले. त्याचे कारण ऋग्वेदाच्या त्यांच्या वाचना प्रमाणे सरस्वती समुद्रास मिळते असा उल्लेख असला तरी वैदिक लोकांना समुद्र माहित नसावा त्यामुळे त्यांनी मोठ्या तलावाला समुद्र मानले असावे असे मानले गेले.    अफगाणिस्तान मधील हेल्मन्ड हे नदी डोंगरी दऱ्या -खोऱ्या मधून वाहून एका तळ्यामध्ये विलीन होते. तिथून प्रवास करून आलेल्या  वैदिक आर्यांनी  भारतात  आल्यावर पूर्वीच्या आठवणी जतन करण्यासाठी हरियाणा मधल्या सरसुती ला  वैदिक सरस्वतीची आठवण म्हणून नाव दिले असावे असा पुढील निष्कर्ष काढला गेला आहे.

अवेस्ता या पुराण्या इराणी धर्मग्रंथांमध्ये हेल्मन्ड च्या एका उपनदीचे नाव हरैहवती (सध्याची अर्घनदाब ) असे आहे.. सिंधू चे जसे हिंदू झाले तसे हरैहवती म्हणजे खरे तर सरस्वती असावी असा ह्या अभ्यासकांचा दावा आहे..

सरस्वती ला भारताबाहेर शोधताना, वैदिक साहित्यातील सरस्वती नदीचा प्रदेश, इतर नद्यांची नावे, त्यांचे भौगिलिक स्थान हे हे काही अफगाणिस्तान व इराण यांच्या भूभागाशी  जुळत नाही हे तर उघड आहे. तसेच बाहेरून येऊन स्मृती जतन  करायला सरस्वतीचे नाव इतक्या किरकोळ नदीला कशाला दिले, गंगेचेच  नाव सरस्वती का नाही ठेवले, हा प्रश्न आहेच. सिंधू म्हणजेच सरस्वती असेल तर वैदिक साहित्यामध्ये त्यांना दोन वेगळ्या नद्या म्हणाले आहे त्याचे काय? हे असे अनेक अनुत्तरित प्रश्न अनेकांना भारताबाहेरील सरस्वती ह्या अनुमानाने पडले आहेत. भाषाशास्त्र वापरून येन केन प्रकारे सरस्वतीला भारतामध्ये वाहू द्यायचे नाही असा अट्टाहास ह्या  तर्काच्या डोलाऱ्यामध्ये  दिसतो

 

भारतीय उपखंडामध्ये सरस्वतीचे अस्तित्व नाकारण्याचे प्रयत्न करणारे प्रमुख इतिहासकार म्हणजे राजेश कोचर, इरफान हबीब , रोमिला थापर. 

 राजेश कोचर यांनी हेल्मन्ड ही सरस्वती असावी असे ठोस प्रतिपादन केले आहे. त्याच्या पुढे  जाऊन गंगा व यमुना ह्या पण हेल्मन्ड च्या उपनद्या होत्या असेही त्यांचे मत आहे. मग  आर्य भारतामध्ये आल्यावर त्यांनी इथल्या नद्यांना जुनी आठवणीतली नावे दिली असा दावा केला आहे. 

इरफान हबीब ह्या मार्क्सवादी इतिहासकारांच्या मताप्रमाणे सरस्वती चे हिमालयापासून  समुद्रापर्यंत अस्तित्व मान्य करणे हा रा.स्व  संघाचा कावा आहे. हबीब याना अशी भीती वाटते आहे कि सरस्वतीचे अस्तित्व मान्य करून हरप्पा संस्कृतीचे नाव सरस्वती संस्कृती करणे हेच ह्या काव्यामागचे  एकमेव उद्दिष्ट्य आहे. त्यांच्या मते रुडॉल्फ फॉन रूथ आणि झिमर ह्या एकोणिसाव्या शतकातल्या  भाषा तज्ज्ञांचे मत आजही अधिक ग्राह्य आहे . तसेच भौगोलिक पुराव्यासाठी १९८४-८८ मध्ये केलेल्या मेरी अग्नेस ह्याच्या संशोधनानुसार भारताच्या पंजाब राजस्थान वगैरे सरस्वती च्या भूभागामध्ये कोणतीहि हिमालयीन नदी  वाहत नव्हती हा  एकमेव निष्कर्ष सर्वोच्च आहे. ह्या इतिहासकारांचे सरस्वती ला नाकारणारे आणि त्यामागचे इतरांचे 'केशरी' कावे रयतेला समजावून सांगणारे लेख नित्यनेमाने हिंदू, टेलिग्राफ वगैरे दैनिक मध्ये प्रसृत होत असतात. अर्थातच इरफान हबीब यांनी बाकीचे सर्व संशोधक आणि त्यांचे पुरावे ह्यांच्या कडे पूर्ण कानाडोळा  केला आहे हे खरे सत्य आहे.

अजूनही राजस्थान अथवा हरीयाना सरकारच्या सरस्वती पुनरुत्थान  प्रकल्पाकडे  बघताना, त्याचे विवेचन करताना त्याविषयीचा  आपला पूर्वग्रह बाजूला  ठेवून, हेटाळणी चा सूर टाळून लिहिणे हे अनेक मान्यताप्राप्त पत्रकार आणि लेखकांना  जमलेले नाही. हा  सारा सरस्वती व त्याबरोबरच वैदिक रचनांची जन्मभूमी भारताबाहेर शोधण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी पुरावे आणि संशोधनाचे यथेच्छ 'चेरी पिकिंग करून मानवतील ते पुरावे आणि पटतील ते निष्कर्ष फक्त निवडून, एक समूहमत तयार करण्याचा प्रयत्न जारी  आहे.

ह्या सर्व सरस्वती नाकारणाऱ्या अभ्यासकांनी नदी सूक्तांमधील भौगोलिक संदर्भ  किंवा इतर भूगर्भीय अभ्यासा तील सिध्दान्त, घग्गर च्या काठावरील  सिंधू संस्कृतीची  असंख्य ठिकाणे,  भारतीय साहित्यातील सरस्वतीचे  तिच्या वरच्या तीर्थांचे अनेक भौगोलिक उल्लेख. , ह्या सगळ्या गोष्टीकडे बघूनही  आपले निष्कर्ष सुधारण्याची तसदी घेतलेली नाही. गेल्या काही वर्षांमधील सापडलेले राजस्थानमधील   पुरा-प्रवाहांचे जाळे, सरस्वतीच्या उगमाजवळील घडामोडींचे शास्त्रीय अर्थ सांगणारी संशोधने, सुरवातीचा प्रवाह आखताना मिळालेल्या पात्रातील आणि पात्राच्या आजूबाजूच्या असंख्य भौगोलिक, सांस्कृतिक खुणा ह्या सगळ्या गोष्टींकडे  दुर्लक्ष करून,  त्यावरील टिकेला उत्तर देण्याचीही जबाबदारी न घेता सरस्वती नदी विषयीचे आपले मत रेटून पुढे नेण्यात ह्या सर्व इतिहासकारांनी  यश मिळवले  आहे.

वैदिक आर्य अफगाणिस्तानातून  आले अशा गृहीतकांवर आधारलेले निष्कर्ष , काही इतिहासकार-संशोधक, त्याला  छेद देणारे पुरावे मिळाल्यावरही,   आपले जुने मत त्याच हिरीरीने मांडतात त्यावरून त्यांना नवीन शोध पटत नाहीत आणि म्हणून  ते त्याचा विचार करत नाहीत असेच म्हणावे लागेल. ज्यांना बुद्धिजीवी वगैरे मानले त्यांची  ही शोकांतिका आहे.

जी सरस्वती सतलज  आणि यमुनेच्या मध्ये वेदांमध्ये मानली   गेली आहे. तिला  वेदांच्याच आधारे , भारताबाहेर हुसकावून लावून या विशेष अभ्यासकांनी सरस्वतीचा विपर्यास च आपल्यासमोर मांडला आहे.

 

काही संदर्भ

https://www.webpages.uidaho.edu/ngier/306/contrasarav.htm

The Lost river – Michel Danino

http://sarasvatiriver.blogspot.com/2015/07/saraswatiinafghanistan.html

नकाशा आंतरजालावरून वरून साभार

भाग -


Part 3

Part 2

Part 1

Comments