सरस्वती – संशोधन

IVC sites

ब्रिटीश कालखंडाच्या सुरुवातीस जेम्स रेनेल ह्या ब्रिटिश भूगोलतज्ज्ञाने १७८८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये ('A Memoir of the Map of Hindoostan) सिंधू नदीच्या पूर्वेस, हिमालयापासून अरबी समुद्रापर्यंत जाणारी एक नदी 'घग्गर व सरसुती यांची एकत्रित धारा' या नावाने दाखवली आहे. ही नदी सरस्वती असावी असे मत फ्रेंच भूगोलतज्ज्ञ विव सॉ मारतॉ याने १८५८-६० च्या सुमारास मांडले.
ब्रिटीश राजवटीतील एक सर्जन-जनरल सी एफ ओल्डहम यांना सध्याच्या हरियाना मधून आणि पूर्वीच्या पंजाबा तून जात असताना वाटेत एका नदीचे प्रचंड मोठे पात्र लागले. पण त्यातून वाहणारी नदी मात्र अगदीच मामुली होती. त्या नदीच्या पात्राची थोडी पाहणी केल्यावर इथून पूर्वी कधीतरी भरपूर पाणी असलेली नदी वाहत असली पाहिजे असा अंदाज केला गेला. ही किरकोळ नदी म्हणजे सध्याची घग्गर. हिचा उगम शिवालिक टेकड्यांमध्ये होतो आणि ही पुढे जाऊन कधी थर मरुभूमीच्या वाळू मध्ये गुडूप होते तर कधी पुढे पाकिस्तान मध्ये वाहिलीच तर नारा या नावाने ओळखली जाते.
ओल्डहम यानी या नदीचे ‘मूळ’ शोधायचा प्रयत्न केला. १८७४ मध्ये निनावी तर पुढे १८९३ मध्ये स्वत:च्या नावे प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधामध्ये, कधी काळी वाहत असलेली सरस्वती नदी ह्या घग्गरच्या पात्रामधून वहात असावी असा निष्कर्ष, इतर अनेक पुरावे आणि संदर्भासहित दिला गेला. सध्या बियासला मिळणारी सतलज ही पूर्वी सरस्वतीची उपनदी होती, आणि तिचे पात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे हळू हळू सरकले हे त्यांनी सध्याची सरस्वती (आदि-बद्री जवळ) ते सतलज यांच्यामधल्या अनेक छोट्यामोठ्या कोरड्या पडलेल्या पात्रांच्या आधारे सिद्ध केले. त्याच वेळी यमुना सुद्धा सरस्वतीला मिळत असली पाहिजे हे यमुनेच्या पश्चिम कालव्यांच्या व इतर रिकाम्या प्रवाहांच्या भूगोलावरून अनुमान मांडले. सतलजच्या पूर्वेस आणि यमुनेच्या पश्चिमेस, रोपड ते अंबाला ह्या पट्ट्यामध्ये हिमालयातून येणारे किमान दहा प्रवाह आढळतात, ज्यात एक सरस्वती पण आहे. पुढे घग्गर-हाक्रा-नारा मार्गे कच्छच्या रणामधे उतरणारी सरस्वती ही ह्या सर्व प्रवाहांचे पाणी आज हीएकत्र नेते.
याच ओल्डहम यांच्या चुलत भावाने (आर. डी. ओल्डहम) ही सरस्वतीची जीवन कहाणी पुन्हा आपल्या निबंधामध्ये मांडली. तशीच पुष्टी देत पुढे एच जी राव्हेर्टी याने सरस्वतीचा प्रवाह घग्गर-हाक्रा यांच्या मधून पुढे कच्छच्या रणापाशी अरबी समुद्रामध्ये विलीन होतो असे सांगितले.
गेल्या काही वर्षांमध्ये, उपग्रह चित्रणामुळे , शास्त्रज्ञांना जमीनीखाली असलेल्या पुराप्रवाहांचा शोध घेणे शक्य झाले आहे. जमिनीखाली गाडले गेल्यामुळे लुप्त झालेले पाण्याचे प्रवाह हे तिथल्या मातीच्या थरांच्या प्रतीवरून आता या तंत्रामुळे ओळखता येतात आणि त्यांना पुराप्रवाह (पॅलिओचॅनलस) असे म्हणतात.
अरवली पर्वतांच्या पश्चिमेस थर वाळवंटाखाली अशा पुराप्रवाहांचे जाळेच सापडले आहे. त्यावरून यशपाल, घोष वगैरे पुरावेत्त्यांनी मारवाड, कच्छ, सिंध ह्य रेताड भागामध्ये प्राचीन काळी मोठी नदी वाहत असावी आणि तीच आपली हरवलेली सरस्वती असावी असं मत मांडले आहे. हा प्रवाह नक्की कसा आणि कुठून वाहत होता याविषयी प्रत्येकाची वेगळी मते असली तरी शिवालिक टेकड्यांपासून अरबी समुद्रापर्यंत एक मोठी नदी वाहत असावी याबद्दल मात्र एकमत आहे.
मोहोन्जोदारो, हडप्पा ही सिंधू संस्कृतीची ठिकाणे फाळणी नंतर पाकिस्तानात गेली. भारतीय संशोधकांनी त्यानंतर हजाराच्या वर पूर्व-मध्य-उत्तर सिंधू संस्कृतीची ठिकाणे सध्याच्या हरियाना, राजस्थान गुजराथ ह्या प्रदेशांमध्ये शोधली आहेत. त्यातल्या सर्वाधिक जागा ह्या घग्गर-सरस्वतीच्या काठावर आहेत.
अगदी अलीकडे 2017 मधे नेचर नियतकालीकामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाप्रमाणे , सरस्वती आणि सिंधू ह्या दोन स्वतंत्र वाहणाऱ्या नद्या होत्या असा निष्कर्ष आहे.
घाग्गर-हाक्रा ही नदी पावसाच्या पाण्यावर सध्या अवलंबून असली तरी पूर्वी हिमालयाचे पाणी ह्या पात्रामधून अनेक वर्षे वाहिले असले पाहिजे असे दाखवणारे संशोधन अलीकडच्या काळात झाले आहे. पण सापडलेल्या भूगर्भीय विदानुसार अशी सदाप्रवाही नदी किमान १०,००० वर्षांपूर्वी वाहत असे, त्यामुळे ती सिंधू संस्कृतीच्या काळात किंवा ऋग्वेदीय कालात वाहणारी सरस्वती नसावी असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. आता ह्या अनुमानाला खोडून काढणारे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले, ज्याप्रमाणे अशे हिमजलप्रवाही सर्वकाळ नदी घाग्गरच्या पात्रामधून ४-५,००० वर्षापूर्वी वहात असली पाहिजे असे निष्कर्ष मांडले आहेत.
अगदी आत्ता प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार , कच्छच्या रणापाशी अरबी समुद्राला एक मोठी हिमालयीन नदी मिळत असावी, जी पुढे आटल्यामुळे तिथल्या सिंधू संस्कृतीच्या वसाहती, मुख्यत्वे धोलावीरा ओसाड झाल्या असे अनुमान मांडले आहे. ह्या नदीला सरस्वती म्हणावे का?
ह्या संपूर्ण भूप्रदेशामध्ये सरस्वती नावाने ओळखल्या जाणाऱ्या चार नद्या आहेत. एक आदि-बद्री पाशी उगम पावून घग्गर ला मिळणारी सरसुती, दुसरी हिमाचल मध्ये माना खेड्यापलीकडे तिथेच लुप्त होणारी हिमालयीन सरस्वती, तिसरी सौराष्ट्र मध्ये सोमनाथापाशी , प्रभास तीर्थाजवळ हिरण्या व कपिला यांच्याबरोबर अरबी समुद्रास मिळणारी सरस्वती आणि अजून एक लुणीच्या दक्षिणेस सिद्धपुर आणि पाटण जवळून वाहणारी अर्धाप्रवाही सरस्वती !
संशोधकांनी आखलेल्या मार्गापलीकडे ह्या नद्यांचे भौगोलिक संदर्भ जात असले तरी, त्यांचे अस्तित्व, त्या नदीला आज ही परंपरेमध्ये असणारे महत्व, आजूबाजूला सापडणारी पुरातन महत्वपूर्ण स्थळे, या सगळ्यांचा एकत्रित विचार करता, ‘सरस्वती’ हे भारतीय उपखंडातील एक कोडे म्हणता येईल.
सरस्वतीच्या प्रवाहावर, तिच्या मार्गावर आत्तापर्यंत साहित्यिक पुराव्याखेरीज, शास्त्र आणि तंत्र वापरून बरेच संशोधन झाले असून अजून ही होत राहिलच.
काही संदर्भ
• 1874. 'Notes on the lost river of the Indian desert'. The Calcutta Review, July 1874, pp. 1-27
• Oldham, C.F. 1893. 'The Saraswati and the lost river of the Indian desert'. The Journal of the Royal Asiatic Society, pp. 49-76.
• 'On probable changes in the geography of the Punjab and its rivers: a historico-geographical study'. JASB 55 (Part 2). 1886, pp. 422-343.
• Raverty, H.G. 1892. 'The Mihran of Sind and its tributaries'. The Journal of the Asiatic Society of Bengal 61(4): 155-297, Extra No. 1892, pp. 298-508
• On the existence of a perennial river in the Harappan heartland -November 2019, Anirban Chatterjee and colleagues
( नकाशा आंतरजालावरून साभार)
--- भाग -२

Comments

Popular Posts