पूर्वजांची पावले- प्राचीन भारत आणि अर्वाचीन जागा
गंगेच्या पवित्र शीतल प्रवाहाची सहचरी, पूर्वेच्या सूर्यबिंबाला शतकानुशतके संस्कृती संचिताचे अर्घ्य देणारी प्राचीन नगरी वाराणसी ! ऋग्वेदाच्या ऋचांमध्ये उल्लेखलेल्या दिवोदास राजाची ही यज्ञभूमी. किमान अडीच-तीन हजार वर्षांहून अधिक असा सलग इतिहास लाभलेली ही तत्कालीन महानगरी आणि आताची चिरनगरी.
महाभारत, पुराणे तसेच कित्येक बौद्ध जातके आणि जैन धर्मग्रंथांमध्ये काशीचा गौरवास्पद उल्लेख सापडतो. काशीच्या राजकन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका ह्या तर महाभारतातल्या महत्त्वाच्या व्यक्तीरेखा. तेविसावे तीर्थंकर पार्श्व ह्यांची जन्मभूमी म्हणजेच वारणा आणि असी ह्या दोन नद्यांच्यामध्ये वसलेली आणिउत्तरवाहिनी गंगेची सहवासी अशी वाराणसी.
गौतम बुद्धाने पहिलेवहिले प्रवचनदिले इथूनच जवळ सारनाथ इथे. कबीराने इथेच शेले विणले आणि दोहे रचले, जे आजआपण अजूनही आळवतो. विश्वनाथाच्या ह्या काशी नगरीची नाळ आत्ताच्या भारतीयाशी अजूनही तशीच जुळली आहे.
Kedar Ghat, Varanasi |
भारताच्या प्राचीन भूमीमध्ये अशी पुरातन शहरे कमी नाहीत. एकविसाव्या शतकाच्या मंत्रतंत्राने भारलेल्या जगातही आपले जुनेपण आणि आपले आठवणींचे अमूल्य गाठोडे सांभाळत ही शहरे काळालाही कवेत घेऊन जगत असतात. चकचकत्या शो-रूम्सच्या ताफ्यामध्ये लांबून दिसणारे मंदिरांचे नक्षीदार कळस, आधुनिक इमारतींच्या आणि वेगवान गाड्यांच्या गदारोळात अंग चोरून उभे असणारे जुन्या वाड्यांचे, हवेल्यांचे महिरपदार खांब आणि गावाबाहेर उभे असणारे एखादे ओसाड टेकाड,उठलेल्या वस्तीच्या खुणा अंगाखांद्यावर बाळगणारे..
जागता वारसा
मध्य प्रदेशात क्षिप्रा नदीच्या तीरावरची मालव देशाची राजधानी उज्जयिनी नगरी म्हणजे सध्याचे उज्जैन म्हणजेच प्राचीन साहित्यामधली अवंतिका नगरी. कालिदासाच्या अनेक काव्यांमध्ये अजरामर झालेली उज्जयिनी ही इसवीसनापूर्वी पासूनअनेक कथा कादंबऱ्यांची भौगोलिक नायिका होती.पहिल्या शतकात लिहिलेल्या मृच्छकटिक नाटकाची गणिका नायिका वसंतसेना असो किंवा भासकवीच्या स्वप्नवासवदत्ताची राजकन्या वासवदत्ता, दोघीही महांकालेश्वराच्या ह्या प्राचीन नगरीच्या रहिवासी. सम्राट अशोकाच्या काळात उज्जयिनी ही मौर्य साम्राज्याचा भाग होती आणि अशोक हा तिथला राज्यपाल होता. साहित्यामध्ये उज्जयिनीच्या रस्त्यांची,तिथल्या प्रासादांची, तिथल्या श्रेष्ठी -धनिकांची अगणित वर्णने आहेत. पाचव्या शतकातील गणितज्ञ वराहमिहिर, कवी कुलगुरू कालिदास ह्यांनी उज्जयीनीची कीर्ती दिगंत केली. अनेक पुरातन व्यापारी महामार्गावरचे हे तत्कालीन महानगर म्हणजे आत्ताचे उज्जैन तितकेसे वैभवशाली राहिले नसले तरी शेकडो मंदिरांच्या रूपाने ह्या प्राचीन भूमीने इतिहासाच्या स्मृती जपून ठेवल्या आहेत.
Kshipra Ghat at Ujjain |
भारत हा महापुराणा देश आहे. पुरातन कालापासून शतकानुशतके इथे माणसे राहिली,त्यांनी घरे बांधली, संसार फुलवले, राज्ये स्थापिली. नवीन वस्तीची ठिकाणे निर्माण झाली तशी कधी जुनी ठाणी ओसाड पडली. कधी कधी फिरून त्याच ठिकाणी पुन्हापुन्हा माणसांनी वस्ती केली. हे सगळे बदल दरवेळी कुणी नोंदलेच असे नाही. पण तरीही प्राचीन वाङमय, तर कधी शिलालेख, तर कधी दंतकथा सुद्धा, या साऱ्यामधून आपल्याला गावांची जुनी नावे, जुने संदर्भ मिळतात. पुरातत्त्वीय उत्खननामधून काही गोष्टी स्पष्ट होतात, साहित्यामधल्या संदर्भांना कधी दुजोरा मिळतो तर कधी अभ्यासकांना विचारांचा रोख बदलावा लागतो.
भारताचे प्राचीनतम वाङमय म्हणजे वैदिक ग्रंथसंपदा. यात चारही वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे , इतर वेदांगे यांचा समावेश होतो. पुराणे आणि महाकाव्ये म्हणजे महाभारत, रामायण हे तर माहितीचे प्रचंड स्रोतच आहेत. त्याबरोबरच संस्कृत,पाली व अर्धमागधी मध्ये बौद्ध व जैन धार्मिक ग्रंथ उदाहरणार्थ पिटके, जातके, गाथा, सूत्रे असे विपुल साहित्य उपलब्ध आहे. यापलीकडे संस्कृत नाटके, योग,आयुर्वेद अशा विषयावरील ग्रंथसंपदा आणि इतर संकीर्ण साहित्य ह्या सर्व माध्यमांमधून आपल्याला त्या विषयाचीच नव्हे तर तत्कालीन सामाजिक , भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती सुद्धा समजायला मदत होत असते. महत्त्वाची शहरे, राजधान्या यांचे उल्लेख आपल्याला या ग्रंथांमधून मिळतात. मेगॅस्थेनिस, फाहियेन, ह्युएन त्संग सारख्या परदेशी प्रवाशांची वर्णने, राजतरंगिणी सारखे प्रादेशिक ग्रंथ यामधून विविध भौगोलिक धागेदोरे शोधता येतात.देशभर विखुरलेल्या विविध शिलालेखांमधून किंवानव्या नव्याने सापडत जाणारे ताम्रपटयामधून, देणग्या देणारे लोक, त्यांची स्थळनामे यांचे आकलन होत असते. ह्या सर्व पुराव्यांचे कालानुक्रम लावून, आपल्याला एखाद्या भूप्रदेशाची प्राचीन ओळख पटू शकते.
दिल्ली-आग्रा महामार्गावरती, यमुनेच्या श्यामल पाण्यात पाय सोडून बसलेले मथुरा गाव तर आपल्या किती परिचयाचे ! श्रीकृष्णाच्या बाललीलांची सांगाती ‘मथुरा’ ही शूरसेन देशाची राजधानी म्हणून प्राचीन साहित्यामध्ये ओळखली जाते. वृष्णी, अंधक वगैरे यादव कुळांची जन्मभूमी ही ऐतिहासिक काळात कुशाण , शक राजांची कर्मभूमी होती. मथुरेमध्ये उत्खननामध्ये सापडलेल्या अनेक शिल्पाकृतींच्या वैशिष्ट्यपूर्ण वळणामुळे, शिल्पकलेची ‘मथुरा शैली’ अशी इतिहासाच्या अभ्यासामध्ये एक नवीन ओळखही निर्माण झाली. मथुरेजवळचे वृंदावन आणि गोवर्धन तर आपल्याला कृष्णकथांमधून ठायीठायी भेटत राहिले आहे.
गंगा, घागरा, गंडक आणि शोण अशा चार महानद्यांच्या संगमावर वसलेले पाटलीपुत्र म्हणजे आजचे बिहारी पाटणा. प्राचीन मगध देशाची समृद्ध राजधानी म्हणून पाटलीपुत्र, भारतीय इतिहास आणि साहित्यामध्ये सुप्रसिद्ध आहे. नंद, मौर्य, गुप्त ह्या प्रसिद्ध राजघराण्यांनी भारतभर साम्राज्य निर्माण केले आणि त्याची सूत्रे पाटण्यामधून हलवली. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी असलेल्या मेगॅस्थेनिस ह्या ग्रीक वकिलाने पाटलीपुत्राच्या विस्ताराचे आणि वैभवाचे वर्णन केले आहे. गेल्या शतकभरामध्ये केलेल्या उत्खननामध्ये सापडलेले लाकडी तटबंदीचे अवशेष तसेच अनेक खांबाचे राज दालन , अनेक मौर्य आणि शुंगकालीन शिल्पे यांनी पाटलीपुत्राचे प्राचीन वैभव आत्ताच्या जगासमोर आणले आहे.
पुराणातील सप्तपुरींमधली कांची म्हणजे दक्षिणेतले कांचीपुरम. तिथल्या पल्लव व त्यानंतर चोळ ह्या बलाढ्य राजांची पाचव्या-सहाव्या शतकापासूनची ही राजधानी ! आजही अतिशय देखण्या द्राविड शैलीच्या मंदिरासाठी जशी ही नगरी प्रसिद्ध आहे तशीच रेशमी साड्यांच्या प्रचंड बाजारपेठेसाठी पण, ह्या पुरीची महती आहे. कामसूत्राचा कर्ता वात्स्यायन , नालंदा विद्यापीठाचा कुलपती धर्मपाल, हे कांचीचे रहिवासी.
रत्नजडीत भूतकालाने सजलेल्या ह्या वस्तीच्या जागा आजही माणसांनी , व्यवसायांनी आणि सांस्कृतिक संचीताने रसरसलेल्या, भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या अशा जिवंत आणि गजबजलेल्या आहेत.
Mani-Mahesh Temple at Bharmour, Himachal Pradesh |
वैभव आणि वैषम्य
पण काही जागांचे भाग्य तेवढे थोर नाही. त्यांचे ते पुराणे वैभव स्मृतींच्या पलीकडे गेले. नकाशावरचे छोटेसे टिंब अशी ओळख राहिलेली ही छोटी गावे, खेडी. पण गतकाळाचा वारसा कुठेतरी पोथ्या पुराणात सापडतो नाहीतर उत्खननात मिळालेल्या खापरात ओळखता येतो आणि कधी तर त्यांच्या नावातच त्यांचा भरजरी भूतकाळ डोकावत असतो.
हिमालयाच्या उंच हिमाच्छादित पर्वत रांगांमध्ये रावी नदीच्या पाचू सारख्या प्रवाहाच्या पलीकडे उभी आहे एक प्राचीन राजधानी ब्रह्मपूर म्हणजे आजचे भारमौर. चौऱ्यांशीमंदिरांच्या पवित्र सहवासात असलेल्या ह्या अनवट जागेचे इतिहासामधले महत्त्व वादातीत आहे. त्रिगर्त नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन जनपदाची ही राजधानी. पुढील काळात हा राजधानीचा मान रावीच्या तीरावरच्या चंबा किंवा चंपावती नगरीकडे गेला. पाचव्या-सहाव्या शतकापासूनचा सलग इतिहास दर्शवणारी ही देवभूमी, अनेक मंदिरे आणि कला ह्यांच्या उपासनेमध्ये आजही गढलेली आहे.
सरस्वती आणि गंगेच्या मधल्या प्रदेशात राज्य करणाऱ्या कुरुंची सुप्रसिद्धराजधानी म्हणजे हस्तिनापूर. आजही गंगेच्या उत्तर तीरावर, हिमालयाच्या पायथ्यापासून थोडे दक्षिणेला दूर एक हस्तिनापूर गाव दिसते. ब्रिजभूषण लाल ह्या प्रसिद्ध पुरावेत्त्याला तिथे उत्खनन करून तीन हजार वर्षांपूर्वीची राखाडी मातीची खापरे सापडली. महाभारतात लोहाचाप्रथम उल्लेख सापडत असल्याने व कार्बन-डेटिंग पद्धतीने हे हस्तिनापूरम्हणजे महाभारतामधील हस्तिनापूर असल्याचा सिद्धांत त्यांनी मांडला. पुराणांमध्ये हस्तिनापूर हे गंगेच्या पुराने उध्वस्त झाल्याचा उल्लेख आहे. गंगेच्या पुराच्या गाळाचा थरही या उत्खननामध्ये मिळाला. ही कुरुकुलाचीराजधानी त्यानंतर पूर्वेकडे कौशाम्बी इथे स्थापन झाली.
वैदिक साहित्यामध्ये, महाभारतामध्ये, जातक कथांमध्ये पांचाल देशाचा उल्लेख आहे. महाराणी द्रौपदीचे माहेर असलेल्या ह्या देशाचे उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल असे दोन भाग होते. उत्तर पांचालची राजधानी होती काम्पिल्य तर दक्षिण पांचालची प्रमुख नगरी होती अहिच्छत्रा. आज ह्या दोन्ही नावांची छोटीशी खेडीआपल्याला पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये आढळतात. त्यातल्या अहिच्छत्राला इसवीसनापूर्वीपासून सलग वस्तीचे पुरावे मिळाले आहेत. मंदिरे, मृण्मय मूर्ती आणि नाणीं ह्यांनी ह्या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व उजेडात आणले आहे.
महाराष्ट्रातले पैठण हे गोदातीरावरचे तीर्थक्षेत्र म्हणून सर्वांच्या माहितीचे आहे. पण त्याआधी ह्या प्रदेशाला प्रतिष्ठान म्हणून ओळखले जात होते.महाराष्ट्राच्या आद्यसातवाहन राजांची ही राजधानी. दोन हजार वर्षांपासून प्रतिष्ठित असे हे प्रतिष्ठान कित्येक शतके भारतभर जाणाऱ्या पूर्व-पश्चिम आणिदक्षिणोत्तर अशा व्यापारी मार्गावरील एक मोठे ठाणे होते. वाराणसीसारखीच वेद,शास्त्र , अध्ययन आणि अध्यापन ह्यांची जुनी परंपरा पैठणला आहे. आजही पैठणच्यावेशी बाहेर पुरातन उध्वस्त नगरीचे अवशेष ‘पालथी नगरी’ ह्या नावाने मिळतात.
उत्तर कर्नाटकामध्ये बदामी लालसर रंगाच्या देखण्या पर्वतराजी मध्ये सुंदर घडवलेली मंदिरे सापडतात. सोळाशे वर्षांपूर्वीच्या चालुक्य राजांची राजधानी वातापी म्हणजेच आजचे बदामी.अतिशय छोटे, अप्रगत असे सध्याचे बदामीचे स्वरूप आहे. विलक्षण कोरीव कामाने नटलेल्या दुर्गा, लाडखान आणि भूतनाथ मंदिरांमुळे बदामीला सध्या पर्यटकी नकाशावर स्थान आहे. पण पुरातन वातापी मात्र प्राचीन साहित्यामध्ये समृद्ध आणि संपन्न अशी नगरी होती. कांचीच्या पल्लव राजांनी, चालुक्य राजवटीचाप्रभाव कमी करण्याच्या ईर्ष्येने वातापीची वाताहात केली होती असे उल्लेख आढळतात.
Bhootnath temple view, Badami, Karnataka |
कावेरीच्या पूर्वेकडे जाणाऱ्या समुद्रानजीकच्या एका दिमाखदार वळणावर गंगैकोंडचोलापुरम नावाचे गाव आहे. हजार-बाराशे वर्षांपूर्वीच्या प्रबळ अशा चोळ राजांच्या तेव्हा नव्या वसवलेल्या राजधानीचे हे वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे. राजेंद्र चोळ (पहिला) ह्या राजाचे साम्राज्य इतके विस्तारले होते की त्याचे घोडे गंगेचे पाणी पीत असत, एवढेच नाही तर त्यासाठी त्याने उत्तर भारतामधल्या गंगेच्या पाण्याला दक्षिणेमध्ये आणून जणू बंदीवासामध्ये ठेवले होते असा ह्या ग्रामनामाचा शब्दशः अर्थ आहे. राजेंद्र चोळाच्या उत्तर दिग्विजयाचे हे स्मृतीरूप अवशेषआहेत. तंजावरच्या सुप्रसिद्ध मंदिराइतकेच सुघड पण जरा मध्यम आकाराचे शिवालय,तसेच अनेक पुरातन मंदिरांचे अवशेष, पाण्याचा मोठा तलाव असे कितीतरी जुने धागे ह्या जुन्या तमिळ गावाने उराशी धरले आहेत.
अमरावती ही कृष्णेच्या तीरावरचे आणि पूर्वसमुद्री तटाच्या निकटचे बौद्धवाङ्मयात सापडणारे महत्त्वाचे स्थान आहे. नव्याने विभाजन झालेल्या आंध्रप्रदेशाची राजधानी अमरावती येथे उभारायचा संकल्प करून जणू ह्या जागेच्या इतिहासाचेच पुनरुज्जीवन झाले आहे.
हरवलेले गवसलेले
पण तरीही काही जागा ह्या काळाच्या ओघामध्ये मना-व्यापारामधून निसटून गेलेल्या असतात. प्राचीन साहित्यामध्ये कित्येक भव्य नगरांची नावे आढळतात. तत्कालीन जनपदांच्या राजधान्या असलेली तेव्हाची ती भरभराटीला आलेली शहरे आता कुठे आहेत असा प्रश्नसहज पडू शकतो.
प्राचीन कोसल देशामध्ये अयोध्या, साकेत आणि श्रावस्ती अशी तीन महानगरे होती असा उल्लेख रामायण तसेच बौद्ध साहित्यामध्ये मिळतो. त्यापैकी अयोध्या हे तर अजूनही प्रचलित असलेले नाव आहे. पुराणाप्रमाणे ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकामध्ये ग्रीक म्हणजे यवनराज डिमिट्रीयस ह्याने मथुरेसह साकेत जिंकून पाटलीपुत्र पर्यंत मजल मारली होती असे दिसते. अभ्यासकांच्या मताप्रमाणे साकेत व अयोध्या हे एकच शहर होते. तर काही तज्ञांनुसार साकेत हे अयोध्येच्या जवळचे कदाचित जुळे शहर असावे.
महाभारतामध्ये विराटाच्या मत्स्य देशाचा उलेख आहे. भौगोलिक वर्णनावरून भरतपूर-अलवारचा प्रांत म्हणजेच विराटाचे राज्य असावे असा निष्कर्ष आहे. सध्या तिथे बैराट हे नाम-साधर्म्य दाखवणारे एक खेडे आहे जिथे पुरातन स्तूप आणि इतर अवशेष आहेत.
वत्स देशाचा राजा उदयन हा अनेक संस्कृत नाटकांचा महानायक आहे. वत्स देशाची राजधानी कौशाम्बी ही गंगेच्या किनाऱ्यावर होती असे उल्लेख आहेत. महाभारतामध्ये परिक्षिताचा वंशज निचक्षु याने हस्तिनापूर गंगेच्या पुराने उध्वस्त झाल्यानंतर राजधानी बदलून कौशाम्बीला नेली असे उल्लेख आहेत. अर्वाचीन काळातील उत्खननानंतर अलाहाबाद जवळचे कोसम म्हणजे कौशाम्बी असावे असे तज्ज्ञांचे अनुमान आहे. ह्या ठिकाणी शतपथ ब्राह्मणात वर्णन केल्याप्रमाणे यज्ञविधीसाठी अचूक बांधलेली श्येनचित्ती दिसते, त्याच प्रमाणे बौद्धविहार ही सापडतो.
भारताचा भूगोल आणि इतिहास दोन्हीही प्राचीन. त्याचा शोध घेण्याचे स्रोत कधी त्रोटक तर कधी लुप्त. तरीही आपल्याला ज्ञात अशा साहित्याच्या अमूल्य ठेव्यांमधून कित्येक ऐतिहासिक जागा, नद्या , डोंगर यांची नावे सापडतात ज्याचा सध्याच्या जगाशी धागा जुळवायचा प्रयत्न केवळ अभ्यासकांचाच नव्हे तर सामान्य माणसांचाही अथक चालू असतो. आणि हे करताना समकालीन लिखित पुरावे, दंतकथा,नामसाधर्म्य, लोककथा, नाटके यामधील धागे , पुरातत्त्वीय अवशेष ह्या सगळ्यांच्या संयोगाने काहीतरी आडाखा बांधता येतो.
ओडिशा मध्ये शिशुपालगड ह्याजागी, वस्ती भोवतीची भक्कम तटबंदी, प्रवेशद्वारे , रोमन नाणी असे पुरातन अवशेष सापडले आहेत. ओड्र, उत्कल आणि कलिंग या नावाने प्राचीन काळात ओळखला जाणारा हा प्रदेश! अशोकाचा प्रस्तरलेख असलेले धौली इथून जवळच आहे. कलिंगाचा प्रसिद्ध प्राचीन राजा खारवेल याच्या लेखात आलेले ' कलिंगनगर ' किंवा अशोकाच्या लेखातले 'तोशाली' म्हणजेच शिशुपालगड असू शकते.
'पेरिप्लस ऑफ एरीथ्रीअन सी' असा एक पहिल्या शतकामध्ये कुणा अज्ञात खलाशाने लिहिलेला ग्रंथ आहे. भारताच्या किनाऱ्यावरच्या कित्येक बंदरा-नगरांचा यामध्ये उल्लेख आहे. मुंबईजवळचे नाला-सोपारा म्हणजे मौर्य काळापासूनचे शूर्पारक बंदर तर भृगुकच्छ म्हणजे नर्मदा नदीच्या मुख प्रदेशातले भडोच ! नीळ, मोती, साखर, मोर वगैरे मालाने भरलेली गलबते ह्याच बंदरांमधून युरोपच्या दिशेने कूच करीत.
भारताच्या पूर्व किनाऱ्यावरच्या ताम्रलिप्तीचा उल्लेख टॉलेमीच्या वृत्तांतामध्ये तर आहेच पण साहित्यामध्ये व्यापाराचे आणि विद्येचे केंद्र म्हणूनही त्याची ख्याती आहे. बंगालमधील मिदनापूरमधले तामलुक म्हणजेच प्राचीन ताम्रलिप्ती हे पुरातत्त्वीय पुराव्यांमुळे निघालेले अनुमान आहे.
भारताच्या पूर्व किनाऱ्यावरच्या ताम्रलिप्तीचा उल्लेख टॉलेमीच्या वृत्तांतामध्ये तर आहेच पण साहित्यामध्ये व्यापाराचे आणि विद्येचे केंद्र म्हणूनही त्याची ख्याती आहे. बंगालमधील मिदनापूरमधले तामलुक म्हणजेच प्राचीन ताम्रलिप्ती हे पुरातत्त्वीय पुराव्यांमुळे निघालेले अनुमान आहे.
उत्तर बिहार मधले मुझफ्फरपूर जिल्ह्यातले गंडकीच्या तीरावरचे वैशाली हेही असेच प्राचीन गणराज्य असलेले अर्वाचीन खेडेच.वृज्जी संघराज्याचे आणि त्यातल्या लिच्छवी गणाचे , वैशाली हे फार महत्त्वाचे केंद्र होते. बुद्धपूर्व काळापासून म्हणजेच पंचवीसशे वर्षांपासून ह्या नगराने अनेक ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत.चोविसावे जैन तीर्थकर महावीर यांचा जन्म इथलाच, तर त्यांची आई त्रिशला ही लिच्छवी कुळामधली होती.
असे हे भारताच्या इतिहासाचे प्राचीन अवशेष, भारताबाहेरही विखुरलेले आहेत. भारतीय उपखंडामधील वायव्येच्या टोकाला असलेले तक्षशीला, हे शिक्षणाचे प्रमुख केंद्रहोते. महाभारतापासून , बौद्ध साहित्यापर्यंत तक्षशीलेचे उल्लेख सापडतात. चिनाबच्या किनाऱ्यावरचे सियालकोट म्हणजे प्राचीन मद्र देशाची राजधानी शाकलनगर. मुलतान हे तर मूलस्थान म्हणजे सूर्योपासनेचे महत्वाचे केंद्र होते. गांधारदेशाचा उल्लेख उपनिषदामध्ये आढळतो. तिथले पेशावर म्हणजे कनिष्काची राजधानी असे प्राचीनपुरुषपूर आणि आत्ताचे बेग्राम म्हणजे प्राचीन कपिशा. पूर्वेकडच्या बांगलादेशमध्ये उत्खननांमधून मैनमती, पहारपूर, महास्थानगड या ठिकाणी अनेक मंदिरे आणि विहार सामोरे आले आहेत.
ह्या आपल्या पूर्वजांच्या प्राचीन भूमीमध्ये गतेतिहासाची आठवण करून देणारे पुरावशेष मिळणे अवघड नाही. पण आज ‘नाही चिरा नाही पणती’ अशी त्यांची भग्न अवस्था काळाच्या सर्वभक्षकतेची कराल आठवण करून देते.
मथुरेमध्ये जन्मलेल्या कृष्णाची दुसरी कर्मभूमी द्वारका !पश्चिम समुद्राच्यातटावर, सौराष्ट्राच्या ओसाड प्रदेशात कष्टाने वसवलेली यादवांची ही वैभवशालीराजधानी , कृष्णाच्या निर्वाणानंतर समुद्राने गिळंकृत केली अशी महाभारतामध्येकथा आहे. ह्या कथेचा धागा जिवंत ठेवणारी बेट द्वारका आज ही अस्तित्वात आहे. मुख्य भूमी पासून दूर समुद्राच्या आत असलेल्या या बेटावर होडीने पोहोचता येते. डॉ .एस आर राव ह्या उत्खनन तज्ञांना ह्या पाण्याखाली दडलेल्या नगरीचे तीन हजाराहून अधिक वर्षे जुने असे दगडी अवशेष सापडले आहेत. द्वारकेचे प्राचीनत्व आणि पुराणे , महाभारत यातील घटनांचे ऐतिहासिकत्व सिद्ध होण्यासाठी ते फार महत्त्वाचे ठरले आहेत.
Stone Chariot at Vitthal Temple, Hampi, Karnataka |
चौदाव्या शतकातले जगभर ख्याती पसरलेले वैभवशाली साम्राज्य म्हणजे कर्नाटकामधले विजयनगर. लांबवर पसरलेली बाजारपेठ, खोल जाणारी रेखीव पायऱ्यांची, घडवलेलीकुंडासमान प्रचंड विहीर, द्राविड शैलीमधली भव्य देखणी मंदिरे आणि एकूणच कृष्णदेवरायाच्या ह्या राजनगरीचा विस्तीर्ण परिसर आपल्याला अचंबित करतो. आता उरलेले पुरातन अवशेष त्या जमान्याची आठवण करून देणारे असले तरी मनामध्ये खिन्नतेचा एक सूर उमटतोच.
स्मृतींच्या पलीकडे
उत्खनन शास्त्रामुळे आपल्याच इतिहासाच्या आपल्याला माहित नसलेल्या पैलूंचा उलगडा होऊ शकतो. त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भारतीय उपखंडातील सिंधु संस्कृतीचा लागलेला शोध !
लांबवर पसरलेली पिवळीधमक मोहरीची शेते आणि त्यात घुसलेले हिरव्यागार गव्हाच्या शेतांचे लांबवर पट्टे ! निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर, आणि अगदी सपाट क्षितिजावर , मऊशार सुपीक मातीचे समृद्ध आयुष्य ही पंजाब-हरियाणाच्या भूमीची फार जुनी ओळख आहे.
फारा फारा वर्षांपूर्वी, अगदी अनेक शतकांपूर्वी ह्याच ठिकाणी घुमले होते वेदांचे गेय शब्द आणि स्मृतींच्या पलीकडे गेलेल्या सरस्वती नदीच्या पाण्याने इथेच भरल्या होत्या घागरी.
राखीगढी हे ह्या हरीयानामधले अगदी मामुली गाव आहे. पण तिथे आपल्या इतिहासाचा फार मोठा ठेवा लपला आहे. पाच हजार वर्षांपूर्वी ह्याच परिसरामध्ये एक मोठे नांदते गाजते शहर उभे राहिले होते. काटकोनामध्ये येऊन मिळणारे प्रशस्त रस्ते, बाजूला दुमजली घरांची रांग, पक्क्या भाजलेल्या एकसाची विटा, धान्याची सामायिककोठारे , कुठे सोन्याचे मणी तर कुठे तांब्याची कडी, कुठे गहू तर कुठे डाळींबे अशा जिनसांनी गजबजलेली बाजारपेठ.
Dholavira, Haryana |
आत्ताच्या सुबक आणि श्रीमंत शहरांचा ऐतिहासिक अवतार म्हणजे ही सिंधू-सरस्वती संस्कृतीची द्योतक अशी भारताची अती पुरातन नगरे.मोहोंजोदारो आणि हराप्पा ह्या दोन जागांमुळे सिंधू संस्कृतीची महती जगभर पोचली. आता जरी त्यांचे केवळ अवशेष शिल्लक राहिले असले तरी त्यांची भव्यता, वैभव आणि इतिहासामधले स्थान थोडेही ढळत नाही.
कच्छच्या आखातामधले ‘धोलावीरा’ हे असेच दुर्लक्षित गाव. पण तिथे सापडले असेच पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू-सरस्वती संस्कृतीचे अवशेष. धोलावीराला सापडलेला चिह्नपट तिथल्या घरांच्या आणि रस्त्यांच्या इतकाच किंवा अधिकच महत्त्वाचा आहे. गुजराथ मधल्या लोथलला सापडलेली जहाजांची गोदी किंवा हरियाना मधल्या कालिबंगनला सापडलेले अर्धे नांगरलेले शेत, महाराष्ट्रातल्या दायमाबादची धातूची बैलजोडी ह्या सगळ्या अमूल्य ठेव्यामुळे ह्या छोट्या गावांना त्यांची एक नवीन ओळख प्राप्त झाली.
भारतामध्ये अशा जमिनीखाली गाडल्या गेलेल्या आणि लोकसंचितामधून ही हरवलेल्या सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या हजाराच्यावर जागा पुरावेत्त्यांना प्रयत्नांती सापडल्या आहेत. मग त्या जागा आणि धार्मिक,पौराणिक व इतर साहित्यामधले उल्लेख यांची सांगड घालायचा प्रयत्न सुरु होतो. कित्येकदा असफल झाले तरी ह्या प्रयत्नाचे मोल हे असामान्य आहे. कोणी बांधली ही नगरे,कोण होती ही माणसे, ह्याचा शोध आपण घेतच राहणार.
Somewhere in Uttarakhand |
आपल्या भारतभूमीमध्ये जुना-नव्याचा संगम आहे, तरीही काळाच्या गतीमुळे निर्माण झालेला दुभंग आहे आणि संभ्रमही आहे. पण माझ्या पूर्वजांची ही पावले आणि त्यांनी शोधलेल्या वाटा मन:चक्षुनीपाहताना काळाच्या सीमा ओलांडल्या जातात, इतिहासाची पाने उलटत जातात आणि ह्या पुण्यभूमीचे अनाहत गीत मनामध्ये रुंजी घालू लागते आणि जाणवते ते ह्या भूमीचे आश्वासक चिरंतन अस्तित्वाचे सत्य !
मुशाफिरी दिवाळी अंक २०१८ मध्ये पूर्व प्रकाशित
Comments