दृष्टीआडची देवळे - भाग १ ते ४
दृष्टीआडची देवळे – भाग १
#दृष्टीआडचीदेवळे१ #देवतामूर्तीप्राचीनसंदर्भ
भारताच्या चलनी नोटांवर स्थान मिळालेले एक अद्वितीय ठिकाण, हे मध्य प्रदेशातील सांची येथे आहे. सांचीचा बौद्ध स्तूप एका ठेंगण्या टेकडीवर उभा आहे. हे मौर्य राजा अशोकाने बांधलेले स्मारक ईसापूर्व तिसऱ्या शतकातील आहे आणि त्यानंतर त्याच्यात शुंग शासकांनी भर घातली. याच टेकडीवर इतर अनेक वास्तू आहेत. आणि त्यापैकी एक आहे आताच्या मंदिरांचे पारंपरिक 'पूर्वज' मंदिर. भौगोलिक दृष्ट्या, भारतीय उपखंडात आणि कालक्रमानुसार, अनेक शतकांचा इतिहास असलेली आपली मंदिर परंपरा वैशिष्ट्यपूर्ण आणि अभिमानास्पद आहे.
सांची येथील हे सर्वात जुने मंदिर , आज ‘सांची स्मारक १७’ म्हणून ओळखले जाते. खांब आणि सपाट छप्पर असलेली ही एक साधी संरचना आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या लखलखत्या मंदिर परंपरेतील, हे भारतीय मंदिराचे सर्वात जुने आणि पहिले रूप आहे अशीच 'सुरुवातीची' मानली गेलेली अनेक मंदिरे या परिसरात आढळतात, नाचना -कुठारा, भुमरा आणि उत्तर प्रदेशातील देवगड ही ठिकाणे म्हणजे मंदिराच्या 'सुरुवातीची' काही उदाहरणे आहेत.
तंजावरच्या भव्य बृहदीश्वर मंदिराशी किंवा शोभिवंत अशा खजुराहो मंदिर समूहाशी तुलना केल्यास या सुरुवातीच्या मंदिरांचे साधे स्वरूप जाणवून येते. तज्ञांनी ही सुरुवातीची मंदिरे इसवी सनाच्या पाचव्या शतकात नोंदवली आहेत आणि ती गुप्त युगात बांधली गेली आहेत असे गृहीत धरले आहे [ R1 ] . गुप्त कुळातील राजांनी त्यांच्या पाटलीपुत्र या राजधानीतून, प्राचीन भारतातील फार मोठ्या भूभागावर राज्य केले . गुप्त राजे हे वैदिक धर्माचे अनुयायी होते.
भारतातील सह्याद्री, विंध्य आणि इतर पर्वत रांगांमध्ये आपल्याला अनेक कोरीव लेणी दिसतात ज्या इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीच्या आहेत उदा. भाजे लेणी. तथापि, ही गुप्तकालीन घडवलेली 'स्ट्रक्चरल' मंदिरे अखंड दगडात कोरलेली नसून , दगड वापरून बांधलेली आहेत आणि म्हणूनच ती प्रांगणामध्ये उभी दिसतात. स्थापत्यशास्त्रीयदृष्ट्या अशा मंदिराचे बांधकाम, हे कोरीव गुंफा च्या पुढची पायरी आहे. गुप्त काळातील मंदिरे, प्रामुख्याने मध्य भारतात आढळणारी ही 'पहिली मंदिरे' पाचव्या ते सातव्या शतकातील आहेत असे मानले जाते. .
म्हणजे याचा अर्थ की याच कालखंडामध्ये भारतीयांनी मूर्तीपूजा सुरू केली का? मंदिर नावाची जागा,सामाजिक आणि सार्वजनिक हेतूने निर्माण करण्याच्या परंपरेची ही सुरुवात होती का? असे प्रश्न वाचक-अभ्यासकच्या मनात उभे राहू शकतात.
या आणि पुढील लेखांमध्ये देवळे, मूर्ती , त्यांचे प्राचीन संदर्भ आणिअर्वाचीन समजुती यांचा थोडक्यात मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
शिल्पे आणि मूर्ती -
मूर्ती ही देवत्वाची प्रतीके आहेत. त्या ज्या देवतेचे प्रतिनिधित्व करतात त्या देवतेच्या वर्णनानुसार मानवी रूपामधली मूर्ती घडवली जाते. अशा बनवलेल्या मूर्ती तात्पुरत्या असू शकतात,एका विशिष्ट हेतूसाठी तयार करून हेतुप्राप्तीनंतर किंवा विधी संपल्यानंतर त्या विसर्जित केल्या जाऊ शकतात. अशा मूर्ती बाळबोध , साध्यासुध्या आणि नाशवंत असतात. भारतातील सर्वात जुना ग्रंथ म्हणजे ऋग्वेद, या मध्ये मूर्तींचे सर्वात जुने संदर्भ सापडतात. 'माझा इंद्र कोणी विकत घेईल का' हे एका सूक्तात एक माणूस विचारत आहे. विद्वानांचे असे मत आहे की येथे 'इंद्र' म्हणजे इंद्र देवतेचे प्रतीक किंवा मूर्ती आहे आणि त्याचबरोबर हा संदर्भ मूर्ती खरेदी-विक्रीची प्रथा दर्शवितो.[ R2 ] अशाप्रकारे मातीच्या किंवा लाकडाच्या मूर्ती पूर्वापार तयार केल्या गेल्या, त्यांची प्राणप्रतिष्ठा करून पूजाअर्चा केली गेली आणि तदनंतर त्या विधिवत विसर्जित पण केल्या गेल्या. आपल्या गणपती उत्सवामध्ये पण ही विधी परंपरा दिसून येते. . मौर्य युग (300-200 BCE) मध्ये उत्खनना मध्ये सापडलेल्या अनेक मृणमूर्ती आहेत, ज्यांना 'मातृ-आकृती'असे संबोधले गेले, त्यांचा हेतू पण असाच विधीवत स्थापना व विसर्जन असू शकतो.
कायमस्वरूपी , प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्ती तर आपल्याला चांगल्याच माहिती आहेत. अशा मूर्ती अधिक रेखीव, भव्य आणि टिकाऊ करण्यासाठी दगड किंवा धातू पासून त्या घडवल्या जातात. अशा मूर्तीना आपली घरे किंवा इतर सार्वजनिक वास्तू या ठिकाणी कायमस्वरूपी स्थान मिळते..भारतीय संस्कृतीच्या गेल्या अनेक वर्षांच्या अस्तित्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक लहान मोठ्या मूर्ती, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने, आत्तापर्यंतच्या शोध-उत्खननांमध्ये शोधून काढल्या आहेत. सिंधू-सरस्वती खोऱ्यातील संस्कृती (हडप्पा सभ्यता) मध्ये शिवलिंगा सदृश वस्तू आणि अनेक मूर्ती सापडल्या आहेत. नंतरच्या काळातील उत्खननात, जसे की मथुरा येथे बुद्ध, महावीर, विष्णू आणि दुर्गा यांच्या मूर्ती मिळाल्या आहेत. अगदी अलीकडेच रणथंबोरच्या गवताळ वन प्रदेशात, अनेक मंदिरांसह, टेकडीच्या एका बाजूवर कोरलेले, विष्णूचा अवतार दर्शविणारे सर्वात मोठे भू-वराह शिल्प सापडले आहे. [ R3 ]
अशा मूर्तींच्या स्थापनेचा आणि वापराचा , सांस्कृतिक उद्देश हा केवळ पुरातत्त्वशास्त्राची परिमाणे लावून ठरवता येत नाही, प्राचीन धार्मिक साहित्य, जुने ग्रंथ, लोककथा आणि व्यवहारात चालत आलेल्या परंपरांचे योग्य विश्लेषण करूनच त्याचा शोध आणि अर्थ लावावा लागतो.
देवतामूर्तीचें प्राचीन ग्रंथातील संदर्भ
वैदिक साहित्य प्रामुख्याने ऋग्वेद आणि अथर्ववेद, ह्यामध्ये देवता मूर्ती आणि त्यांच्या उपासना यांचे अनेक उल्लेख आहेत. अष्टाध्यायी हा प्रसिद्ध संस्कृत व्याकरणकारा पाणिनी यांचा सूक्त बद्ध ग्रंथ आहे. यामध्ये, रुद्र आणि वासुदेव यांच्या उल्लेखांसह 'अर्च पूजायाम्' असा पूजा आणि पूजनीय वस्तू संदर्भात उल्लेख आहे . [ R4 ] मान्यवर इतिहासकारांनी , ऋषी पाणिनी यांचा कालखंड इसवीसन पूर्व ५०० मानला आहे.
अशा कायमस्वरूपी पूजनीय मूर्तींनी मंदिर संकल्पनेला जन्म दिला असावा. मंदिर म्हणजे पूजा प्रार्थना यासाठी सुयोग्य असे देवमूर्तीचें कायमस्वरूपी घर, सर्व भक्तांना एकत्र येण्यासाठी , एक सर्वांच्या हक्काचे सार्वजनिक स्थळ, आणि तिथे देवतेच्या लक्षणाशी सुसंगत असा निसर्ग आणि आसपासच्या परिसराला लाभलेला पवित्रतेचा परिसस्पर्श!
संदर्भ
[R1] https://en.wikipedia.org/wiki/Nachna_Hindu_temples#:~:text=Their%20dating%20is%20uncertain%2C%20but,style%20of%20Hindu%20temple%20architecture.
[R2] ऋग्वेद
[ R3] https://www.hindustantimes.com/cities/bhopal-news/asi-explores-100-archeological-remains-in-mp-s-bandhavgarh-tiger-reserve-101664375767491.html
[R4] अष्टाध्यायी -पाणिनी https://ashtadhyayi.com/dhatu/01.0232
दृष्टीआडची देवळे – भाग २
#दृष्टीआडचीदेवळे२
#मंदिरप्राचीनउल्लेख
मंदिरांचे प्राचीन ग्रंथातील उल्लेख
नद्यांचे संगम, समुद्रकिनारे , पर्वत शिखरे, घनदाट जंगले अशा कुठल्याही नैसर्गिक स्थळी भारतीय मनाला दैवी अस्तित्व जाणवते. आणि ते मंदिराच्या रूपाने आपल्या समोर येते, ध्यान, धारणा, तप या सगळ्या गोष्टीसाठी सुयोग्य आणि सहज..
मंदिरे ही देव-देवतांची निवासस्थाने आहेत. देवता जरी आकाशगामी, उच्च कोटीच्या असल्या तरी त्या आपल्यापैकी एक पण आहेतच . त्यामुळेच नद्यांच्या गजबजलेल्या काठांवर, वाहत्या पाण्यातून वर जाणार्या पायर्याच्या शेवटी किंवा रुंद रस्त्याच्या एका टोकाला मंदिर असणे आणि त्याभोवती नेहमीच एखादे गाव वसलेले असणे हे फारसे आश्चर्यकारक नाही. काही मंदिरे ही पूर्वनियोजित असतात, काहीवेळा नवीन वस्तीची सुरवात, नवीन काळाची खूण म्हणून, नव्याने बांधलेल्या किल्ल्यामध्ये किंवा नवीन वसाहतीमध्ये देवळे जन्माला येतात, लोकांना आणि परिसराला आशीर्वाद देण्यासाठी !
प्राचीन काळापासून आपल्याला उपलब्ध असलेल्या अनेक ग्रंथांमध्ये मंदिरे आणि देवतांचे वास्तव्य असे अनेक संदर्भ सापडतात. वैदिक ग्रंथांव्यतिरिक्त, महाभारत, रामायण आणि पुराणांसह इतर अनेक ग्रंथांमध्ये त्यांच्या काळातील मंदिर परंपरेचा उल्लेख आहे. [ R5 ]
-पाणिनीच्या सूक्तांवर 'महाभाष्य' लिहिणारे पतंजली मुनी हे कुबेर, राम आणि केशव यांच्या मंदिरांचे आणि तेथील नृत्य, संगीत आणि धर्मविधींनी दुमदुमलेल्या आवाराचे विस्तृतपणे वर्णन करतात. पतंजली यांचा काळ ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकातील आहे.
-कौटिल्याच्या अर्थशास्त्रात मंदिरांच्या देखभालीचा संदर्भ आहे, याचा अर्थ असा आहे की मंदिरे बांधणे आणि त्यांची डागडुजी करणे , त्यांचे व्यवहार सुरळीत राखणे ही पूर्वीपासूनची परंपरा आहे. इ.स.पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मंदिरांच्या शहराचे वर्णन केले आहे, ज्यामध्ये विविध वैदिक आणि पौराणिक देवतांच्या देवळांचा समावेश आहे. देवदेवतांची चोरी करणाऱ्या चोरांना देण्याच्या शिक्षाही कौटिल्याने या ग्रंथामध्ये सुचवल्या आहेत.
-राजतरंगिणी’ ह्या काश्मीरच्या प्रसिद्ध प्राचीन ऐतिहासिक ग्रंथामध्ये, सम्राट अशोकाचा पुत्र जल्लोक याने श्रीनगर येथे मंदिर बांधले असल्याचा उल्लेख आहे. अशोकाची कारकीर्द इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील आहे. [ R7 ]
-विशेष प्रसंगी संगीताने भारून गेलेल्या, कोशल देशातील मंदिराचे वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये आहे. वाल्मिकी रामायण २०० ईसापूर्व ते २०० इसवी सन दरम्यान संकलित केले गेले असे मानले जाते
-राजा हाल सातवाहन याने पहिल्या शतकामध्ये रचलेला, ‘गाथा सप्तशती’ हा कवितांचा संग्रह आहे. या साध्या , सोप्या, गेय कवितांमध्ये मंदिरांचा उल्लेख 'देऊल' किंवा 'देवालय' असा आहे. गाथेमधील मंदिरे प्रवाशांना आश्रय देतात. ती कधीकधी गावाबाहेर असतात आणि एका गाथेत तर एका उद्ध्वस्त मंदिराचाही उल्लेख आहे. [ R6 ]
-भारतातील सध्याच्या अनेक मंदिर स्थळांची त्याच जागेवर अनेकदा बांधणी-उभारणी झाली आहे आणि तिथला हजारो वर्षांचा स्थान -इतिहास अबाधित राहिला आहे. एखाद्या विशिष्ट ठिकाणी प्रतिष्ठापना केलेल्या देवतेचे स्थान माहात्म्य आणि पावित्र्य जपण्यासाठी त्याच स्थानावर मंदिर स्थापित असणे महत्वाचे असते. थिरुवन्नमलाई येथील अरुणाचलेश्वर मंदिर, हे अग्नी तत्वाचे प्रतीक असल्याचा उल्लेख नक्किरार (इ.स.पू. पहिले शतक ते इ.स. पहिले शतक), कपिलार आणि परनार (१२५ते २२५ इस) यांसारख्या विद्वानांच्या प्राचीन तमिळ ग्रंथामध्ये आढळतो. या मंदिराची सध्याची रचना चोल काळातील म्हणजे दहाव्या शतकातील आहे.
-मानसार', मयमत' आणि 'समरांगण सूत्रधार' हे प्राचीन स्थापत्यशास्त्राच्या महाग्रंथांचे त्रिकूट आहे. इतर विषयांसह यात विविध प्रकारच्या मंदिरांबद्दल चर्चा केली आहे . या ग्रंथांनुसार 'राजधानी' च्या शहराच्या पश्चिमेला विष्णू मंदिर आणि ईशान्येला शिवमंदिर असावे. हे सर्व ग्रंथ इ.स.च्या पहिल्या शतकापासून ते सातव्या शतकापर्यंतच्या दीर्घ कालावधीत तयार केले गेले असावेत असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे .
-सातव्या शतकातील चिनी यात्रेकरू ह्युएन त्सांगने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, यात्रेकरूंच्या मार्गावर अनेक ठिकाणी भेटी दिल्या आणि अनेक मंदिरांचा,काहीवेळा तर शेकडो मंदिरांचा उल्लेख केला आहे! [ R8 ]
या सर्व प्राचीन नोंदी, भारतीय उपखंडातील मंदिरांच्या परंपरेचा इतिहास आपल्यासमोर उलगडतात .विविध ग्रंथांच्या सध्याच्या मान्यताप्राप्त कालक्रमानुसार , सर्वात जुने संदर्भ हे स्पष्टपणे इसपूर्व ४०० पासून दिसून येतात.
संदर्भ
[ R6 ] Gatha Saptashati
[ R7 ] कल्हाना द्वारे राजतरंगिनी - https://archive.org/stream/RajataranginiOfKalhana-English-JogeshChunderDuttVolumes12/Rajatarangini-JogeshChunderDuttVol2_djvu.txt
[ R8 ] Si-Yu-Ki https://ia801607.us.archive.org/.../siyukibuddhistre01hsu...
दृष्टीआडची देवळे – भाग ३
वेळोवेळी सापडलेल्या शिलालेख , ताम्रपट आणि इतर पुरातत्वीय शोधांमुळे, साहित्यात उल्लेखलेल्या मंदिर , देवळे , पूजेची ठिकाणे यासारख्या संदर्भांची अधिकच पुष्टी होते.
शिलालेख , ताम्रपट, काष्ठपट - साहित्यिक आणि भौतिक पुरावा एकत्रित -
शिलालेखामुळे शाब्दिक संदर्भांची विश्वासार्हता अधिक वाढते. शिलालेख म्हणजे दगडावर तर ताम्रपट म्हणजे धातू वर लिहिलेला लेख. कधी कधी लाकडावर देखील कोरलेला मजकूर अथवा चिन्हे सापडतात. बर्याच वेळा, शिलालेख मध्ये केव्हा लिहिला गेला त्या काळाची नोंद असते. त्यांचा उद्देश हा मंदिर बांधण्यासाठी दान देण्याचा उल्लेख ,देणगी देणार्याची प्रसिद्धी , कुठल्या मोहिमेतील विजय तर कधी सार्वजनिक उपयोगाचे कामे केल्याचे उल्लेख असा असतो. सम्राट अशोकाच्या भारतभर सापडलेल्या शिलालेखा मध्ये प्रजेने कसे वागावे याचे नियम, प्रशासनाची माहिती आणि एकूणच जनजागृती असा हेतू दिसतो. काही वेळा शिलालेख म्हणजेप्रशस्ती पर काव्य असते , उदा समुद्रगुप्त प्रशस्ती. शिलालेख , ताम्रपट हे मुख्यत्वे टिकून रहावेत आणि पुढच्या वंशजांना त्याची माहिती मिळावी ह्या हेतूने लिहिलेले असतात.
आपल्या ह्या मंदिर इतिहासाच्या कथेला सुद्धा मोठा शिलालेखात्मक भूतकाळ आहे.
· मध्य प्रदेशातील विदिशाजवळ आता 'खांब बाबा' या नावाने ओळखल्या जाणार्या ठिकाणी, एक वैभवशाली स्तंभ एकटाच उभा आहे. या स्तंभावर आहे २०० ईपूचा एक शिलालेख. त्यानुसार तक्षशिला येथील हेलिओडोरस नावाचा एक ग्रीक राजदूत हा विष्णूचा भक्त झाला होता आणि 'भागवत' पूजत होता आणि म्हणून त्याने हा 'गरुड मानक' व स्तंभ बांधला होता. या ठिकाणी झालेल्या उत्खननात , तेथे प्राचीन भारतीय मंदिराचे सर्व घटक उदा. गर्भगृह, अंतराळ आणि रंगमंडप आढळले आहेत. म्हणजेच, स्तंभ उभारला तेव्हा त्याच्या आजूबाजूला मंदिर होते ! [ S1 ]आजही आपण विष्णू मंदिराच्या आवारात बांधलेल्या 'गरुडस्तंभा'ची अनेक उदाहरणे पाहतो - बेलूर, कर्नाटक येथील चेन्नकेशव आणि चंबा, हिमाचल प्रदेश येथील लक्ष्मी-नारायण मंदिर या दोन्ही ठिकाणी प्रवेशद्वारी उंच गरुड स्तंभ उभारलेले दिसतात .
· नारायण वाटिका नावाच्या मंदिराचा उल्लेख असलेला शिलालेख, राजस्थानमधील नगरी आणि घोसुंडी इथे सापडला आहे. शिलालेखानुसार हे मंदिर संकर्षण आणि वासुदेव या देवतांना समर्पित आहे. ASI नुसार हा शिलालेख सुमारे २०० ईपू चा आहे. यामध्ये 'पूजाशिला-प्राकार ' असा शब्द प्रयोग आहे. जगन्नाथपुरी,ओडिशा येथील प्रसिद्ध मंदिराप्रमाणे, भारतात इतरत्र ही कृष्ण-बलराम मंदिरे आजही प्रचलित आहेत. [ S2 ]
· इसवीसनाच्या पहिल्या शतकात लिहिलेल्या मथुरा येथल्या शिलालेखामध्ये , भव्य पर्वताप्रमाणे उंच असलेल्या आणि पाषाण युक्त सभा दालन असलेल्या मंदिराचा उल्लेख आहे. याचा सार्थ त्या काळी मंदिर बांधणी आणि रचना यांची व्यवस्थित घडी बसली होती. देव देवतांना समर्पित मंदिर बांधणे ही एक सन्माननीय आणि अभिमानाची बाब होती असे दिसून येते. . [ S3 ]
· मध्य प्रदेशातील मन्दसौर येथे राजा कुमारगुप्ताचा शिलालेख सापडला आहे, त्यात उल्लेख आहे की 'रेशीम विणकर यांच्या 'श्रेणीने' इसवीसन ४३६ मध्ये दशपूर येथे सूर्यदेवाला समर्पित मंदिर बांधले. मंदिर बांधणे ही एक सर्वमान्य आणि पूर्वापार चालत आलेली गोष्ट होती, आणि त्याला केवळ राजेच नव्हे तर व्यापारी आणि त्यांचे संघ यांचाही पाठिंबा होता हे यावरून सिद्ध होते . [ S4 ]
· लाकूड आणि दगडातील अनेक हिमालयीन मंदिरे दर काही वर्षांनी पुन्हा बांधली जातात. पण तिथे सापडलेल्या शिलालेखात नमूद केलेल्या तारखेच्या आधारे विद्यमान मंदिराची प्राचीनता ठरवता येते. नेपाळमधील चांगू नारायण मंदिराच्या बाबतीत, जरी सध्याची रचना अठराव्या शतकात बांधली गेली असली तरी, भिंतीवर सापडलेल्या एका शिलालेखात या प्रदेशातील राजांचा उल्लेख आहे आणि तो सुमारे इसवीसन ४६४ चा आहे. त्यानुसार हे मंदिर त्या काळापासून ह्याच जागेवर उभे आहे असे म्हणता येईल.
दगडावर अथवा धातूवर लिहिलेले हे लेख म्हणजे प्राचीन ग्रंथ संपदेतील उल्लेख आणि उत्खननात सापडलेल्या वास्तू अथवा शिल्पे या दोन टोकांना सांधणारे पूल आहेत. 'जिओ टॅग' केलेलय संदेशासारखे असणारे हे प्रस्तरलेख आपल्याला स्थान, हेतू आणि काळ या तिन्ही बाबींची एकाचवेळी माहिती पुरवतात.
उत्खननात सापडलेले मंदिरांचे अवशेष
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या निष्कर्षानुसार दगडी बांधकामाची मंदिरे केवळ गुप्त युगात (४०० ईस नंतर) व त्या नंतर आढळतात. पण तरीही या पूर्वी आणि अजून ही, अनेक उत्खननात अशी हरवलेली मंदिरे सापडली आहेत, ज्यांचा इतिहास गुप्तकाळाच्या कितीतरी मागे जाऊ शकतो.
· सासाराम येथील, बिहारजवळील कैमूर टेकड्यावरील मुंडेश्वरी मंदिर हे अष्टकोनी मंदिर वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. आमलक, खांब आणि अनेक शिल्पे यांसारख्या अनेक मंदिरावशेषांनी ह्या टेकडीचा परिसर व्याप्त आहे. हा एक खूप मोठा मंदिर समूह असू शकतो. मुंडेश्वरी मंदिरात चार मुखी शिवलिंग असणे, हे दुसऱ्या शिवमंदिराची शक्यता दर्शवते. मंदिराच्या जागेवर सापडलेल्या एका शिलालेखात नमूद केलेला काळ , राजा व त्याचे राजघराणे , हे तिथेच सापडलेल्या अजून एका श्रीलंकेच्या शिक्क्याबरोबर जुळते आहे . त्यामुळे एएसआयने या मंदिराची स्थापना १08 ईस, मध्ये झाली असल्याचे नोंदवले आहे. हुएन त्सांग या चिनी यात्रेकरुने, पाटणा शहराच्या दक्षिणेकडील टेकडीच्या माथ्यावर असलेल्या एका मंदिराचा उल्लेख केला आहे जो नक्कीच मुंडेश्वरी असू शकतो. [ S5 ]
· उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील लाल-तिलाई येथील उत्खननात शुंग युगात बांधलेले मंदिर सापडले आहे ज्याचा काळ २०० ईपू आहे. या किल्लीच्या आकाराच्या मंदिराच्या जोत्यामध्ये शुंग कालात वापरण्यात येणारे बांधकाम साहित्य आढळले आहे. पुरावेत्त्यांनी या मंदिराचे प्रवेशद्वार, मंडप आणि गर्भगृह या जागा शोधून काढल्या आहेत . [ S6 ]
· जवळच्याच संचनकोट येथे असाच शिवमंदिराचा विटांचा पाया सापडतो . पुरातत्वशास्त्रज्ञांनी कार्बन डेटिंग पद्धतीने या अवशेषांचा काळ २०० इपू ठरवला आहे. मंदिरांच्या अस्तित्वाबद्दल आणि मंदिराच्या परंपरेबद्दल प्राचीन ग्रंथांमध्ये आढळलेल्या संदर्भाची पुष्टी करणारेच हे शोध आहेत हे नक्की. [ S7 ]
· उत्तर प्रदेशातील बिलसार येथे आणखी एका उत्खननात मंदिराचा जिना आणि एक शिलालेख सापडला आहे. त्यानुसार हे मंदिर गुप्त वंशाचा राजा कुमारगुप्त पहिला याच्या काळातील आहे . कुमारगुप्ताचा शासनकाळ ४१५-४५५ ईस होता .
ही अशी अनेक उदाहरणे आणि अनेक उत्खननाच्या निष्कर्षांवरून हे स्पष्ट होते की, मंदिरे भरपूर प्रमाणात आणि विस्तृत प्रदेशावर बांधली जात होती आणि त्यांची पुनर्बांधणी, डागडुजीही वेळोवेळी केली जात होती.
संदर्भ
दृष्टीआडची देवळे – भाग ४
#दृष्टीआडचीदेवळे४
मंदिरातील मूर्तीपूजा हा भारतीय हिंदूंच्या दृष्टीने एक सार्वजनिक उपक्रम आहे अनेक नागरिकांचा सहभाग आहे. देवळात जाणे , मंदिरातील देवतांभोवती विणलेले उत्सव, नवीन मंदिरांचे निर्माण , अशा सर्व घटना गेल्या कित्येक सहस्र वर्षांपासून आपल्या सामाजिक जीवनाचा सहज भाग बनल्या आहेत.
वर्तमानाची कथा आणि व्यथा
सध्याच्या सर्वमान्य आणि पुस्तकी प्रचलित मतानुसार गुप्त काळातील (४०० ईस नंतर) मंदिरे ही भारतातील पहिली मंदिरे आहेत. गुप्त युगापूर्वी मंदिरे अस्तित्वात होती हे कागदोपत्री मान्य असले तरी ही वस्तुस्थिती फारशी ठळकपणे मांडली जात नाही.
एक साधा Google शोध केला तर त्याचे उत्तर असे येते.
“When was the 1st temple built in India?
The Earliest Temples of India
India's Oldest Temple
A small, nondescript shrine, known as Temple No. 17 in the Sanchi Complex, it is dated to around early 5th century CE, during the reign of Gupta dynasty.16-May-2020 “
इंग्रजी मधून पुराणकथा सांगणारे काही लोकप्रिय 'प्रवचनकार' बिनदिक्कतपणे सांगतात की ' भारतीय इतिहासात मंदिरे १५००वर्षांपूर्वी म्हणजे पुराणांच्या रचनेनंतर दिसू लागतात आणि त्यांचा घनिष्ठ संबंध हा सरंजामशाही आणि जमीनअनुदानाच्या पुढे फोफावलेल्या पद्धतींशी आहे. पण हे प्रतिपादन सिद्ध करण्याची ही जबाबदारी मात्र ते घेत नाहीत [ S8 ]
वैदिक काळात (१५००-५०० ईसापूर्व) हिंदू मंदिरे अस्तित्वात नव्हती असे इतिहासकार म्हणतात. इतिहासकार नीरद सी. चौधरी यांच्या मते, मूर्तीपूजेचे संकेत देणारी सर्वात जुनी रचना चौथ्या वा पाचव्या शतकातील आहे.
मंदिर परंपरेविषयी वर्तमान मत तयार करणारे हे काही प्रातिनिधिक नमुने आहेत.
तथापि, सांस्कृतिक स्मृती आणि पारंपारिक ज्ञानासह अनेक भौतिक आणि शास्त्रीय संदर्भांच्या डेटा पॉइंट्सचा विचार करता, आपल्याला या मंदिर परंपरेच्या प्रचलित मताबद्धल पुनर्विचार करावाच लागेल.
गुप्त काळातील मंदिरे ही पहिली 'उभी 'असलेली मंदिरे आहेत हे तर खरेच पण मंदिर बांधणीच्या परंपरेची सुरुवात नक्कीच यापूर्वी अनेको शतके झाली आहे हे निश्चित .
प्रतीकथा
मंदिर परंपरेच्या इतिहासाशी संबंधित वर्तमान कथनात सुधारणा करण्याची गरज का आहे याची येथे चार कारणे आहेत.
****१. साहित्यिक संदर्भांची कालनिश्चिती -
मंदिरांचे विविध ग्रंथांमधील उल्लेख, हे तत्कालीन मंदिर परंपरा आणि देवतांचे पूजन याविषयी सखोल माहिती देतात. ह्या ग्रंथांची कालनिश्चिती करून त्यातील संदर्भ जर काळ-पट्टावर आपण मांडले तर , मूर्तीपूजा आणि मंदिर बांधणीचा अचूक ऐतिहासिक कालक्रम आपल्याला मिळेल. वैदिक ग्रंथ( वेद, ब्राह्मणे , आरण्यके, उपनिषदे , महाभारत, पुराणे आणि त्याचबरोबर अष्टाध्यायी किंवा अर्थशास्त्र यांसारख्या ग्रंथांमधील संदर्भांचा काळ हा त्यातील संस्कृत भाषेच्या शैलीवर आणि त्याच ग्रंथातील इतर धर्मग्रंथ, राजे यांचे व इतर भौगोलिक उल्लेख यांच्या आधारे ठरवला जातो.
प्राथमिक अडचण अशी आहे की या ग्रंथांच्या कालखंडाविषयी विद्वान आणि इतिहासकारांमध्ये एकमत नाही. वेगवेगळ्या तज्ज्ञांनी त्यांच्या स्वतःच्या मतांवर आणि निष्कर्षांवर आधारित वेगवेगळ्या कालखंडामध्ये हे साहित्य बसवले आहे.
उदाहरणार्थ, ऋग्वेद, हे सर्वात जुने वैदिक साहित्य मॅक्समुलरनुसार १५००ईसापूर्व , जेकोबी नुसार ३००० ईसापूर्व तर लुडविग या विद्वानानुसार ११००इसापूर्व आहे. अगदी अलीकडील विद्वानांनी ऋग्वेदकाळ हा ६०००-७००० ईपू पण असू शकतो असे मत मांडले आहे [ S9 ]
महाभारत, रामायण आणि पुराणे ज्यामध्ये मंदिरांचे भरपूर उल्लेख आहेत त्यांचा प्रचलित माहितीनुसारच कालखंड हा त्यांचा संकलनाचा कालखंड आहे. उदाहरणार्थ महाभारत ४०० ईसापूर्व ते ४०० ईस पर्यंत रचले गेले असे प्रचलित मत आहे. पाणिनी आणि पतंजली यांचा काळ तर निर्णायकपणे ठरवताच येत नाही. [ S10 ]
परिणामी, त्या ग्रंथांमध्ये नमूद केलेली मंदिर परंपरा, प्रचलित मतानुसारच्या कालखंडाच्याही मागे, त्या पूर्वीच्या शतकांमध्ये आणि युगांमध्ये शोधली जाऊ शकते.
****२. शिलालेखीय पुराव्यांची मर्यादा
शिलालेखांचा काळ हा त्यात नमूद केलेल्या तेव्हाच्या प्रचलित दिनदर्शिकेचे (शक किंवा संवत) वर्ष याच्या आधारे ठरवला जातो. असा वर्षाचा उल्लेख नसल्यास, लेखातील अक्षरांचे आकार आणि स्वरूप तसेच समकालीन राजांच्या उल्लेखाचा वापर करून शिलालेखाची तारीख निश्चित केली जाते. सध्याच्या समजुतीनुसार, मौर्य काळापूर्वीचे म्हणजे (३००ईसापूर्व) च्या मागचे शिलालेख अजून सापडलेले नाहीत.
महत्वाची गोष्ट अशी कि त्याच वेळी, २०० ईपू ते २०० ईस या कालखंडातील अनेक शिलालेखामध्ये, भारतभरच्या मंदिरांचे आणि देवतांचे , तसेच मंदिर बांधकाम आणि पुनर्बांधणी यांचे उल्लेख आहेत. [ S11 ] उदाहरणार्थ, मथुरा येथे सापडलेला 'वासु दरवाजा' आणि 'मोरा विहीर' शिलालेख यामध्ये ज्यात वासुदेवाच्या मंदिरांचा उल्लेख आहे जो इतरही शिलालेखांमध्ये आहे. ओडिशातील खारवेलच्या प्रसिद्ध हाथीगुंफा शिलालेखात त्याचा उल्लेख 'मंदिरांची दुरुस्ती करणारा' असा आहे. राजस्थानातील घोसुंडी शिलालेखात नारायण या देवतेच्या वाटिकेचा उल्लेख आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे सापडलेल्या शिलालेखात भगवती आणि सप्तमातृका मंदिराच्या बांधकामाचा उल्लेख आहे.
याचा अर्थ इसवीसनापूर्वीच भारतीय उपखंडामध्ये एक व्यापक मंदिर परंपरा नक्कीच अस्तित्वात होती. मंदिरे बांधण्याचा आणि जतन करण्याचा दीर्घकालीन इतिहास असण्याची शक्यता हे त्या काळातील दुरुस्ती आणि पुनर्बांधणीच्या उल्लेखांवरून सिद्ध होते. त्यामुळे मंदिराची परंपरा निश्चितपणे इसवीसनपूर्व 300 च्या ही बरीच आधीची असेल असे म्हणता येते.
*****३. मंदिरांचे पुरातत्वीय पुरावे
गुप्त युगापूर्वीच्या मंदिराच्या मंडपांचे उत्खननात सापडलेले अवशेष म्हणजे जोती, पाया , खांब वगैरे , याचबरोबर आपण बघितलेले इतर साहित्यिक आणि शिलालेखीय उल्लेख जे गुप्ता युगाच्या पुष्कळ आधीचे आहेत, त्यावरून मंदिरे हे फार फार पूर्वीपासून समाजाचा भाग होती असे म्हणता येते.
मंडगपट्टू गुंफा मंदिरातील महेंद्रवर्मन पल्लव (६००-६३० ईस) यांच्या शिलालेखातून स्पष्ट होते की त्यापूर्वी मंदिरे दगड, वीट, लाकूड किंवा धातू या साधनांनी बांधली जात होती. [ S12 ]
****४. 'सुरुवातीची' मंदिरांमधील शिल्पशास्त्रीय प्रगती.
गुप्त काळातील मंदिरे, ही प्रचलित समजुतीनुसार, संरचनात्मक मंदिर परंपरेची सुरुवात मानली जातात. ही मंदिरे लहानखुरी आणि फारशी विस्तृत नसल्यामुळे त्यांना आदिम ही म्हटले जाते . देवगड, सांची, नाचना येथील या मंदिरांमध्ये फक्त गर्भगृह, अतिशय साधे किंवा तुटलेले शिखर आणि एखादा सभा-मंडप एवढीच संरचना दिसून येते.
तथापि, देवगड मंदिराच्या भिंतीवरील शेषशायी विष्णू, तसेच त्याच मंदिरातील आयुधपुरुषांची संकल्पना, भुमरा येथील अत्यंत सुशोभित एकमुखी शिवलिंग या शिल्पशास्त्रीय दृष्टीने अत्यंत विकसित कल्पना आहेत आणि त्या दीर्घकाळ व्यवहारात असल्याखेरीज त्यांचे नेटके अंकन अशक्य आहे. त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या शिल्प-परंपरेच्या या उत्तराधिकारी मंदिरांना 'भारतातील मंदिर परंपरेची सुरुवात' मानणे किंवा त्यांना 'आदिम' म्हणणे साफ चुकीचे आहे.
इतिहास समजून घेताना जसे नवीन पुरावे समोर येतात किंवा नवीन व्याख्या माहित होतात तेव्हा शास्त्रोक्त कालनिर्णयामध्ये फेरफार होऊ शकतो.आणि त्यामुळेच तथ्य आणि तर्कांच्या आधारे समावेशक निष्कर्ष काढून प्रचलित कथनामध्ये बदल करणे आवश्यक ठरते.
त्यामुळे सध्या, भारतीय उपखंडातील मंदिर परंपरेचा इतिहास प्रचलित मतापूर्वीच्या शतकांमध्ये , नवीन संशोधन , नवीन उत्खनन आणि नवीन तर्कांद्वारे शोधला जाऊ शकतो असे प्रतिपादन नक्कीच करता येते. .
शेवटी काय, आपण या अनंतप्रवाही काळाचे प्रवासी आहोत. आपल्या मर्यादित ज्ञानाने, आपण आपल्या प्राचीन नातेवाईकांचे जीवन उलगडण्याचा प्रयत्न करतो आहोत. थोडे शोधणे, थोडे अधिक जाणून घेणे, नवीन दृष्टिकोन समजून घेणे आणि याबदल्यात हा 'शोधाचा आनंद' मिळणे हेच तर या प्रवासाचे फलित आहे!
संदर्भ
[ S9 ] History of ancient and early Medieval India -Upinder Singh
-मनीषा चितळे
Comments