माझे नदी-स्तोत्र

मानस सरोवराचे अमृतकण निळ्या हिरव्या पाण्याच्या लहरीमंध्ये लपेटून , विक्राळ दऱ्याखोऱ्यांतून वाट काढत , सावलीसाठी शोधले तिने देवदारू
सहस्रकांच्या साक्षीने फुलवले जीवनाचे बगीचे आणि पंचनदाच्या ओढीने ओलांडले सिंध-पंजाब चे प्रदेश, दोन तीरांमधे जणू सामावला सागर, त्यावर रुंजणारे ऋचांचे भग्न स्वर ,ती,नदीतमा, वायव्य-सीमा सिंधू ||
जीर्ण पानांवरती रेखाटलेल्या तीर्थ खुणा आणि शतकांच्या आठवणीने जागते ठेवतेले काही नदीतीर..
भूतकाळाच्या वाळवंटात स्वत:ची ओळख विसरलेली सरस्वती, अजूनही भेटते त्रिवेणी संगमावर, आणि स्थानेश्वरच्या कुंडामध्ये,
कधी हिमालयाच्या दुर्गम वळणावर प्रपातासमान रोरावत तर कधी द्विषद्वतीच्या साक्षीने, घग्गरच्या शुष्क पात्रात झिरपत.. ||
स्वर्गाचे राज्य सोडून, पूर्वपयोधीच्या ओढीने, भूमीवर अवतरलेली गंगा, तिच्या वाराणसीच्या घाटाजवळ रेंगळणार्या संथ लाटा॥
तिच्या सहस्त्र करांनी देऊ केलेले मोक्षाचे दान आणि उघडलेले मुक्तीचे द्वार, घेणारे हात ही हजार, वारंवार.. ||
हिमालयाच्या अंगणामधले, बंध जुने पण वीण उसवली ,
सरस्वतीचे गुपित मोठे, गंगार्पण करते कालिंदि
श्यामल डोही, मंद दुपारी कृष्ण सख्याची हसरी बासरी ,
यमुनामाई संथ वाहते प्रारब्धाच्या ताज महाली ||
विंध्याच्या साथीने आणि सातपुड्याच्या काठाने, ही रेवा, ही नर्मदा, कधी अवखळ धुवांधार कोसळणारी तर कधी शूलपाणीच्या जंगलात हरवलेली
किती प्राचीन, किती पवित्र, दोन्ही तीरावर शिवलिंगांची गर्दी, आणि चालणार्या पावलांना नर्मदेची साद सांगाती ||
त्त्र्यंबकेश्वराच्याआशीर्वादाने सुरू झालेला जीवन प्रवास, रामाच्या सहवासाने पुनीत झालेले जलकण, ज्ञानदेवाच्या प्रांगणात ओंजळीत पडलेले शब्दब्रह्म, गोदावरीचे प्राक्तनच भाग्याचे!
तीरावर घडलेल्या गाथा, महाकांतारातून काढलेली दुर्गम वाट, दगडाधोंड्यावर फुलवलेले मळे आणि मंदिरांचे कळस उभे, गोदेचे आभाळ गोंदलेले ||
गर्द हिरव्या झाडीतून, पश्चिमाद्रीच्या जंगल-घाटातून, डौलदार उतरणारी दक्षीण-स्वामिनी
कावेरी
, श्रीरंगाच्या पायाशी तिची अवचीत मिठी
शिल्पसुमनांचे सान्निध्य आणि भक्तीचे भवताल, कुंभकोणम, चिदंबरम आणि कितीतरी.. होयसळ-पल्लव-चोळांची ही जीवनरेखा जरतारी.. ||

-मनीषा 

Comments