जोड-देवळे
भारतभरातली देवळे उत्सुकतेने प्रत्यक्ष पाहताना किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यासताना, त्यांची भव्यता, सौंदर्य, इतिहास, आजूबाजूचा भूगोल याबरोबरच त्यांच्या वैशिष्ट्यांची पण मनामध्ये नकळत नोंद होत असते. काही एकेकटी, निर्जन रानावनात तर काही भर वस्तीमध्ये, काही उंच ,भव्य पण ओसाड तर काही लहानशी, साधी सुधी पण जागती गाजती. काही समूहानी एकत्र, एकसारखी तर काही समूहामध्ये पण सगळी वेगळ्या धाटणीची, काही आखीव-रेखीव पंचायतन तर काही विखुरलेली, लहान मोठी पण मोठ्या देवळाभोवतीची ! असे अनेक कंगोरे ह्या देवळांच्या प्रवासामध्ये आपल्या नजरेमध्ये येतात आणि मनामध्ये रेंगाळत राहतात. त्यातलाच एक कंगोरा म्हणजे 'जोड-देवळे'.
भारतात अनेक ठिकाणी आपल्याला शेजारी शेजारी बांधलेल्या देवळाच्या जोड्या दिसतात. त्यातले प्रत्येक मंदिर हे स्वयंपूर्णच असते पण तरीही त्याचे अस्तित्व हे दुसऱ्या शेजारच्या भावंड-मंदिराशी अगदी घट्ट विणलेले असते. बघणारा देखील ह्या मंदिरांकडे एकत्रच बघतो. ही मंदिरे एकाच वेळी बांधलेली असतात आणि त्यांच्या सह-अस्तित्वामागे काही हेतू देखील असतो.
**सास बहू मंदिर नागदा, राजस्थान
मेवाड अरवलीच्या पर्वतराजीमध्ये उदयपूर पासून थोडेसे उत्तरेला नागदा नावाचे छोटेसे खेडे आहे. पूर्वी नागद्रह नावाने ओळखली जाणारी ही मेवाडची प्राचीन राजधानी. ह्या गावाचे उल्लेख सातव्या शतकापासून सापडतात. इथे आहे एक जोड-देऊळ, ज्याला सास-बहु मंदिर ह्या नावाने ओळखले जाते.,
प्रत्यक्षात हे सहस्रबाहु मंदिर आहे. सहस्रबाहु हे विष्णूचे एक नाव आहे. दुसरे मंदिर शंकराचे असावे असे एका दंतकथेवरून वाटू शकते. दोन्ही मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये मूर्ती नाहीत, ती आक्रमकांची ( इल्तुमिश) करणी आहे.सध्या दोन्ही मंदिरे पडल्या झडल्या अवस्थेमध्ये असली तरी त्यावरील अनुपम नक्षीकाम, झरोके, सज्जे आणि जाळ्या यांची चित्तवेधकता अबाधित आहे. समोर वाघेला तलावाचे हिरवेगार पाणी आणि नजरबंदी करणारे अनुपम देखणे मकर तोरण, जरा ह्या देवळापासून लांब उभेसे. मंदिरावर ब्रह्मदेव, शिव, विष्णू यांचे अंकन दिसते. दोन्ही मंदिराच्या आवारामध्येच एक शिवलिंगही स्थापन केलेले दिसते. ही मंदिरे दहाव्या शतकामध्ये बांधली गेली असावीत असा अभ्यासकांचा कयास आहे.
**सास बहू मंदिर , ग्वाल्हेर,मध्य प्रदेश
सहस्रबाहु हा शब्दाचा अपभ्रंश होऊन त्यांना सास-बहू म्हटले जाणे हे ग्वाल्हेरच्या किल्यावरच्या जोडमंदिराबाबतही घडले आहे. मावळत्या सूर्याच्या उन्हामध्ये झळाळून उठून दिसणारी ही किल्याच्या पूर्व तटबंदीच्या निकटची मंदिरे म्हणजे भारतीय मंदिरस्थापत्याचा अजोड नमुना आहेत. अलीकडचे भव्य ऐंशी फुटी उंचीचे विष्णू मंदिर, त्याचे वळणदार पायर्यांनी सजलेले प्रवेशद्वार, आतील अनेकोनेक उंच खांब , त्याच्या पायतळी रेखीव अप्सरामूर्तीचा वेढा..
आणि शेजारचे निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उभे बदामी रंगाचे नेटके आणि सुघड असे अती रेखीव दुसरे मंदिर! दोन्ही मंदिरे विष्णूची असून, कच्छपघट राजांच्या कारकिर्दीमध्ये १० व्या अथवा ११ व्या शतकामध्ये बांधली गेली असावीत. महिपाल राजाच्या इस १०९३ मधील शिलालेखाप्रमाणे हे पद्मनाथाचे म्हणजे विष्णूचे निवासस्थान आहे. सध्या दोन्ही मंदिरांमध्ये गाभारा भग्नावस्थेत आणि मूर्तीविहीन आहे. पण नागर शैलीचा उत्कृष्ट नमुना असणारी ही दोन्ही मंदिरे, स्थापत्य आणि इतिहास या दोन्ही दृष्टीने महत्वाची आहेत.
**जोडा -मंदिर, बैहर, मध्य प्रदेश
बालाघाट जिल्ह्यामध्ये, कान्हा अभयारण्याजवळ, महामार्गाच्या एका वळणावर, साल झाडांच्या सहवासात आणि टुमदार घरांच्या सोबतीने एक पुरातन मंदिरांची जोडी उभी आहे. एकमेकांसमोर प्रवेशद्वारे असलेली ही दोन मंदिरे मध्यम उंचीची आहेत. उन्हा-पावसाने आणि एकूण दुरवस्थेने त्यांची दीनवाणी अवस्था असली तरीही, त्यांच्या कलात्मक दैवी अस्तित्वाने त्या परिसराला एक वेगळेच ऐतिहासिक परिमाण बहाल केले आहे . ही दोन शिव मंदिरे आहेत आणि त्यांच्या नागर शैलीच्या धाटणी वरून १० व्या शतकातली असावीत असा कयास आहे. त्याच्या विषयी कुठे शिलालेख अथवा उल्लेख सापडत नाही. जवळपासच्या लोकांकडे चौकशी केली असता ते एक 'सरकारी' देऊळ आहे असे कळले, बाहेरचा ASI चा फलक आणि बंद दरवाजा यावरून हे लोकांच्या वहिवाटीचे देऊळ नसावे असेच वाटले.
**तट मंदिर, महाबलीपूरम, तामिळनाडू
पूर्व सागराच्या उसळत्या लाटांचा आवाज ऐकत उभे हे अजून एक जोड-मंदिर! द्राविड शैलीची , ग्रॅनाईट दगडांमधली,ही जवळजवळ उभी अशी दोन मंदिरे, शिव आणि विष्णू ह्या दोन देवतांना समर्पित आहेत. एका मंदिरामध्ये शिवलिंग तर दुसरीकडे अनंतशयनी विष्णूमूर्ती आहे. बलाढ्य पल्लव राजांच्या कारकिर्दीमध्ये साधारण आठव्या शतकामध्ये ही मंदिरे बांधली गेली. मंदिराभोवतीच्या प्राकार भिंतीवर, असंख्य नंदीमूर्तीचे अंकन आहे. ह्या मंदिरावरती द्राविड शैलीचे कळस असले तरी त्यांची आकाशाकडे झेपावणारी, निमुळती होत जाणारी शिखरे नागर शैलीच्या शिखरांची आठवण करून देतात.
**होयसळेश्वर, हळेबीड, कर्नाटक
हळेबीड म्हणजे पूर्वीचे द्वार-समुद्र , इथले होयसळेश्वर मंदिर हे होयसळ स्थापत्याचा एक विलक्षण सुंदर अविष्कार आहे. दोन्ही मंदिरे एकसारखी असून दोन्हीकडे शंकर ही अधिष्ठात्री देवता आहे आणि दोन वेगळे नंदी मंडप सुध्दा आहेत. अतिशय बारीक कलाकुसरीच्या ह्या देऊळ बांधकामाच्या शैलीला वेसर असे म्हणले जाते, ज्यात नागर आणि द्राविड शैलींचा मिलाफ असतो. इथे ह्या दोन मंदिरांना जोडणारा एक शांत सावलीचा, काळ्या दगडांचा ,शेकडो झरोक्यातून डोकावणाऱ्या उन्हाच्या तेजफुलांनी सजलेला लांबच लांब जोडमार्गही आहे. विष्णूवर्धन होयसळ राजाच्या कालखंडामध्ये ११६० साली हे भव्य द्विकूट मंदिर बांधले गेले.
या पलीकडेही भारतामध्ये ओडिशा, तामिळनाडू इथे काही जोड मंदिरे आहे. हळेबीडचा अपवाद वगळता बाकी सारी मंदिरे ही 'स्मारक' ह्या स्वरूपामध्ये पर्यटकांच्या कुतूहल-नजरा झेलत, आपला भूतकाळ विसरून गेलेली आहेत. तिथे ना पूजा होते, ना धुपाचा दरवळ, ना बाहेर फुलांचे -नारळाचे दुकान !
गेल्या काही शतकांमध्ये,ह्या मंदिरांवर आक्रमकांचे घाव बसल्याने ती उजाड झाली आहेत. समाजाच्या स्मृतींमधून तर ती नक्कीच विसरली गेली आहेत. शिव आणि विष्णू सोडता इतर देवता या जोड मंदिरांच्या अधिष्ठानामध्ये दिसत नाहीत. साधारण इस ७००-१२०० ह्या कालखंडानंतर अशी जोड मंदिरे ही फारशी दिसत नाहीत.
जोड मंदिर बांधण्यामागे केवळ स्थापत्य सौंदर्य हे एकाच कारण असू शकत नाही. पण त्यामागची प्रेरणा व संकल्पना आपल्याला अजूनही तितकीशी स्पष्ट झालेली नाही.
संदर्भ
Art of ancient India – Susan Huntigton
Internet Archives
The Imperial Gazetteer of India
Published previously at
https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/?multi_permalinks=3051951595091374¬if_id=1618553099366726¬if_t=feedback_reaction_generic&ref=notif
Comments