सरस्वती- स्मृती
हरियाना, पंजाब, उत्तर राजस्थान, थर आणि चोलीस्तान चे वाळवंट, सौराष्ट्राचा भाग आणि कच्छ..
हाच तो भूप्रदेश आहे जिथून जुन्या सरस्वती नदीच्या जल-खुणा साहित्याच्या आधारावर आपल्या मनामध्ये टिकून आहेत.
सतलज आणि यमुना यांनी सरस्वतीशी फारकत घेतली ती काही भौगोलिक घडामोडींमुळे. सतलजचे वैदिक नाव होते शतद्रू म्हणजे शतधारांनी वाहणारी, नावाप्रमाणेच सतलज अनेक धारांनी हिमालयामधून अवतरून कधी बियास नदीला भेटे, तर कधी सरळ समुद्रापर्यंत पोहोचे तर कधी थोडी पूर्वेकडे घग्गरला मिळत असे. सध्या मात्र रुपड/रुपनगर जवळ दक्षिण वाहीनी सतलजचा प्रवाह एकदम दिशा बदलून पश्चिमेकडे वळतो.
सतलज आणि यमुना यांनी सरस्वतीशी फारकत घेतली ती काही भौगोलिक घडामोडींमुळे. सतलजचे वैदिक नाव होते शतद्रू म्हणजे शतधारांनी वाहणारी, नावाप्रमाणेच सतलज अनेक धारांनी हिमालयामधून अवतरून कधी बियास नदीला भेटे, तर कधी सरळ समुद्रापर्यंत पोहोचे तर कधी थोडी पूर्वेकडे घग्गरला मिळत असे. सध्या मात्र रुपड/रुपनगर जवळ दक्षिण वाहीनी सतलजचा प्रवाह एकदम दिशा बदलून पश्चिमेकडे वळतो.
Westward turn of Satluj |
यमुना नदी ही दोन प्रवाहानी वाहते असे उल्लेख आहेत. त्यातला एक प्रवाह काही काळ सरस्वती-घग्गर ला मिळत असे. त्यामुळे गंगा-यमुना त्रिवेणी संगमामध्ये सरस्वतीच्या अस्तित्वाचे कारण हे बहुदा यमुनेच्या प्रवाहाबरोबर सरस्वती पण गंगेस मिळाली असे सांस्कृतिक संचित असू शकते. आता बघितले तर पोन्तासाहिब येथे शिवालिक पर्वतामध्ये निर्माण झालेल्या खाचेमुळे यमुना वळण घेऊन सरळ पूर्वेकडे वळली आहे असे दिसते.
Eastward Yamuna |
सरस्वती नदीच्या प्रवाह नक्की कुठून आणि कसा वाहत असे याविषयीची विविध पुरावेत्ते, शास्त्रज्ञ यांची मते वेगवेगळी असून विचार करायला लावणारी आहेत. शिवालिक पर्वतराजी मध्ये उगम पावणाऱ्या सरस्वतीला, शत्राना येथे पश्चिमेकडून घग्गर आणि सतलज येऊन मिळत असे तर पूर्वेकडून यमुना. पुढचा सरस्वतीचा प्रवाह हा घग्गरच्या पात्रामधून सिरसा, हनुमानगड-सुरतगड–अनुपगडमार्गे पुढे पाकिस्तानात फोर्ट अब्बास– आणि नन्तर हाक्रा नदी आणि त्याहून पुढे नारा नदी असा प्रवास करून कच्छच्या रणापाशी अरबी समुद्रास मिळत असे. भारतीय सीमेलगत, अनुपगड इथे चौतांग म्हणजे पूर्वीची द्विशद्वती ह्या घग्गर-सरस्वतीला येऊन मिळते. हा झाला अनेक अभ्यासकांच्यामते पूर्वीच्या सरस्वतीचा समुद्रापर्यन्तचा मार्ग.
भूगर्भ तज्ञ के एस वालदिया यांच्या मते शिवालिकमधून येणाऱ्या सरसुतीला, टोन्स किंवा तमसा ही हिमालयीन उगमाची यमुनेची उपनदी मिळत असावी. पुढे यमुना बहुदा पश्चिम कालव्याच्या प्रवाहाने ह्या सरसुतीला मुस्तफाबाद/सरस्वतीनगर येथे मिळत असावी. पुढे घग्गरचे ३ ते १० किमी रुंद पात्र आणि चोलीस्तान वाळवंटामध्ये १६-२४ किमी रुंद झालेले हाक्राचे पात्र आणि त्याहीपुढे नाराचा शकूर सरोवर म्हणजेच कच्छचे रण यामध्ये मिळणारा प्रवाह पाहता हीच पूर्वीची सरस्वती असावी असे मत त्यांनी मांडले आहे.
काही अभ्यासकांच्यामते सरस्वतीने किमान तीनदा तरी प्रवाह बदलले असून ती सुरुवातीस अधिक पूर्वेकडून म्हणजे नोहर-सरदारशहर-डुंगरगड–नोखा–पचपदरा अशी जवळपास मारवाडच्या मध्यातून वाहत असावी. कालांतराने सरस्वती सिरसा-अनुपगड-खुइवला-खानगड–खिप्रो नंतर नाराच्या मार्गाने समुद्रास मिळत असे. त्यापुढील काळात हा प्रवाह उत्तर-पश्चिमेकडे सरकून वर उल्लेखलेल्या मार्गाने समुद्रापाशी पोहचत असे. काही अभ्यासक पचपदरा ह्या राजस्थान मधल्या गावाच्या नावाकडे लक्ष वेधून असे सांगतात कि पच-पदर म्हणजे पंच-भद्रा असून हे नाव पाच नद्यांच्या संगमाचे द्योतक आहे. तिथली लुणी म्हणजे लवणावती आणि पाटण-सिद्धपुर कडून येणारी सरस्वती हीच मूळची सरस्वती जलप्रणाली असावी असा त्यांचा कयास आहे.
काहींच्या मते तर अफगाणिस्तानातील हेलमंड म्हणजे सरस्वती !
अशा ह्या हुलकावणी देणाऱ्या गूढ सरस्वतीने आजही परंपरा, खंडहर आणि गाव-नद्या-तळी यांची नवी-जुनी नावे यामधून आपल्या पुसल्या गेलेल्या अस्तित्वाच्या कितीतरी खुणा मागे सोडल्या आहेत. भारतीय वैदिक आणि इतर साहित्यात नावाजलेली सरस्वती नदी लोकांच्या मनातून तर कधीच विसरली गेली नव्हती.
हिमालयाच्या पायथ्याशी बिलासपुर जवळचे कपाल-मोचन तीर्थ, फरल चे फल्गुतीर्थ ही सरस्वती काठची ठिकाणे महाभारतापासून अजुनही त्याच नावानी ओळखली जातात आणि भाविक तिथे गर्दीही करतात. स्थानेश्वर म्हणजे आजचे ठाणेसर-कुरुक्षेत्र इथे पावन सरस्वती कुंड आहे. हरियाना मधले पेहोवा म्हणजे पूर्वीचे पृथ्योदक, हे सरस्वतीकाठचे तीर्थ म्हणून महाभारत-पुराणांमध्ये उल्लेखलेले, आजही तिथे सरस्वती नदीच्या स्नानाचे माहात्म्य आहे. सिरसा हे नावच मुळी सरस्वतीपट्टण ह्या जुन्या नावावरून आले आहे. सध्याच्या पाकिस्तानातील, चोलीस्तान वाळवंटामध्ये हाक्रा-नारा नदीच्या जवळ पट्टण (रहीम यार खान) इथे जुन्या नगरीचे भग्न अवशेष सापडले आहेत. ह्याच ओसाड मरुभूमध्ये डेरावर, फोर्ट अब्बास, मीर गड असे काही मध्ययुगीन भक्कम किल्ले बरोबर हाक्राच्या वालुकामय प्रवाहाच्या वक्राकार सीमेवर उभे आहेत. डेरावर हा तर आठव्या शतकामध्ये बांधलेला किल्ला, तज्ञांच्या मते तिथे सहजी मिळणारे भूगर्भ-जल आणि त्यावरच कब्जा हेच ह्या किल्ल्यांचे महत्व होते.
अगदी प्राचीन अशा सिंधू-संस्कृतीची कित्येक ठिकाणे सरस्वती-द्विशद्वतीच्या काठावर आढळतात. कालीबंगान, राखीगढी, गनेरीवाला ही प्रगत सिंधू संस्कृतीची द्योतक ठिकाणे ह्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये वसली होती आणि नंतर उध्वस्तही झाली. किंबहुना ह्या वाळवंटी प्रदेशामध्ये सापडणाऱ्या सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थलान्मुळेच इथे त्यांना जीवन देणारी मोठी नदी असली पाहिजे असे अनेक अभ्यासकांचे मत झाले आहे. त्याबरोबरच ह्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात सापडलेल्या अवशेषांमुळे अनेक संशोधक त्या पाच हजार वर्षे जुन्या ठेव्याचा सिंधू-सरस्वती संस्कृती असा उल्लेख करू लागले आहेत.
चोलीस्तानमध्ये हाक्रा-नारा प्रवाहाला समांतर पूर्वेस अनेक छोट्या मोठ्या तळ्यांचे समूह दिसतात. रेताड मातीचे वाळवंट आणि मध्ये ही खाऱ्या-गोड्या पाण्याची तळी हे एक आश्चर्यच आहे. पाकिस्तान मधील नाराच्या जवळ चोटीयारी हा तर वाळवंटी सरोवरांचा गुच्छच आहे. त्यातली काही कधीतरी पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे, कधी हाक्रा मधून वाहत आलेल्या पुराच्या पाण्याने वा कधी नारामध्ये आणलेल्या सिंधूच्या पुराने निर्माण झाली असली तरी तिथले भूगर्भ जल अजूनही टिकून आहे याची साक्ष नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालाने मिळाली आहे.
आज पण राजस्थानात मारवाडच्या मरुभूमी मध्ये कित्येक छोटीमोठी गावे आपल्या नावामध्ये 'सर' हे सरोवरवाचक पद लावताना दिसतात. दीपालसर, खिमसर, नापसर अशी अनेक खेडी गावे हरियाना ते मारवाड अशा ईशान्येपासून नैऋत्येकडे जाणाऱ्या पट्ट्यामध्ये दिसतात.. तसाही सरस्वतीचा एक अर्थ, सरस म्हणजे तळ्यांनी तयार झालेली नदी असा पण आहेच.
एवडेच काय पण भारतभर विखुरलेले सारस्वत ब्राह्मण, त्यांचे मूळ वसतीस्थान सरस्वतीच्या किनाऱ्यावर होते असे मानतात. काश्मिरी पंडित, पंजाबचे मोह्याल ब्राह्मण आणि गोवा-कारवार चे सारस्वत ह्या सर्व समूहांनी वर्षानुवर्षांच्या स्मृती अजूनही जाती नामातून, पुरा-कथांमधून आणि परंपरांमधून जपून ठेवलेल्या दिसतात.
अशी ही नदीतमा सरस्वती – स्मृती, संस्कृती आणि पृथ्वी, अशा त्रिवेणी अस्तित्वाची महानदी !
काही संदर्भ
• Kar, A. 2016. Looking back at the discovery of Saraswati River system
through Thar Desert. In, Workshop Volume, Ground Water Sustainability in Palaeochannels,
pp. 35-46. Central Ground Water Board, Western Region, Jaipur.
• Valdiya, K.S. 2002. Saraswati: The River That Disappeared.
Universities Press, Hyderabad.
• The Lost river – Michel Danino
नकाशा आंतरजालावरून साभार
भाग -३
Comments