सरस्वती – सुरुवात


“गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती”
लहानपणापासून ऐकलेल्या या स्तोत्रामुळे आपल्याला सरस्वती नदीची अंधुक ओळख पटलेली असते. गंगा , यमुना आणि सरस्वती यांचा प्रयाग ला त्रिवेणी संगम आहे, तिथे ही सरस्वती गुप्त रूपाने वाहते अशी कथा पण कधीतरी कानावर पडलेली असते.
अशी ही सरस्वती नदी लिखित साहित्यामध्ये रोरावत फुंफाटत, पर्वतांपासून समुद्राला मिळते ती सर्वप्रथम ऋग्वेदाच्या ऋचांमध्ये!
वैदिक लोकांची सरस्वती ही सर्वात आवडती नदी म्हणता येईल इतकी सूक्ते-काव्ये ह्या नदीच्या प्रवाहावर रचली गेली आहेत. खूप खळखळाट करून वाहणारी आणि प्रचंड मोठे पात्र असलेली ही नदी सप्तसिंधूच्या प्रदेशातली मुख्य नदी असावी. हिच्या तीरांवर ऋषी मुनींचे आश्रम होते आणि तिथे ज्ञानदानाची आणि विद्वत-चर्चांची सत्रे होत असत असे उल्लेख आहेत.
ऋग्वेदा मधल्या नदीस्तुती सुक्तामध्ये (10.75) पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पार कराव्या लागणाऱ्या उत्तर भारताच्या नद्यांचे वर्णन आहे. ह्यात यमुने नंतर आणि सतलजच्या आधी सरस्वतीचा उल्लेख येतो.
इमं मे गङगे यमुने सरस्वति शुतुद्रि सतेमं सचता परुष्ण्या |
असिक्न्या मरुद्व्र्धे वितस्तयार्जीकीये शर्णुह्यासुषोमया ||
तर्ष्टामया परथमं यातवे सजूः ससर्त्वा रसयाश्वेत्या तया |
तवं सिन्धो कुभया गोमतीं करुमुम्मेहत्न्वा सरथं याभिरीयसे ||
वेद संहितांमध्ये जे सरस्वतीचे उल्लेख आहेत ते एका मोठ्या , प्रवाही आणि समुद्रापर्यंत पोचणाऱ्या नदीचे आहेत.
वेदांपासून ब्राह्मण ग्रंथांपर्यंत काही काळखंडांचे अंतर असल्यामुळे, त्या काळात घडलेल्या भौगोलिक घडामोडींचे पडसाद पुढील साहित्यामधील उल्लेखांमध्ये दिसून येतात. आता सरस्वती ही महत्वाची नदी असली तरी ती कधी कधी वाळवंटामध्ये लुप्त होते. तिच्या गुप्त होण्याच्या ठिकाणाला विनशन हे नाव आहे. पुढील साहित्यामध्ये जसा काळ सरकतो तसे हे विनशन अधिक पूर्वेकडे सरकत जाऊन कुरुक्षेत्रापाशी स्थिर झालेले दिसते.
सरस्वतीचे भरपूर उल्लेख महाभारतामधेही आहेत. ऋग्वेदात जोमाने वाहणारी ही नदी, महाभारतामध्ये मात्र रोडावली आहे , कुठे तळे तर कुठे तलाव या स्वरूपात आहे तर कुठे कुठे लुप्तही झाली आहे.
महाभारतामध्ये कृष्णाचा भाऊ बलराम याने सरस्वती यात्रा केली आणि दुर्योधन-भीम ह्यांच्या निर्णायक युद्धाच्या वेळी तो युद्धक्षेत्रावर हजर झाला. ह्या प्रदक्षिणेमध्ये सरस्वतीच्या काठावरच्या अनेक तीर्थांचे उल्लेख आहेत.
सरस्वती समुद्राला मिळते ते प्रभास आज ही त्याच नावाने ओळखले जाते. तिथे एक छोटीशी नदी आजही समुद्राला मिळते जिचे नाव सरस्वती आहे. तिथून बलरामाचा प्रवास साधारण उत्तरेच्या दिशेने सुरु होतो. चमसोद्भेद तीर्थ , नंतर उद्दापन तीर्थ इथे सरस्वती हरवलेली आहे , पुढच्या विनशन तीर्थामध्ये तर ती तिथल्या वाळूमध्ये लुप्त झाली आहे असे महाभारत म्हणते. पुढे सुभूमिका तीर्थामध्ये नदी पुन्हा प्रकट झालेली दिसते आणि तिथली जमीन झाडाफुलांनी बहरलेली दिसते. पुढे गर्गास्रोत, सांख्यया तीर्थानंतर द्वैत सरोवराचा उल्लेख येतो. सरस्वती नैमीषारण्याला वाचवण्यासाठी कधी पूर्वेकडे तर कधी पश्चिमेकडे वळली आहे. आताच्या भूगोलाशी या माहितीचे संदर्भ दरवेळी जुळवता येतात असे नाही पण त्यातून सरस्वतीच्या लयाच्या प्रक्रियेची थोडी माहिती नक्की होते.
महाभारतामध्ये एक सप्त-सारस्वत अशी संकल्पना येते. यामध्ये सात वेगळ्या नद्या ज्या पुढे एकत्र होऊन अथवा इतर कारणाने सरस्वती म्हणून ओळखल्या गेल्या त्यांचा समावेश होतो. ब्रह्मावर्त हा अती पवित्र प्रदेश म्हणजे सरस्वती आणि द्विशद्वती ह्यांच्या मधला भाग असे महाभारत म्हणते. पुराणांमध्ये सरस्वती नदीचे माहात्म्य त्यावरच्या तीर्थांचे महत्त्व ह्यांचे कित्येक संदर्भ येतात.
नजीकच्या इतिहासामध्ये सहाव्या शतकातील बृहतसंहिता ह्या ग्रंथामध्ये ‘यमुना आणि सरस्वतीच्या सीमेवरील’ देश-प्रदेशांची यादी वराहमिहिराने दिली आहे. बाणभट्टच्या हर्षचरीत्रामध्ये स्थानेश्वर येथे सरस्वतीच्या काठावर केलेल्या तर्पणाचे वर्णन आहे. बाणाचे हे साहित्य सातव्या शतकातले आहे. याचा अर्थ तोपर्यंत सरस्वती ही उल्लेखनीय नदीच्या स्वरूपामध्ये लोकांच्या मनामध्ये आणि भूगोलामध्ये ही होती.
त्यापुढच्या काळात दहाव्या शतकातला गुर्जर प्रतिहार राजा मिहीर भोज ह्याच्या पेहोवा, हरियाना इथल्या एका शीलालेखामध्ये प्राची-सरस्वती नदीचा उल्लेख येतो.
अगदी नजीकच्या भूतकाळामध्ये १५-१६ व्या शतकामध्ये तारीखे-मुबारकशाही ह्या मुघलकालीन साहित्यामध्ये ‘सरसुती’ नदी सतलज मध्ये विलीन होते असे म्हणले आहे.
अशी ही सरस्वती आज पुरतीच दृष्टी आड झाली असली तरी तीचा ठाव-ठिकाणा शोधायचा प्रयत्न थांबलेला नाही.
( नकाशा आंतरजालावरून साभार )
-- भाग १

Comments