संगम सफारी
पूर्वेकडून खळाळत येणारी रौद्र सुंदर अलकनंदा
आणि उत्तरेहून संथ वाहत येणारी पाचूच्या रंगाची शीतल भागीरथी ! यांचा स्वर्गीय
संगम म्हणजे देवप्रयाग! हिमालयाच्या स्फटिक रांगामध्ये , उत्तरांचल राज्यातील हे
संगम दृश्य, तीनही बाजूनी पाण्याने वेढलेल्या, बाणाच्या टोकासारख्या डोंगरी
भूभागामुळे व तेथील पाण्यामध्ये उतरत जाणाऱ्या पायऱ्यांमुळे फारच नाट्यमय झाले
आहे. ‘देवप्रयाग’ हा गंगेच्या लांब
प्रवासामधला महत्वाचा थांबा आहे.
हिमालयाच्या अनेक कन्यांचे प्रवाह
सामावून घेत गढवाल हिमालयातील गंगेंचा जीवन प्रवाह उत्तर भारतीय मैदानात हरिद्वार
येथे अवतरतो. आणि पुढे बंगालच्या उपसागराला मिळेस्तोवर, अनेक नद्या, नाले आणि ओहोळ
यांच्या संगमांची तीर्थे निर्माण करत, अनेक संस्कृती आणि बोलींचे अंतर्नाद जणू
ह्या प्रवाहाबरोबरच भारतभूमीला धन्य करत जातात.
देव प्रयाग |
संगम, संयोग, समागम म्हणजे एकत्र येणे. दोन विरुद्ध दिशांहून आलेले, पाण्याचे स्त्रोत एका ठिकाणी एकत्र मिळतात आणि पुढे एकदिलाने चालू राहतात. असे अनेकानेक स्त्रोत, डोंगराच्या कुशीत जन्माला येऊन आपल्या सहोदरांना भेटत, जोडत सागराच्या राज्यात विलीन होतात. नद्यांच्या अशा संगमाच्या जागा पुन्हा विलक्षण देखण्या असतात. डोंगर टेकड्यांना वळसा घालून उफाळत येणारी वेगवान जल सरिता आणि दुसऱ्या बाजूने संथपणे रेंगाळत येउन काठावरच्या झाडा झुडपांना हलकेच कोपरखळी देत त्या ओघात सामील होऊन जाणारी एखादी धीरगंभीर नदी!
ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये म्हणतात. पण
एखाद्या नदीच्या उगमापासून पुढे येताना, एखाद्या संगमापाशी नदीचे नाव ही बदलून
जाते. संगमाच्या ठिकाणी बहुदा एक मुख्य नदी आणि दुसरी तिची उपनदी अशे विभागणी असते
. मुख्य नदी बहुदा प्रसिद्ध आणि मोठी असते आणि त्यामुळेच उपनदी स्वत:चे नावा सकटचे
अस्तित्त्व विसरून तिच्या मध्ये मिसळून जाते.
आणि कधी कधी तर दोन्ही नद्या आपली नावे विसरतात
आणि जन्माला येते एक नवीन नदी. जसे की
देवप्रयाग ला अलकनंदा आणि भागीरथी यांच्या
संगमानंतर जो जलस्त्रोत पुढे
भारतीय मैदानी प्रदेशात येतो, त्याचे नाव आहे गंगा! हिमाचल प्रदेशा मध्ये स्पिती च्या उंचच उंच
बर्फील्या पहाडातून धावणारी चंद्रा आणि विरुद्ध दिशेने त्याच पर्वत समूहाला वळसा
घालून येणारी भागा यांचा संगम होऊन पुढे ह्या नदीला नाव मिळते चंद्रभागा आणि ती
म्हणजेच पंजाबची चिनाब. विदर्भात वर्धा आणि पैनगंगा मिळतात आणि त्या जलप्रवाहाचे
नामकरण होते प्राणहिता, जी पुढे जाऊन मिळते गोदावरीला. कर्नाटकामध्ये तुंगा आणि
भद्रा ह्या दोन नद्यांची एकत्रित जलशक्ती पुढे तुंगभद्रा या नावाने विजयनगरच्या
प्राचीन बलशाली राज्याची जीवन वाहिनी होते.
नद्यांच्या संगमाचे भौगोलिक महत्त्व पाहता, ते
वसतीचे स्थान असणे साहजिक आहे. अशा ठिकाणी काळाच्या ओघात
देवस्थाने निर्माण झाली. त्यामुळेच
असेल पण भारतामध्ये नद्यांचे संगम हे पूर्वापार पवित्र मानले गेले आहेत. बहुतेक
संगम स्थळे ही तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्धीस आली आहेत. यज्ञीय संस्कृती नंतरच्या संक्रमण काळामध्ये , जशी मूर्तीपूजा
वाढीस लागली तशीच नवनवीन तीर्थक्षेत्रे पण उदयास आली.
प्रयाग |
तर प्रयाग हे हिंदूंचे महत्त्वाचे
तीर्थक्षेत्र, कुंभमेळ्याचे प्रमुख स्थान आणि भारतीय सांस्कृतिक विचारातील दोन
महत्वाच्या नद्यांचा संगम. गंगा ही तर साक्षात् स्वर्गातून अवतरलेली, माणसाच्या
जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारी जलदेवता , तर यमुना ही कृष्ण सख्याच्या
बाललीलांची साक्षी सहचारी ! अर्थात गंगा ही भारताची सर्वात मोठी नदी आणि यमुना ही भारतीय
उपखंडाच्या दोन प्रमुख जल प्रणालींमधली, गंगेची सर्वात पश्चिमेकडील प्रमुख उपनदी
हे भौगोलिक वास्तव तर खरेच. प्रयाग हे
उपनाम पुढे अनेक संगमांच्या ओळखीसाठी वापरले गेले. उत्तरांचलामधील अलकनंदा ही नदी
बद्रीनाथच्या पल्याडच्या हिमालयामधून
निघते. तिचा देवप्रयाग येथे भागीरथी बरोबर संगम होण्याआधी, अनेक हिमालयीन नद्या तिला
येऊन मिळतात. त्या सर्व संगमांना विष्णुप्रयाग,
कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग अशी नावे आहेत.
धार्मिक दृष्टीने महत्वाची संगम स्थाने भारतभर
विपुल मिळतात. अगदी महाराष्ट्रामधले कृष्णा आणि नीरा नदीच्या संगमावरचे नीरा
नृसिंहपूर ते पार हिमालयातले गोमती आणि शरयू यांचे संगमस्थळ म्हणजे बागेश्वर. निरंजना आणि मोहना यांच्या
संगमानंतर फल्गु असे नाव मिळालेल्या नदी वरचे गया असो किंवा गोदावरी आणि
किन्नरसनीच्या आंध्र प्रदेशातील संगमावरचे श्रीरामतीर्थ भद्राचलम! देव देवळे आणि कर्मकांडे यांनी संगमांचे घाट
गजबजले आहेत.
काही संगम स्थळे तिथल्या धार्मिक महत्त्वापेक्षा
ऐतिहासिक स्थळ माहात्म्यामुळे जास्त प्रसिद्ध होतात. गोदावरीचा प्रवरा संगम म्हटले
की तिथून जवळच असणारे प्रवरेकाठचे नेवासे, हे संत ज्ञानेश्वरांच्या वास्तव्याने
पुनीत झालेले गाव वेगळे आठवावे लागत नाही. कऱ्हाडजवळील कृष्णा आणि कोयनेचा प्रीती
संगम हे तर महाराष्ट्रातले एक सांस्कृतिक प्रतीकच आहे.
प्राचीन काळापासून मानवाने वस्तीसाठी
नद्यांच्या काठाचा आधार घेतला हे तर आपल्याला माहीतच आहे. त्याच प्रमाणे दोन किंवा
अधिक नद्यांच्या संगमस्थळी पूर्वी आणि आत्ताही मोठ-मोठी नगरे उदयाला आली हे ही खरे
आहे.
नदी आणि नगरी
भारताच्या प्राचीन इतिहासातील पहिले
महासाम्राज्य निर्माण करणाऱ्या मौर्य कुलाची राजधानी होती पाटलीपुत्र म्हणजे आजचे
पाटणा. अर्थात मौर्य कालापूर्वीही पाटलीपुत्र हे एक महत्वाचे नागरी ठिकाण होते हे
आपल्याला बौद्ध जातक कथा आणि इतर
वाङग्मयामधून समजते. पाटलीपुत्र किंवा पाटण्याचीच भौगोलिक ओळख म्हणजे चार
महानद्यांच्या सहवासाने पवित्र झालेले संगम स्थळ अशीच आहे. गंगा नदी च्या पूर्वेकडे झेपावणाऱ्या प्रवाहास
दक्षिणेकडून मिळणारा विन्ध्य जलाचा महाप्रचंड स्त्रोत म्हणजे शोण नद. गंगेच्या
उत्तरेकडून , जवळ जवळ समांतर वाहणारी आणि अयोध्येच्या सानिध्याने पावन झालेल्या
जलाचे अमृतबिंदू वाहून आणणारी घागरा तसेच उत्तरेकडून हिमालयाच्या शीत लहरींची
सहचारी अशी ती गंडक नदी. ह्या चार ही नद्यांच्या संगमा वर वसलेले पाटणा शहर
म्हणजेच नंद, मौर्य, गुप्त राजांच्या
प्रचंड साम्राज्याची, प्राचीन मगध देशाची राजधानी हे तत्कालीन भारतातले
सर्वश्रेष्ठ शहर ठरले तर नवल नाही.
वरुणा संगमाजवळ, राजघाट, वाराणसी |
भारताची सांस्कृतिक राजधानी अशा वाराणसी
या शहराचे नावच मुळी वरुणा आणि असी ह्या
गंगेला मिळणाऱ्या दोन नद्यांवरून पडले आहे. आपले पुणे हे ही मुळा आणि मुठा आणि
म्हटले तर पवना ह्यांचा संगमावर वसले आहे. निसर्गरम्य गोव्याची राजधानी पणजी ही
सुद्धा मांडवी आणि झुआरी ह्या नद्यांच्या काठावर नांदते आहे. जमशेटपूर ही
अर्वाचीन काळातील वसवलेली उद्योगनगरी,
खारकाई आणि दामोदर ह्या दोन नद्यांच्या रमणीय संगमावरती उभी राहिली आहे.
दोन वेगळ्या दिशांनी येणाऱ्या नद्यांचे संगम हे
फक्त पाण्याचे नसतात तर त्याबरोबरच दोन वेगळ्या प्रदेशांच्या मातीचा सुगंध,
तिथल्या पक्ष्यांची गाणी आणि माणसांच्या कहाण्या असा सगळा गोपाळकाला असतो.पुणेरी
मराठी मध्ये ‘संगमावर’ ह्या शब्दाला एक वेगळाच अर्थ आहे. भारतामधली बरीचशी संगम
तीर्थे ही माणसाच्या पुढच्या प्रवासाची सांगाती आहेत. सौंदर्य आणि वैराग्य ह्या
दोन कल्पनांचा संगम आणि पुढे जाणारा मोक्ष मुक्तीचा प्रवाह !
पण कधी कधी संगम होतो तो दोन वेगळ्या नद्यांचा
नाही तर एकाच नदीच्या दुभंगलेल्या प्रवाहाला पुन्हा जवळ यावेसे वाटते तेव्हा
! श्रीरंगपट्टण येथे कावेरी अशीच दुभंगली
आहे आणि त्या बेटाला वळसा घालून पुन्हा तिचे दोन प्रवाह एकजीव होतात आणि पूर्व
समुद्राच्या दिशेने वाटचाल करतात. ईशान्ये कडील ब्रह्मपुत्रा हा तर नदच आहे.
तिच्या पात्रात देखील माजुली नावाचे एक भले मोठे बेट आकारास आले आहे. ह्या माजुलीच्या दोन्ही बाजूंना वेढून पुढे
येताना पुन्हा एकदा ब्रह्मपुत्रा आपल्या मनातले शल्य मिटवते आणि एकप्रवाहाने बंगाल
मध्ये प्रवेश करते.
बदलते प्रवाह
राकट सह्याद्रिच्या अंगणात वाढल्यामुळे डोंगर,
नद्यांचे प्रवाह आणि त्यांचे संगम आपल्याला चीरस्थायी आणि अविचल वाटले तर आश्चर्य
नाही. पण उत्तर भारताच्या विस्तीर्ण मैदानी प्रदेशामध्ये, नद्यांचे संगम सुद्धा
काळाच्या विशाल उदरामध्ये गडप झालेले आहेत.
पंजाबच्या पाच नद्या आणि सिंधू नदी ह्या
बहुतांशी पाकिस्तानातून प्रवाही होत असल्या तरी भारतीय जनमानसातील त्यांचे स्थान
अढळ आणि अतुल्य आहे. ऋग्वेदातील ‘नदी स्तुती’ या प्रसिद्ध सूक्तामध्ये सिंधू,
झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज आणि सरस्वती ह्या क्रमाने या नद्यांचा त्यांच्या ऋग्वेदीय नामाने उल्लेख
केला गेला आहे. हिमालयाच्या हिमराशींमधून
पाण्याचे प्रचंह मोठे लोट घेऊन, हिमाचल आणि काश्मिरच्या देखण्या दऱ्या-खोऱ्यातून डौलाने वळसे घेत
धावणाऱ्या आसमानी रंगाच्या ह्या जलकन्या, पंजाब आणि हरियाणामध्ये प्रथम मैदानी
प्रदेशात उतरतात. विस्तीर्ण पात्र लाभलेल्या ह्या समृद्ध जलसरीता, एकमेकीना साद
घालत, हात मिळवत शेवटी सिंधू नदी मध्ये एकरूप होतात. सतलज आणि बियास ह्यांचा
भारतामध्ये हरिके इथे संगम होतो. रावी नदी लाहोरच्या बाजूने पुढे जाऊन चिनाब आणि
झेलम यांच्या एकत्रित प्रवाहाला सराई-सिधू येथे जाऊन मिळते. आता ह्या तिघींना,
बियास चे पाणी घेऊन सतलज मिळते ती उच-शरीफ येथे. ह्या पाच नद्यांच्या एकत्रित
जलप्रवाहाला आता नाव मिळते ते म्हणजे पंचनद. आणि हा पंचनद पुढे जाऊन महाविशाल
सिंधू नदीस मिठानकोट जवळ मिळतो.
Sindhu Sangam |
मैदानी प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे
ह्या प्रचंड नद्यांनी प्राचीन काळापासून कित्येकदा आपले प्रवाह बदलले आहेत.
पात्रामध्ये गाळ निर्माण झाल्याने किंवा भूगर्भातील हालचालींमुळे, मैदानी नद्यांचे
प्रवाह आणि त्यामुळे त्यांचे होणारे संगम काळानुसार अनेकदा बदलले गेले आहेत. अगदी
तेराव्या -चौदाव्या शतकापर्यंत, बियास नदी सतलजला न मिळता, कित्येक वर्षे पार
समुद्रापर्यंत पोहोचत असे, तर काही शतके ती चिनाब आणि रावीला मुलतानच्या ही
दक्षिणेस जाऊन मिळत असे. पाकिस्तान मधील बियास चे कोरडे पात्र अजून ही याची साक्ष
देते. त्याच कालखंडामध्ये रावी नदी चिनाबला आता जिथे मिळते त्याच्या खूप पुढे
दक्षिणेस जाऊन मिळत असे. सतलजची वेगळीच तऱ्हा.
सतलज नदीने अनेकदा पात्र बदलून दक्षिणेच्या घग्गरच्या पात्रातून वाहण्याचा
विक्रम केला आहे. कित्येक शतके, सतलज आणि बियास ह्यांचा कधी संगम होत असे तर कधी
नसे. मुलतान शहराची गोष्ट तर फारच विलक्षण! तेराव्या शतकापर्यंत, चिनाब नदी
मुलतानच्या पूर्वेस वाहत असे. नंतर चिनाबचा मार्ग बदलला आणि ती पश्चिमेस वाहू
लागली तर रावी मुलतानच्या पूर्वेकडूनस जवळपास अठराव्या शतकापर्यंत वाहत होती. आता
अर्थातच रावी आणि चिनाबचा संगम मुलतान च्या पुष्कळ उत्तरेसचहोतो.
सरस्वती ही आपल्या प्राचीन भारतीय
साहित्यामध्ये वर्णन केलेली एक मोठी नदी आहे. आत्ताच्या काळामध्ये ती लुप्त झाली
आहे. पण अनेक तज्ञ लोकांच्या म्हणण्यानुसार घग्गर नदी आणि पाकिस्तानातील हाक्रा
नदी च्या पात्रामधून प्राचीन काळी सरस्वती वाहत असली पाहिजे. उपग्रह छायाचित्रणात
दिसणाऱ्या पुरा-प्रवाहानुसार (paleo-channels), हरियाणा,पंजाब आणि राजस्थानच्या सीमारेषेवरून
वाहणाऱ्या पुरातन नदीचे विशाल पात्र हे सरस्वतीचे असू शकते अशी धारणा आहे.
वरती उल्लेख केल्याप्रमाणे सतलज ही घग्गरला
म्हणजेच सरस्वतीला काही काळ मिळत असे. एवडेच नाही तर पूर्वेकडील यमुना ही पण मुळात सरस्वतीची उपनदी
होती. आणि त्यामुळे ही नदी प्रचंड जलसंचय
घेऊन कच्छच्या आखातामध्ये समुद्रास मिळत असे. काळाच्या ओघात, भूगर्भीय
घडामोडींमुळे सतलजने प्रवाह बदलला आणि यमुनेनेही प्रवाह बदलून गंगेस मिळण्याचे
ठरवले, त्यामुळे सरस्वती नदी नष्ट झाली. गंगा आणि यमुना यांच्या संगम स्थळी म्हणजे
प्रयाग येथे, सरस्वती गुप्त रूपाने आहे असे म्हणले जाते. त्या मिथकाला ही भौगोलिक घटना कारणीभूत असावी. तर असे हे काळाच्या
पडद्याआड गेलेले सरिता संगम निदान साहित्य आणि अर्वाचीन तंत्रज्ञान यामुळे आपल्या
भावविश्वात प्रवेश करते झाले आहेत.
भारतीय परंपरेने त्रिवेणी संगम म्हणजे एका
ठिकाणी तीन नद्यांचे मिलन फार पवित्र मानले आहे.
भारतामध्ये अनेक ठिकाणी असे त्रिवेणी संगम आढळून येतात. बऱ्याच त्रिवेणी
संगमामधील तिसरी नदी ही सरस्वती असते. तर मध्य भारतामध्ये यमुना आणि तिच्या सिंध
ह्या उपनदीला तीन अजून लहान नद्या त्या दोघींच्या आसपासच मिळून एक पंचपेडी संगमही
होतो.
अनवट आणि अनोळखी
गेल्या काही वर्षात तंत्र माध्यमांचा वापर
एकमेकांबरोबर फोटो, गोष्टी, गप्पा ह्यांच्या देवाण घेवाणीसाठी करणे खूप वाढले आहे.
आणि त्याचबरोबर पर्यटनासाठी भारताचे कानेकोपरे धुंडाळून तिथल्या अनवट जागा, निसर्ग
यांचे फोटो काढणारे हौशी पर्यटक पण अमाप आहेत. त्यामुळेच असेही काही संगम आहेत जे
आपल्या नजरेसमोर ह्या पर्यटकांच्या कॅमेराच्या डोळ्यातून आले आहेत. लडाख मधील निमु
गावचा सिंधू आणि झंस्कार ह्या दोन लडाखच्या महत्त्वाच्या नद्यांचा संगम आत्ता आपल्यातले कित्येक जण तिथे
न जाताही बघू शकले आहेत. आणि आता तर
लडाखला गेल्यावर ते एक आधुनिक तीर्थक्षेत्र ही बनले आहे जिथे फोटोचा उपचार
पार पाडावाच लागतो. असाच अजून एक नव्याने प्रसिद्ध संगम म्हणजे रंगीत आणि तीस्ता ह्या नद्यांचा
सिक्कीम मधला ! आज वर फारसा माहीत नसलेला हा नदीसंगम आता त्यातल्या तीस्तेच्या
हिरव्यागार प्रवाहाप्रमाणे मनात कायम ताजातवानाच राहतो.
ब्रह्मपुत्रा हिमालयाचा उंबरा ओलांडून
बंगालच्या मैदानात प्रवेश करते आणि राजबाडी येथे जमुना ह्या नावाने तिचा संगम होतो
पद्मा ह्या नावाने आलेल्या गंगेच्या प्रवाहाशी.
अजून दक्षिणेस चंदपूर येथे, समुद्रास
मिळण्यापूर्वी मेघना ह्या नावाने ब्रह्मपुत्रा पुन्हा एकदा पद्मा नदीला भेटते. हे
असे दुहेरी संगम तसे विरळाच. गंगा आणि
ब्रह्मपुत्रा ह्या दोन महाप्रचंड नद्यांचा हिमालयाच्या प्रांगणामधला संगम हा खरतर प्रयागच्या तोडीचा. पण ह्या संगमाला ते धार्मिक, सांस्कृतिक
अधिष्ठान मिळाले नाही. बंगाली काव्य-संगीत विश्वात मात्र पद्मा, जमुना, मेघना
ह्यांच्या क्षितिजापार पसरलेल्या चमचमत्या पाण्यावर तिथल्या जलपुत्र
कोळ्या-नावाड्यानी केलेल्या शेकडो भटीयाली
रचना अजरामर आहेत.
संगमांची चर्चा करताना विसंगम आठवावेत हा मानवी
मनाचा खेळच आहे. समुद्राला भेटण्याच्या ओढीने नदी समुद्र सपाटीवर येते आणि जणू
काही अनेक भावना अनावर व्हाव्यात तशी अनेक
जल स्त्रोतानी ते शेवटचे अंतर संपवून सागराच्या लाटांमध्ये आपले अस्तित्व
विसरून जाते.. नदीच्या ह्या फुटलेल्या
शाखा म्हणजे वितरिका.. गोदावरी, गंगा, महानदी ह्यांचे त्रिभुज प्रदेश हे त्यांच्या
शाखा उपशाखांच्या लांबवर पसरलेल्या जाळ्याने
निर्माण झाले आहेत. कटक नगरी तर महानदीच्या पहिल्या विभाजनाची चिरकाल
सांगाती आहे. दोन एकत्र आलेले प्रवाह हे एकमेकात मिसळून पुढे एकत्र वाटचाल करणार
हे आपली मनात इतके घट्ट बसले असते की समोर जे दिसते आहे ते तसे नाही हे कळायला वेळ
लागतो. इथे पाण्या प्रवाहाची दिशा वेगळी आणि निसर्गाची इच्छा हे वेगळी.
संगमासारखे दिसणारे पण वेगळे अंतरंग असलेले हे
निसर्गदृश्य विचलीत करते खरे.
नद्या त्यांच्या प्रवासामध्ये सलील धारा एकमेकींना
जोडत जातात तरी त्यांचे अंतिम ध्येय असते ते सागर मिलन! मोठ्या नद्यांचे त्रिभुज
प्रदेश कित्येक मैल पसरलेले दिसतात. गंगा जिथे बंगालच्या उपसागराला मिळते ते
गंगासागर किंवा नर्मदा अरबी समुद्रात विलीन होते ते जागेश्वर-कोटेश्वर ही परंपरेने
पवित्र मानलेली संगम स्थळे. नद्यांच्या
संगमाची चर्चा करताना समुद्रापर्यंत पोचलोच आहोत, तर कन्याकुमारीच्या त्रिसमुद्रमिलनाचाउल्लेख
करायलाच हवा. निळ्या रंगाच्या तीन वेगळ्या छटांचे तीन महासमुद्र जणू काही ह्या
भारत भूमीच्या पायाशी जलांजली देत आहेत असे वाटते.
त्रि-समुद्र मीलन, कन्याकुमारी |
शतकानुशतके वाहणाऱ्या नद्या, त्यांचे एकमेकात
मिसळणारे प्रवाह, त्याला काठावरच्या माणसांनी आपल्या बुद्धीने चिकटवलेले
अर्थ, श्रद्धेने कल्पिलेली स्थाने ! साकार
निसर्गाला मिथके आणि इतिहासात गुंफून , संस्कृतीचा ओघ प्रवाही झाला आहे. त्याच्या
काठावरच सांगता करूया या संगम सफारीची !
Comments