हरवलेली पाषाण शिल्पे


भारताच्या प्राचीन भूमी वर माणसाच्या पिढ्यानिपिढ्या नांदल्या. किती प्रकारच्या संन्स्कृती, विविध जीवनशैली, बहुविध भाषा इथे जोपासल्या गेल्या आणि काळाच्या ओघात विलीन पण झाल्या. पण त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा सापडतात आपल्याला दगडा देवळातून आणि जीर्ण शीर्ण पोथ्या-पानामधून!


पुण्याच्या झगमगत्या आणि आधुनिक अशा जंगली महाराज रस्त्याने एक पुरातन गुपित जीवापाड जपले आहे. गर्द झाडीमध्ये, देवाचाफा आणि वडापिंपळाच्या सावलीमध्ये काही पायऱ्या उतरून गेल्यावर समोर येते ते आठव्या शतकात कोरलेले पाषाण शिल्प ‘पाताळेश्वर’ असे नामाभिधान मिळालेल्या ह्या भक्कम खडकात कोरलेल्या गुहा आहेत. बघतानाच मन वेधून घेते ते सुरुवातीची गोलाकार , बारा खांबावर तोललेली दगडी रचना. मधोमध बसलेलला नंदी, आपण शिवमंदिराच्या पायऱ्यांवर उभे आहोत याची जाणीव करून देतो. गुहेत शिरणाऱ्या प्रवेशाद्वारासमोरील विस्तृत चंद्रशीलेवर पाउल टेकवून जरा वरती नजर करा. तिथे दिसेल शतकांपूर्वीचा कोरलेला शीलालेख , आता पुसट झाला असला तरी ते शब्द जणू काही काळाची निर्दय दरी ओलांडून आपल्यापर्यंत पोचलेच आहेत.


बलाढ्य राष्ट्राकूट राजांच्या राजवटीमध्ये ( इस ७००-१०००) हे लेणी खोदली गेली असावीत असा कयास आहे . अजिंठा आणि वेरुळ येथील अनेक जगप्रसिद्ध लेण्यांचे निर्माण करणारे हेच ते वैभवशाली राजघराणे ज्यांचे साम्राज्य महाराष्ट्र,तेलंगण, कर्नाटका व आंध्र प्रदेश यासह मध्य आणि उत्तर भारतातील बऱ्याच मोठ्या भूभागावर होते. 






पाताळेश्वर लेण्यांमध्ये प्रवेश केल्यावर सर्वप्रथम लागतो तो आडवा सभा मंडप . अनेक खांबाची रेखीव रचना असलेल्या ह्या मंडपामध्ये एक विलक्षण शांतता नांदत असते. समोर तीन गाभारे , त्यांच्या सुघड द्वारशाखा, आत शिवलिंग, त्यावर केलेली ताज्या फुलांची सजावट आणि घंटेचा टणत्कार ! त्या श्याम शीतल कातळावर जरा टेकावे आणि बाहेरच्या पिंपळाची सळसळ ऐकावी.

गाभाऱ्याच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. ह्या गुहा मागच्या बाजूने अपूर्ण असाव्यात. शैल गृहे किंवा लेणी यांच्या स्थापत्यामध्ये कित्येकदा लेणी अर्धवट कोरलेली आढळतात. प्रस्तराचा पोत, त्याच्यावर होणारा पाण्याचा परिणाम, डोंगराची उंची ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून बहुदा कलाकार काम थांबवायचा निर्णय घेत असावेत असे तज्ञ मानतात. पाताळेश्वर मंदिराशेजारीच जंगली महाराज ह्या साधु पुरुषाचे समाधीस्थान आहे. मुठा नदीचा प्रवाह इथून जवळच आहे. अर्थातच काळाच्या गतीने ह्या पवित्र परिसराचा चकीत करणारा व्यापारी कायापालट झालेला आहे.

पुण्याची ही कथा तर भारताच्या व्यापारी राजधानी मध्ये म्हणजे मुंबई मध्ये पण असे काही इतिहासाचे दुवे सापडतील असा आपल्याला खरच वाटू शकत नाही. पण गगनचुंबी इमारती, करोडोंची उलाढाल आणि सिनेमा सह अनेक व्यवसायांचे प्रमुख केंद्र होण्या आधी मुंबई ही शिलाहार आणि यादव राजांचीही भूमी होती. नाला सोपारा आणि कल्याण ह्या महत्वाच्या बंदरांची सहचारी होती. श्रमण व योगी यांची वसती असलेल्या लेण्यांची भूमी होती आणि अजून ही आहे.

मुंबई च्या उत्तरेस कान्हेरी येथे देखण्या लेण्यांचा समूह आहे, तर मुंबई मधेच जोगेश्वरी, महाकाली,मंडपेश्वर या ठिकाणी किमान हजार बाराशे वर्ष जुन्या लेण्यांची रचना आढळते. पवई- अंधेरी परिसरातील डोंगराच्या रांगामध्ये महाकाली अथवा कोंडीवटे या नावाने प्रसिद्ध असा एक लेण्यांचा गुच्छ येणाऱ्या- जाणाऱ्यांच्या प्रतीक्षे मध्ये आहे.एकूण एकोणीस दालने असलेल्या या कोरीव गुंफा , इसवीसनाच्या पहिल्या ते सहाव्या शतकामध्ये रचल्या गेल्या असाव्यात.



उंच उभ्या खांबावर तोललेली ओसरी आणि आत विहार , खांबाच्या मध्यावर एखादे देखणे शिल्प, चार पाच पायऱ्यांचा छोटासा सोपान व त्याला कमानदार कठडे, कुंभाकृती शीर्षाचे खांब आणि एका भिंतीवर कोरलेले फणाधारी नागाचे शिल्पांकन! पुरातात्वाच्या साक्षीने हा शिल्प खजिना ह्या अनवट जागी आपल्याला लुटता येतो.

इथे आत्ता जरा लेण्याविषयी थोडेसे. मंदिर व देऊळ यासारख्या बांधीव स्थापत्याआधी भारतामध्ये आख्या कातळामध्ये कोरलेल्या गुहा अथवा शैलग्रुहे यांची निर्मिती झाली. इसविसानापुर्वी दोन-तीन शतके आणि त्यानंतर आठव्या नवव्या शतकापर्यंत विवीध ठिकाणी लेणीखोदली गेली. मुळात लेणी ही तत्कालीन संन्यासी, भिक्षु यांच्यासाठी वर्षावास म्हणून तेव्ह्याच्या राजवटीनी केलेली सोय असे. लेण्यांचे बौध्द, जैन, हिंदू हे वर्गीकरण सध्याच्या काळात , तेथील सापडणारी शिल्पे, स्तूप, शीलालेख यावरून ठरते. बौध्द लेण्यामध्ये स्तूप किंवा बुद्धमूर्ती असेल तर त्यास चैत्य म्हणले जाते. मोकळी जागा असलेले दालन, त्याला बाजूनी कोरलेले लांब कट्टे हे भिक्षुंच्या निवासाची व्यवस्था असे व त्यास विहार म्हणले जाते. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री च्या रांगामध्ये अनेक लेणी कोरलेली दिसतात. याला कारण सह्याद्री चा दणकट काळा बसाल्ट खडक, जो लेण्यांच्या रचनेला पूरक आहे. तसेच बरीचशी लेणी हे पैठण ते सोपारा ह्या तत्कालीन व्यापारी मार्गावर आढळून येतात. लेण्यामधील सापडणारे शीलालेख, शिल्पांची शैली या गोष्टीवरून लेण्यांचा कालखंड ठरवण्यास मदत होते.


तर मुंबई ही तर सागर सीमा! ती ओलांडून एका छोट्याश्या बेटावर वसलेले आहे घारापुरी . इथे आहे एलेफंटा नावाने प्रसिद्ध असलेला इतिहासाचा अमूल्य ठेवा. घारापुरी म्हणजे, जुन्या काही ग्रंथानुसार्, पुरी नावाची शिलाहार राजांची राजधानी. गेटवे ऑफ इंडियापासून सुटणारी फेरी बोट घेऊन आपण निळ्या सोनेरी लाटांच्या संगतीने ह्या हिरव्यागार डोंगरी बेटावर पोहोचतो. तिथून पुढे एक खेळण्यातली वाटावी अशी रेल्वे आपल्याला ह्या लेण्यांच्या पायथ्याशी आणून सोडते. थोडाश्या दगडी पायऱ्या चढून आपण घारापुरी लेण्यांच्या परिसरामध्ये पोहोचतो.

घारापुरी लेण्यांचे मुख्य आकर्षण म्हणजे तेथील भव्य त्रिमूर्ती. हे ब्रह्मा -विष्णू-महेश नसून, शंकराचीच तीन रूपे आहेत. अभ्यासकांच्या मते , ही मुळात पाच मुखे आहेत, तीन समोरील बाजूस, एक वर आणि एक विरुद्ध बाजूस जे अदृश्य आहे. शंकराच्या ह्या प्रत्येक मुखास विशिष्ट नाव आहे.पंचमहाभूतांचे द्योतक असलेला हा ‘सदाशिव’ म्हणजे ईशान, अघोर, तत्पुरुष, वामदेव आणि सद्योजात ह्या शिवरूपांचे एकत्रित शिल्पांकन आहे.



प्रचंड उंचीच्या भिंतीवर कोरलेली ती रेखीव देखणी शिवमुखे , लेण्यांच्या प्रवेशद्वारापाशी उभे अनेक फुटी द्वारपाल , बारीक रेघांच्या नक्षीकामाने नेटके दिसणारे बलदंड खांब, विस्तीर्ण दालने, आणि भिंतीवरील कोरीव शिल्पे, कुठे शिव पार्वती विवाहाची कल्याण सुंदर मूर्ती , तर कुठे आकाशस्थ यक्ष किन्नरांची देखणी शिल्पांकने ! घारापुरी चे नाव एलेफंटा असण्याला कारणीभूत झालेले महाकाय हत्त्तीचे दर्शनी भागातील शिल्प मात्र आता येथे नाही तर संग्रहालयामध्ये आहे. ह्या मंतरलेल्या शिल्पावनातून बाहेर आलात तर घारापुरीचा रम्य परिसर, आणि तिथून दिसणारे मुंबई चे लोभस दृश्य हेही तितकेच मोहवणारे आहे.

अशी ही गर्दीमध्ये हे तगून राहिलेली इतिहासाची बेटे, स्मृतीन्मधून हरवून गेलेली ही अनवट पाषाण शिल्पे, कुठेतरी आपल्याला आपल्याच गतकालाशी अलगद जोडून घेतात.



Published in RailBandhu , April 2017

Comments