एका कातळाची कथा
ह्या आपल्या विस्तीर्ण भारतात आपल्या पूर्वजांच्या आठवणी अनंत ठिकाणी विखुरल्या आहेत. बांधीव आणि कोरीव कामाने नटलेली सुबक आणि सुघड मंदिरे, कातळ फ़ोडून त्याला शिल्पांनी सजवून तयार केलेली लेणी, खोल बांधलेल्या आणि कलात्मक शिल्पांनी शोभणाऱ्या विहिरी/वावी, तसेच गगनाला भिडू पाहणारे प्रमाणबद्ध विजयस्तंभ, दीपमाळा आणि भव्य बांधून काढलेली जलकुंडे, नदीकडेचे पायऱ्यापायऱ्याचे घाट! ह्या सगळ्यामधे एखाद्या लपलेल्या हिऱ्याप्रमाणे चट्कन वेगळी न काढता येणारी पण खरी मौल्यवान अशी आहेत ती एकपाषाणी मंदिरे. नावाप्रमाणेच अर्थ असलेला हा स्थापत्यविशेष! अखंड दगडामधून मंदिराची घडवल्याप्रमाणे प्रतिकृती कोरून काढणे हे महाकठीण काम खरे, पण आपल्या पूर्वजांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले.
इतिहासाचा हा पाषाणांच्या साथीने केलेला अनोखा प्रवास आपण सुरु करणार आहोत तमिळनाडू च्या प्रकाशसंपन्न भूमीमधून.
चेन्नईच्या दक्षिणेला साठेक किमि दूर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर, उसळत्या समुद्राच्या संगतीने आणि उंच उभ्या माडांच्या संगतीने उभे आहे महाबलिपुरम. मम्मलपुरम असेही नाव असलेली ही बलाढ्य पल्लव राजांची प्राचीन नगरी.
ह्या ठिकाणी लख्ख निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर साकार झाला एक विलक्षण प्रयोग. दणकट ग्रनाईटच्या जडशीळ राशींममधून योग्य मापाचे पत्थर निवडून त्यातून साकार झाले एक एक मंदिर . 'पंच रथ' या नावाने ओळखली जाणारी ही जागा म्हणजे जणू काही एकपाषाणी स्थापत्याची प्रयोग शाळाच ठरली.
मउ बदामी वाळूमधे, उन्हात तळपणारी पाच वेगवेगळी मंदिरे, प्रत्येकाचा घाट निराळा, पद्धत निराळी.
रथ म्हणजे मंदिर किंवा द्राविड स्थापत्याप्रमाणे 'विमान'!
परंपरेने अर्थात प्रत्येक वास्तुला पांडवांची नावे बहाल केली आहेत. प्रांगणात शिरताच डावीकडे दिसते झोपडीवजा ’द्रौपदी' मंदिर. चौकोनी उंचावलेले छत आणि जवळपास अलंकरणाचा पूर्ण अभाव हेच याचे वैशिष्ठ्य.
त्याला लागून उभा आहे अर्जुन रथ. दक्षिण भारतात आढळणाऱ्या द्राविड शैलीच्या देवळाप्रमाणे इथेही कूट व शालांचा मजला दिसतो. त्याच्या शेजारी आहे तो भीम रथ. ह्या रथाचे विधान आयताकृती असले तरी वरती छप्पर मात्र फ़ुगिर गोलाकार असे ’ शाला' प्रकारचे आहे. अनेक अभ्यासकांच्या मते तोडा जमातीच्या झोपड्या बरोबर अशाच दिसतात व ह्या रथाची कल्पना ही त्यावरूनच सुचली असावी.
कूट व शाला हे द्राविड स्थापत्याचे महत्वाचे अंग आहे. कूट म्हणजे चौरस उंचवटा तर शाला म्हणजे लांबट फुगीर रचना. द्राविड मंदिरामध्ये ह्या कूट व शालांचे ’हार’ असलेली एकावर एक मजल्यांची रचना असते. द्राविड मंदिरांच्या ह्या ’वेडिंग केक’ सदृश रचनेमुळे एकूण वास्तुला उंचीपेक्षा, रूंद भव्यता आपोआप प्राप्त होते.
या नंतर दिसणारा ’युधिष्ठीर’ रथ म्हणजे द्राविड पद्धतीचे तीन मजल्यांचे मंदीर ! अगदी सुघड असे हे शिल्प त्याच्या भव्यतेने आणि नेटकेपणाने लक्ष वेधून घेते. सर्वात महत्वाचा ऐतिहासिक ठेवा पण ह्या मंदिराच्या दक्षिण भिंतीवर आहे. नृसिंहवर्मन ह्या पराक्रमी पल्लव राजाचा दगडात कोरलेला पुतळा व शेजारील जुन्या ब्राह्मी लीपीमधील शीलालेख ह्या स्थानाचा ज्ञात इतिहासाशी दुवा जोडतो.
नृसिंहवर्मन हा कांचीच्या पल्लव घराण्याचा इसवीसनाच्या सातव्या शतकातला महत्त्वाचा राजा. मजा अशी की ह्या वेळी भारतामधॆ तीन महत्वपूर्ण राजे राज्य करत होते, बलाढ्य, कर्तुत्ववान आणि परस्परांचे प्रतिस्पर्धी पण! नृसिंहवर्मन पल्लव ह्याने आक्रमण करुन आलेल्या समकालीन चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याचा पराभव तर केलाच पण त्याच्या राज्यात घुसून त्याची राजधानी वातापीवर ( बदामी) काहीकाळ वर्चस्व पण गाजवले. आणि पुलकेशी दुसरा म्हणजे तोच ज्याने कनौजचा दानशूर सम्राट, बाणाच्या हर्षचरिताचा महानायक हर्षवर्धनाची दक्षीण घोडदौड नर्मदेच्या किना-यावर थोपवली.
इतिहासातून बाहेर पडून पुन्हा एकदा वर्तमानातील पंच रथाकडे वळूयात! द्रौपदी, अर्जुन, भीम, युधिष्ठीर यांपासून जरा बाजूला उभा आहे, नकुल-सहदेव रथ. ह्याचे विधान वेगळेच म्हणजे चापाकार आहे. एक बाजू अर्धगोलाकर व वरती शाला पद्धतीचे शिखर देखणे दिसते. तज्ञांच्यामते, गुहेत कोरलेल्या बौद्ध चैत्यगृहावरून याची रचना सुचली असावी.
ह्या पाच रथ स्थापत्यापलीकडे एक बसलेला बैल, उभा हत्ती वगैरे प्राणीविशेष ही इथे दगडामधून निर्माण केले आहेत.सर्व रथ मंदिराचे खांब हे बसलेल्या सिंहांच्या खांद्यांवर तोललेले आहेत. हा पल्लव कालीन शिल्पकलेचा विशेष मानला जातो.
पण ही महाबलीपूरमची मंदिरे आतून कोरलेली नाहीत तसेच त्यात देवता मूर्तीचे अधिष्ठान हे नाही. म्हणुनच दिसायला मंदिर स्वरूप असली तरी ती सामाजिक पूजा अर्चेचा भाग कधी झाली नाहित
तरीही भारतीय स्थापत्यशास्त्राच्य इतिहासामधे ह्या पंचरथाचे महत्व अनन्य साधारण आहे.
ग्रनाईट सारख्या तुलनेने कठीण दगडामध्ये कोरल्यामुळे अलंकरण भरपूर प्रमाणात दिसत नाही पण कारागिरांची कुशलता नक्कीच जाणवते. मंदिर उभारणीच्या अगदी सुरुवातीच्या काळात, ह्या बांधीव नव्हे तर कोरीव रचनेचा प्रयोग व त्यातही पाच प्रकारची रेखीव मांडणी, आपण थक्क नाही झालो तर नवल !
ह्या एकपाषाणी स्थपत्य कलेचा मेरुमणी शोभेल असा अविष्कार म्हणजे महाराष्ट्रातले, आपल्या दगडांच्या देशातले वेरुळ चे घृष्णेश्वराच्या सानिध्यातले कैलास मंदिर. कित्येक साहित्यिक, कवी, चित्रकार ह्यांच्या प्रतिभेला स्फ़ूर्ती देणारे हे शिल्पवैभव केवळ सुंदर नाही तर विशेष पण आहे.
दक्षिणोत्तर सह्याद्रीच्या पूर्व-पश्चीम पसरलेल्या काही तुरळक पर्वतरांगामधे वेरूळ म्हणजे प्राचीन एलापूर वसले आहे. औरंगाबाद पासून जवळच, दख्खनच्या पठारावरती, प्रतिष्ठान म्हणजे आताच्या पैठणच्या नजीक, गोदावरीच्या प्रांगणात, हिरव्या निसर्गाच्या साक्षीने, इसवीसनाच्या सहाव्या शतकापासून हे पाषाणकाव्य रचण्यास सुरुवात झाली.
वेरूळला एकुण ३४ लेणी आहेत पण ती गुहा स्वरूपामधे आहेत. कैलास लेणे मात्र मूळ पर्वतापासून विलग होऊन एक मंदिर ह्या निश्चीत स्वरूपामधे आपल्यासमोर येते.
प्रचंड मोठ्या कातळामधून खोदून काढलेले तीस-बत्तीस मीटर उंचीचे हे महाप्रचंड पश्चिमाभिमुख मंदिर म्हणजे प्राचीन कोरीव कलेच्या प्रगतीचा मोठा पुरावाच आहे.
काळा राकट पाषाण, त्यात कोरलेले दुमजली गर्भगृह, सभामंडपावर चार डौलदार सिंहांचे रेखीव शिल्प, आवारामधे कोरलेला उंचच उंच विजय स्तंभ आणि एक गजराज. याच बरोबर भिंतीवर कोरलेली पौराणिक कथांची भव्य शिल्पे!
एक मंदिर म्हणूनही कैलास परिपूर्ण आहे. अगदी गर्भगृहामधील भव्य आणि रेशमी काळ्या रंगाच्या शिवलिंगापासून ते पंचायतन मंदिराच्या इतर उपमंदिर रचनांपर्यंत, पारंपारिक मंदिर स्थापत्यामधील शिखर, सभामंडप,नंदीमंडप, तोरणद्वारापासून ते मंदिर प्रांगणाभोवतीच्या स्तंभाने तोललेल्या प्रदक्षिणापथापर्यन्त.
कैलास मधे बघायला आणि अनुभवायला इतके काही आहे कि बघणा-याचे डोळे थकावेत!
दुमजली महाद्वारामधून आत आल्यावर डोळ्यात सामावणार नाही असे भव्य मंदिर समोर साकार होते.
पूर्णत: द्राविड शैलीचे हे मंदिर राष्ट्रकूट राजा कृष्णदेव याने बांधले अथवा खोदून घेतले. आठव्या शतकामधे निर्माण झालेल्या ह्या रचनेचे कांचीपुरमच्या कैलासनाथ मंदिराशी मोठे साधर्म्य आहे. म्हणुनच कदाचीत याला ’कैलास’ म्हणण्याचा प्रघात ही पडला असेल. याचे ’माणकेश्वर’ असे एक नावही जुन्या शीलालेखांमधे आढळते.
कैलास मंदिराचा हा प्रचंड डोलारा बलिष्ठ हत्तीन्च्या खांद्यावर विसावला आहे. मंडपामधून जिन्याने वर गेल्यावर मुख्यमंडप व गर्भगृह येते.
ह्या मंदिराच्या मागील कातळावर चढून गेल्यास, ह्या वास्तूचे दिसणारे विलक्षण भव्य रूप मनावर गारूड करते. वर्षानुवर्षे पाउस , वारा आणि उन्हाचा तडाखा सहन करत उभे असलेले हे भक्कम आणि प्रचंड पाषाण शिल्प , काळावर मात करून अजिंक्य राहिलेला तो कळस आणि ह्या कालप्रवासामध्ये जाणिवेला वर्तमानात आणणारे शिखराच्या अंगावर निर्धोक विसावणारे पोपटांचे हिरवे थवे ! एक चिरंतन मन:चित्र पूर्ण होते.
शैव स्थान असल्याने ह्या मंदिरामध्ये शिवाच्या विविध कथांच्या अनुषंगाने कोरलेल्या मूर्तींची प्रचंड विविधता आहे. या ठिकाणचे सर्वात नावाजलेले शिल्प म्हणजे 'रावणानुग्रह'. कैलास पर्वतावर बसलेले शंकर-पार्वती, खालून तो पर्वत अपल्या वीस हातांनी गदागदा हलवणारा रावण, त्यामुळे भयभीत झालेली पार्वती आणि तिला आश्वासक आधार देणारा शंकर! कठीण दगडामधून हे सारे नाट्य जिवंत करण्याचे कसब त्या शतकांपूर्वींच्या कलाकारांचे! प्रदक्षिणापथावर शिवपुराणामधील अनेक कथा शिल्परूपाने साकार झालेल्या दिसतात. गजासूर वध, त्रिपुरांतक शिव ही त्याची काही उदाहरणे.
तसे पाहता कैलास मधे इतर देवतांचा शिल्पसंभार ही तितकाच रोचक आहे. देवळाच्या मंडपात प्रवेश करताना दिसणारे अभिषेकलक्ष्मीचे महापूर्णाकृती शिल्प, डाव्या बाजूचे सरिता मंदिर किंवा महिषासूरमर्दीनी देवीचे शिल्पांकन प्रेक्षकाला खिळवून ठेवते.
मंदिरात जायच्या आधी उजव्या बाजूच्या ओवरीमधे गेलात तर दिसतील सप्तमातृका आणि गणेश यांची बसलेली शिल्पे. अन त्याचवेळी तिथल्या गुहेचे छप्पर मान वर करुन बघा. महाबलिपुरमचे गणेश रथावरचे अर्धगोलाकार छप्पर आतून असे गजपृष्ठाकृती दिसेल!
कैलास मंदिराच्या काही भिंतींवर चित्रकारी केलेली दिसते पण काळाच्या ओघात ती बरीचशी नष्ट झालेली आहे. वेरूळची इतर लेणी जरी लोकांच्या मनामधून काळाच्या ओघात पुसली गेलेली असली तरी हे शंकराचे स्थान मात्र पूजेमधे अबाधित राहिले होते.
कैलास मंदिरामधे १७ व्या शतकात अहिल्याबाई होळकरांनी नव्याने रंगकाम घडवून आणले. काम त्या काळात जरी पुण्याचे असले तरी सध्या त्या नजीकच्या भूतकाळातील रंगसफ़ेदीची तशी दुर्दशा झाली आहे.
पण त्याहून मनाला खटकणारे दृष्य म्हणजे काही बेजबाबदार पर्यटक. त्या शेकडो वर्षांच्या संचीतावर , आपल्या लहान मुलांना कुठे शिल्पकृतींच्या मांडीवर बसव नाहीतर आपण त्यांच्या मागे जाऊन फ़ोटोला पोज द्यावी असे काहीतरी चाळे करणारे हौशी, तसेच मुलांच्या शाळेच्या सहली कैलासावर घडवुन, तिथल्या जिन्यावरून आरडा-ओरडा करत मुक्तपणे उधळणारा बालचमू हे दृष्य लोभस वगैरे असले तरी काळाचे आणि स्थानाचे भान जपणारे नक्की नाही.
कैलास हे माहितीपुस्तीकेमध्ये १६ क्रमांकाचे लेणे आहे. पण ह्या शिल्पराजाच्या शांत , पुरातन सावलीमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाच्या मनात त्याला कायमचा प्रथम क्रमांक मिळालेला असतो.
दक्षिण भारताच्या सोनेरी समुद्र किना-यावर सुरु झालेला हा एकपाषाणी मंदिरांचा प्रवास आपण संपवणार आहोत अर्थातच नगाधिराज, देवतात्मा हिमालयाच्या अंगणामधे नव्हे तर अगदी घरातच!
एकपाषाणी मंदिरासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भक्कम व प्रचंड पाषाणाची उपलब्धता. हिमालय आपला आवडता असला तरी तिथे दरडी कोसळण्याचे प्रमाण फ़ार आणि तिथला पर्वत एकूण पुन्हा फ़ार ठिसूळ. भूपृष्ठाच्या दाबाने तयार झालेल्या ह्या पर्वतरांगामधे , ज्वालामुखींच्या लाव्हाने उत्पन्न झालेल्या दख्खनी कातळाची कठीणता कशी असणार? पण तरीही हिकमती लोकांनी इथेही असा योग्य शीलाखंड शोधला आणि त्यावर उभे केले एक भव्य रेखीव शिल्पस्वप्न!
हिमालयाच्या कांगडा प्रदेशामधे शिवालिक पर्वतराजीमधे बियासच्या खोऱ्यात मसरूर नावाचे छोटॆसे गाव वसले आहे. हिमाचल प्रदेशच्या नेहमीच्या पर्यटकी नकाशावर हे ठिकाण नसल्याने, रस्ता शोधणे जरा कठीण होते. पण उतरत्या दुपारच्या सोनेरी उन्हामधे भराभरा मागे पळणा-या ठेंगण्या टेकड्या, त्यावर चीर पाइनच्या हिरव्या पर्णपिसा-याची नक्षी, मधुनच दिसणारी पिवळ्या धमक मोहरीची शेते, कुठे आंबा तर कुठे लिची ची प्रशस्त झाडे, आणि इथे तिथे झुळझुळणारे झरे अशा प्रवासात असंख्य वळणे घेत एकदाचे आपण पोचतो एका जराशा उंच टेकाडावर.
आणि तिथे निळ्या आकाशामधे शिखरे घुसवून उभी आहेत पाठ्मोरी चार भव्य मंदिरे.
दरवाज्यातून आत गेल्यावर दिसणारा नजारा खरोखरीच नजरबंदी करतो. तीन मजली इमारतीएवढ्या उंच शिखरानी सजलेली, फ़िकट सोनेरी बदामी दगडामधे सजीव झालेली मंदिर शिल्पे पुढ्यातल्या संथ हिरव्या पाण्याच्या चौकोनी कुंडामधे आपले प्रतिबिंब पाहताना आपल्याला दिसतात. दूरवरची धौलाधार पर्वतशृंखला एकूण दृष्याला एक वेगळेच परिमाण देते.
चंद राजांच्या कारकिर्दीमधे साधारण ८ ते १० व्या शतकामधे ही कलाकृती उदयाला आली असावी. एकसंध पाषाणामधून घडवलेली एकूण १५ मंदिरे इथे सापडतात. पूर्वाभिमुख अशी ४ मोठी मंदिरे मागे व त्यापुढील ५ मध्यम मंदिरे अशी रचना आहे.. मुख्य मंदिरामधुन वरच्या प्रतलावर जाण्यासाठी खोद्लेले जिने आहेत. त्या उंचीवरून ही मढलेली शिखरे जवळून बघता येतात. संपूर्ण नागर शैलीची शिखर रचना , उभ्या रेघेत घडवलेल्या शिल्पाकृतींची मांड्णी, त्यावरील नाजूक कोरीवकाम,त्या अज्ञात कलाकारांच्या अद्भुत कारागिरीमुळे आपण मोहून जातो..
ह्या ठिकाणी थोडेसे 'नागर' आणि 'द्राविड' ह्या मंदिरशैलीविषयी ..'नागर' सहलीच्या मंदिरामध्ये उंच आकाशवेधी शिखरांची रचना असते. शिखराच्या तीन्ही भिंतीवर 'रथ' म्हणजे उभे सलग पट्टे असतात. पट्ट्यांच्या संख्येवरून त्रिरथ, पंचरथ , सप्तरथ वगैरे रचना ओळखल्या जातात. शिखराच्या वर आमलक म्हणजे आवळ्या सारखे उभे कंगोरे कोरलेला गोलाकार दगड. ही नागर शैलीची मंदिरे बहुतकरून उत्तर भारतामध्ये आढ ळतात. खजुराहोची संपन्न प्रसिद्ध मंदिरे हा नागर शैलीचा मेरुमणी मानला जातो.
द्राविड शैलीची मंदिरे ही वरती उल्लेखल्या प्रमाणे कूट व शालांच्या मजल्यानी तयार झालेली असतात. ह्या मंदिरांचा भर उंची पेक्षा रुंदी वर असतो. एकावर एक आणि एकात एक पद्धतीने रचलेल्या ह्या शिखरांवर अतिशय कोरीव कामाने सजलेली ' स्तूपीका ' असते. द्राविड मंदिरे ही अर्थातच जास्तकरून दक्षिण भारतामध्ये सापडतात. कांची, चिदंबरम किंवा तंजावरचे सुप्रसिद्ध बृहदिश्वर मंदिर हे द्राविड शैलीचे उत्कृष्ट नमुने आहेत.
मसरूर मंदिर समूहामधल्या मुख्य मंदिरामधे राम, सीता आणि लक्ष्मण ह्यांच्या मूर्ती आहेत पण त्या नक्कीच नजीकच्या काळामधील आहेत. हे मुळात शिव मंदिर असावे असा अभ्यासकांचा कयास आहे. येथील महत्वाची शिल्पे म्हणजे शिव, पार्वती आणि कर्तिकेय! .पूर्णकलश, डेरेदार खांबांचे तळ, प्रवेशद्वारा भोवतीच्या द्वारशाखा, हे कोरीव कामाचे देखणे नमुने आहेत. मंदिरासमोरील जलाशयाशेजारी अनेक 'आमलकांचे' भग्नावशेष विखुरलेले दिसतात
ह्या मंदिराविषयी साहित्यात अथवा शिलालेखामध्ये काही उल्लेख सापडत नाही . त्यामुळे त्याच्या निर्मितीमागची प्रेरणा किंवा घडवण्याचा काल निश्चित सांगता येत नाही. तरीही तज्ञांच्या मते ह्या मंदिराची कोरीव कामाची शैली ही मुंबई जवळच्या घारापुरी लेण्यांशी साम्य दाखवते.
ह्या सुंदर मंदिराची घडण अपूर्ण राहिली असावी असे म्हणण्याला जागा आहे. त्यातच कांगडामधे १९०५ साली झालेल्या भीषण भूकंपामधे ह्या वास्तुची बरीच पडझड झालेली आहे.
मंदिराच्या डाव्या बाजूने वर गेल्यास, संपूर्ण मंदिरसमूह दृष्टीपथामधे येतो. संध्याकाळच्या कातर धूसर प्रकाशात ह्या मंदिरशिखरांच्या उंच उंच आकृत्या मनाच्या कोपऱ्यात कायमची जागा मिळवून गेल्या!
भारतामधे एकपाषाणी मंदिरांची संख्या तशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. आपण पाहिलेल्या ३ मंदिरांपलीकडे, मध्यप्रदेशात धार जवळ वासवी येथे व धामणेर या ठिकाणी अपूर्ण अवस्थेमधील एक पाषाणी मंदिर रचना सापडतात.
भारतभर सापडणारी लेणी/शैलगृहे ही जरी पाषाणामधे खोदून काढली असली तरीही या मंदिराप्रमाणे ती मूळच्या पहाडा्पासून वेगळी नसल्याने त्यांच्या वास्तुरूपामधे ही परिपूर्णता जाणवत नाही. मुळात छाया प्रकाशाच्या खेळाने वास्तुला जो जिवंतपणा येतो तो गुहा प्रकारांमधे अनुभवत येत नाही. यामुळेच एकपाषाणी मंदिर स्थापत्य हे वैशिष्ठ व सौष्ठव ह्या दोन्ही गुणांमध्ये सरस ठरते .
एकपाषाणी मंदिरांचा हा आसेतुहिमाचल प्रवास भारतीय मंदिर परंपरेमधील त्यांचे महत्वाचे स्थान तर अधोरेखीत करतोच पण त्याचबरोबर त्या शतकांपूर्वींच्या आपल्याच अनोळखी पूर्वजांशी बांधीलकीचा रेशीम धागा ही जोडतो.
मुशाफिरी दिवाळी २०१४ अंकामध्ये पूर्वप्रकाशित
मुशाफिरी दिवाळी २०१४ अंकामध्ये पूर्वप्रकाशित
Comments