करडा आणि पांढरा

सभोवार पसरलेले पांढरे शुभ्र बर्फ. कुठलाच रंग नसलेले आकाश आणि आसमंतात घुसणारे मत्त वाऱ्याचे झोत. प्रत्यक्ष अनुभवताना काहीतरी अद्भुत आणि अगदी बिन ओळखीचे पाहते आहे असेच वाटत गेले. आभळातून हिमकणांची संततधार लागलेली. आधीच जमिनीवर मढलेल्या शुभ्र गालिच्यावर बर्फाचे पांढरे नाजुक थेंब पाहता पाहता मिटून जात होते. हिरवे गवत, काळी माती, नीळे आकाश, ह्या व्याख्याच ह्या हिमवादळाने उधळून लावल्या आहेत. आता रंग फक्त दोनच, एक जमिनीवर आच्छादिलेल्या सर्वव्यापी बर्फाचा पांढरा आणि दुसरा निष्पर्ण झाडाच्या बुंध्याचा करडा.


ह्या बर्फाच्या राज्यात ही झाडे मात्र मान ताठ करुन उभी राहतात. पण फुलांची वस्त्रे काळाने हिसकावुन घेतली आहेत आणि हलकीशी हिमकणांची शाल ही उत्तरेच्या वाऱ्याने उडवून लावली आहे. सदाहरित सूचीपर्णी झाडांवर मात्र आकाशातुन उतरलेले बर्फ तसेच टिकून राहिले आहे. हे दृष्यच काहीतरी वेगळे आहे. पूर्णपणे वेगळ्या निसर्गाच्या साथीने वाढलेल्या माझ्या मनाला हे निसर्गाचे रुप एकाचवेळी सुंदर ही वाटते आणि उदास ही.

आता वाऱ्याचे चांगलाच जोर धरला आहे. मगाशी बर्फातून चालून आले. हातात उचलून पाहिले तर शुभ्र, मऊशार बर्फ जणु हिमरेतीच. कुठे कुठे वाऱ्याच्या मर्जीनुसार लोटले गेलेले आणि उभारलेले बर्फाचे टेकाड. तर कुठे उमटलेल्या, बर्फात खोलवर रुतलेल्या मानवी पाऊलखुणा. जमिनीचा कण आणि कण जिंकणारे हे बर्फाचे आक्रमण निसर्गाचे सर्वात अमोघ शस्त्र आहे हे निश्चित.

उद्या कदाचित सूर्याचे दर्शन होईल, आकाश पुन्हा एकदा स्वच्छ निळेशार होईल. बर्फाचा पाऊस थांबेल. सूर्यकिरण वेगाने पृथ्वीवर झेपावतील. लक्ख प्रकाशाने जग उजळून जाईल आणि जमिनीवरचे धवल हिमकण हिऱ्याची धूळ होऊन वाऱ्याच्या झोतासरशी उधळले जातील. कुठेतरी पाण्यावरचे बर्फ वितळेल. आणि जीवनाचा ओघ पुन्हा सुरु होईल. एखादा पक्षी हळूच कडेच्या हिमनगावर विसावेल आनि लांब कुठेतरी गवताची हिरवी पाती बर्फाआडून सूर्याकडे बघून हसतील.

Comments