सृजन


चंद्र तिमिरी स्वप्न निसटले
पूर्वक्षितिजी प्रभात  रंगे
पहाटवारा हलका हलका
मधुमासाचे पाऊल पडले ।।

लालस कोमल तेजस हिरवी
 नवी नवेली पर्ण पल्लवी
पानोपानी किरणजाल हे
थेंबे थेंबे उन्ह उमटले ।।

वळणावरती झाड  उभे ते
शुष्क फांद्या राकट बुंधा
मोहरले ते आज अचानक
कळ्याफुलांचे हसूच फुटले ।।

आर्त पाखरे साद घालती
 रान रंगले सूरभारले
 नील-सुवर्णी भवतालाच्या
मावळतीला संथ चांदणे ।।

वसंतरंगी घोस फुलांचे
उष्णमाधवी धुंद श्वास हे
दिवस परतले मधुगंधांचे
रात्रीचे आभाळ उजळले ।।

Comments

Popular Posts