वाराणसी-सारनाथ - चिरंतन चैतन्य

गंगेच्या हिरव्या, सोनेरी लाटांवर नाचणारी सूर्यकिरणं, दूरवर दिसतो न दिसतो असा दुसरा किनारा, मधूनच शुभ्र पक्ष्यांचे झेपावणारे थवे, घाट आणि मंदिरांचा मिळून सोनेरी रंगात उजळून निघालेला दृष्यपट, गंगेचा असीम, अथांग प्रवाह आणि त्याची शतकानुशतकांची सहचारी - वाराणसी नगरी. नदी आणि नगरी यांचं अतूट अद्वैत इथे चिरंतन आहे.


 हिमालयात उगम पावून, प्रयागच्या त्रिवेणी संगमानंतर बंगालच्या उपसागराच्या दिशेला जाणार्‍या पूर्ववाहिनी गंगेचा प्रवाह मध्ये काही काळ उत्तरेकडे वळतो. या उत्तरवाहिनी गंगेच्या पश्चिम किनार्‍यावर उगवत्या तेजस्वी सूर्याच्या सन्मुख वसलेली प्राचीन नगरी म्हणजे वाराणसी! उत्तरेला वरूणा आणि दक्षिणेला अस्सी अशा दोन लहानशा नद्या इथे गंगेला येऊन मिळतात. त्यांच्यामधला प्रदेश म्हणजे वाराणसी नगरी.
वेगवेगळ्या कालखंडांमध्ये ही नगरी सुरन्धना, सुदर्शना, रमा, मोलिनी, काशीपुर अशा नावांनीही ओळखली जात असे. बुद्धकालीन विख्यात सोळा महाजनपदामधील काशी जनपदाची राजधानी, संपन्न व बलाढ्य काशीनरेशांची परंपरा जपणारी हीच ती नगरी. उपनिषदं, महाभारत यांपासून पौराणिक वाङ्‌मय, जातक कथा आणि जैन साहित्य यामध्ये वाराणसीचा उल्लेख आढळतो. पाणिनी आणि पतंजली यांच्या ग्रंथांमध्येही वाराणसीचा उल्लेख आहे. इथेच जवळ सारनाथ इथे गौतम बुद्धाने पहिलं प्रवचन दिलं. जैनांचे तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचा जन्म काशीनगरीमधलाच. बौद्ध काळानंतर आधी कोसल व नंतर मगध राजांनी काशीवर राज्य केलं. हुएन त्संग याने सातव्या शतकामध्ये लिहिलेल्या प्रवासवर्णनामध्ये ‘वाराणसी नगरी हे धर्म आणि कला यांचे केंद्रस्थान आहे’ असं म्हटलेलं आहे. याच काशीनगरीमधे कबीराने शेले विणले आणि अजरामर दोहे रचले. गुरु नानक यांचं वास्तव्यही इथेच होतं. इथेच जगन्नाथ पंडिताची विलक्षण प्रतिभा भरारली आणि इथेच तुलसीदासाने अवधीमधे रचना केली रामचरितमानसाची! किमान तीन हजार वर्षांचा इतिहास पाठीशी असणारी ही पुरातन भूमी आणि या सार्‍या काळाच्या प्रवासाची साक्षी ती अखंड प्रवाही गंगा नदी.
परंपरेने वाराणसीला पुण्यक्षेत्र मानलेलं आहे. या नगरीला शिवाच्या कायम वास्तव्याचं वरदान लाभलेलं आहे. वाराणसीला ‘महास्मशान’ असंही म्हटलं जातं. सर्वांना सामावून घेणारा मोक्षप्राप्तीचा सोपान इथे युगानुयुगे उभा आहे. गंगेच्या प्रवाहाला समांतर बांधलेले घाट, घाटांवरची मंदीरं आणि माणसांची दाटी हे वाराणसीचं प्रत्यक्षात उतरलेलं सत्यचित्र.
वाराणसीमध्ये असे सलग ऐंशी घाट आहेत! नदीच्या पाण्यापर्यंत जाणे सोयीचं व सोपं व्हावं म्हणूनच त्यांची रचना केली गेलेली दिसते. सध्याचे दगडामध्ये बांधलेले बरेचसे घाट हे मराठेशाहीनं पुण्यकर्माच्या उद्देशाने बांधले. या घाटांचं, तिथल्या जीवनाच्या लयीचं निरीक्षण करायचं, तर गंगेच्या पात्रामधून नौकानयन करत जाण्याला पर्याय नाही.
आमची काशीयात्रा सुरू झाली दक्षिणेच्या अस्सी घाटावरून. अजूनही कच्च्या मातीच्या असलेल्या या घाटानंतर सुघड पायर्‍यांच्या आणि हवेल्या-इमारतींनी सजलेल्या घाटांची मालिकाच सुरू होते. अस्सी घाटावर दूर दिसणार्‍या रेखीव दुर्गामंदिराच्या शिखराला नमस्कार करून नाव पुढे सरकली. उंच, लाल दगडाच्या भव्य इमारतीचा डोलारा सावरत निवांत बसलेला निरंजनी घाट, त्यापुढे दाक्षिणात्य यात्रेकरूंच्या आणि होड्या-नावांच्या वर्दळीनं गजबजलेला केदार घाट आणि मग पेशव्यांनी बांधलेला स्वछ आणि नेटका राजा घाट! पेशव्यांनी इथे राजा आणि गणेश हे दोन घाट बांधले, हे ऐकून माझ्या पुणेरी मनाला उगाचच छान वाटून गेलं.


यापुढच्या घाटयात्रेमध्ये सामोरे येतात ते देखण्या इमारतींनी लक्ष वेधून घेणारे दिगपतीया आणि दरभंगा हे घाट; त्यानंतर गर्दीने व्यापलेला प्रसिद्ध दशाश्वमेध घाट आणि मग प्रयाग घाट. दशाश्वमेध घाटावरच दररोज संध्याकाळी काशीच्या जगप्रसिद्ध गंगाआरतीचा दिमाखदार सोहळा पार पडतो. हा घाट देखील बाजीराव पेशव्यांनीच इ.स. १७३५मध्ये बांधला. पुराणामध्ये याचं ‘रुद्रसार’ असं एक नाव आढळतं. दिवोदास राजाने इथे दहा अश्वमेध यज्ञ केले, म्हणून त्याचं नाव दशाश्वमेध, अशीही एक कथा आहे! त्यापुढे नक्षीदार बारकाईच्या कामाने नटलेल्या राजस्थानी महालाचा मन-मंदिर घाट, पलीकडे जरासा वर्दळीपासून दूर ललिता घाट, तिथे दूर कोपर्‍यातले नजर वेधून घेणारं नेपाळ नरेशांनी बांधलेलं पॅगोडा पद्धतीचं ललिता मंदिर आणि त्यापुढे सिंदिया घाटावरचं गंगेच्या पाण्यात अर्धंअधिक बुडालेलं, खचलेलं मंदिर, त्याचा वैभवशाली कळस आता कललेला, भंगलेला आणि करूण!
जरा पुढे नदीत उंच बांबूवर तोललेले तरंगते आकाशदिवे दिसतात आणि त्यानंतर येतो मणिकर्णिका घाट. मणिकर्णिका घाटाविषयी, त्याच्या उत्पत्तीविषयी अनेक आख्यायिका आहेत. त्यांमधली एक म्हणजे, शिव-पार्वतीच्या क्रीडेदरम्यान पार्वतीचं एक कर्णफूल इथल्या कुंडामध्ये पडलं; त्याचा शोध युगानुयुगे चालूच आहे. त्यामुळेच बहुधा शिवाची पावलं जणू इथे कायमची रेंगाळलेली आहेत. हे कुंड विष्णूने बांधलं अशी एक पुराणकथा आहे. पण आजच्या जगात मात्र हा घाट म्हणजे अंतिम मोक्षप्राप्तीचा लौकिक उपचार करण्याचं केंद्रस्थान बनलेलं आहे...
डुलत्या नावांमध्ये, घाटावरच्या देवळाच्या ओवर्‍यांमध्ये रचलेली लाकडं; धुराने काळवंडलेले शिल्पजडित मंदिरांचे कळस; कुठे कोणी हुंदका दाबत उभे आणि कोणी अग्नीच्या मदतीने काशीच्या पुण्यभूमीत मोक्षाचं दान मिळवणारे भाग्यवान! प्रेतदहनाची परंपरा खरी हरिश्चंद्र घाटावरची, या घाटावर ती सुरू झाली एकोणिसाव्या शतकामध्ये. कुणा एका व्यापार्याला आपल्या आईचे अंतिम संस्कार करण्यासाठी हरिश्चंद्र घाटावर जागा मिळाली नाही; म्हणून त्यानं मणिकर्णिका घाट गाठला; तेव्हापासून तिथेच अंतिम संस्कार करण्याची पद्धत रूढ झाली अशी एक आख्यायिका सांगितली जाते.
मणिकर्णिकेच्या अंमलातून बाहेर आल्यावर पुढे आपल्या दृष्टीक्षेपात येतात पंचगंगा घाटाच्या उतरत जाणार्‍या पायर्‍या. इथेच बसून जगन्नाथ पंडीताने गंगालहरीचा एक-एक श्लोक म्हटला होता. ते आठवल्यावर आपल्या डोळ्यांसमोर जगन्नाथ पंडिताला मुक्ती देण्याच्या ओढीने एक-एक पायरी वर चढणार्‍या गंगेच्या लाटाही तरळून जातात. नदीला पाणी कमी असतं तेव्हा घाटाच्या खालच्या बाजूला तापसी, योगी बसू शकतील असे घाटातच कोरलेले कोनाडेही दिसतात. जरा नजर वर केली, की दिसतात आलमगीर मशिदीचे मिनार.
औरंगजेबाच्या आसुरी महत्त्वाकांक्षेने इथल्या भव्य वेणीमाधव मंदिराचा विध्वंस करून ही मशीद उभारली असली, तरी समाजमनाने या मशिदीला ‘बेनी माधव का धरेरा’ असं बनारसी नाव बहाल करून मंदिराच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत. तीन-साडेतीन किमीचं अंतर असलेल्या आमच्या घाटयात्रेचा शेवट उत्तरेकडील राजघाटापाशी झाला. राजघाटापलिकडेही वरुणासंगम आणि आदीकेशव घाट आहेत.




 राजघाटाजवळ नदीच्या दोन्ही बाजूंना जोडणारा मदनमोहन मालवीय सेतू आहे आणि त्याही पलीकडे आहे उत्खननातून प्राप्त झालेला काशीच्या प्राचीन अस्तित्त्वाचा पुरावा. या उत्खननात सापडलेल्या पुरातत्त्वीय गोष्टींच्या आधारे काशीत किमान इसवी सनापूर्वी आठव्या शतकापासून वस्ती होती असं अनुमान निघतं. इथे मौर्य, कुशाण कालापासून ते गुप्तकाळापर्यंतचे अवशेष सापडतात. काशी नगरीची मूळ वस्ती याच ठिकाणी होती. पुढील काळात शहराची वाढ दक्षिणेच्या बाजूस झालेली दिसते.


मदनमोहन मालवीय सेतूलगतच कोलकाता आणि दिल्ली यांना जोडणारा अखंड वर्दळीचा मुघलकालीन शेरशहा सुरी मार्गही वाहतो. पण आपण त्या रहदारीच्या, गाड्या-माणसांच्या कोलाहलापासून दूर, पुन्हा एकदा राजघाटाच्या विस्तृत पायर्‍या उतरून गंगेच्या शांत, शीतल प्रवाहाकडे जाऊ या...
काशी हे तीर्थक्षेत्र तर आहेच. त्याचबरोबर व्यापार आणि शिक्षणाचंही ते पूर्वापार महत्त्वाचं केंद्र होतं आणि आजही आहे. आजच्या तलम, अती सुंदर अश्या सुप्रसिद्ध बनारसी साड्या इथे पूर्वीपासून विणल्या जात असत. हे शहर प्राचीन व्यापारी मार्गावरचं एक महत्त्वाचं ठिकाण होतं. इथून तक्षशीला ते श्रावस्तीपर्यंत व्यापार होत असल्याचे उल्लेख आहेत. आजही वैदिक शिक्षणात काशीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर भारतीय दर्शनं म्हणजे तत्त्वज्ञान आणि संगीत यासाठी काशीचे विद्वान व पाठशाळा दोन्ही प्राचीन काळापासून आजतागायत नावाजल्या गेलेल्या आहेत.
शिक्षण, व्यापार यांचबरोबर धार्मिक दृष्टीकोनातूनही काशीला कायमच महत्त्व मिळालेलं आहे. शिवशंकराचं कायमस्वरूपी वास्तव्य असलेली ही भूमी अती पवित्र समजली गेली आहे. त्यामुळे इथे मंदिरांची कमतरता नाही, त्यातही शिवमंदिरं तर इथे मुबलक प्रमाणात सापडतील. पण या सर्व मंदिरांचा मुकुटमणी आहे तो म्हणजे बारा ज्योतीर्लिंगांपैकी एक असलेलं काशी विश्वनाथ मंदीर. हे मंदिर मुसलमानी आक्रमणांमुळे अनेकदा विध्वंस पावलं; भाविकांच्या श्रद्धेपोटी पुन्हा पुन्हा उभारलंही गेलं. सध्याचं मंदिर हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या प्रयत्नानं उभं राहिलेलं आहे.
मंदिर तसं बेताच्या आकाराचं आहे. मंदिराच्या दिशेनं निघालं, की महाराजा रणजीतसिंहाने दिलेले सोन्याचे कळस दूरूनच चमकतात आणि आपण विश्वनाथगल्लीच्या अरुंद आणि अस्वच्छ बोळकांडीमधून वाट काढत मंदिरासमोरच्या लांब रांगेमध्ये आपसूक उभे राहतो. मूळ मंदिरामध्ये काशी विश्वनाथाचं ‘जलोदर’ म्हणजे पाण्यामध्ये अर्धं बुडालेलं शिवलिंग आहे. पानाफुलांनी, हारांनी झाकून गेलेल्या त्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी श्रद्धाळूंची उडालेली झुंबड, दंडुक्याने त्यांना हुसकून लावत गर्दीचं नियंत्रण करणारे पोलिस, मंत्र पुटपुटत शिवलिंगाभोवती कोंडाळं करून बसलेले पंडे पुजारी, शुभ्र संगमरवरी दगडांच्या कलाकुसरीने नटलेल्या भिंती आणि शिखरं, त्यावर बसून पिटक्या डोळ्यांनी येणार्‍या-जाणार्‍यांवर बारीक लक्ष ठेवून असणारे हनुमानाचे काशीज वंशज, विश्वनाथ गल्लीच्या दोन्ही बाजूंची प्रसाद-हार-फुलांची दुकानं, त्यामुळे अर्थव्यवस्थेला लागलेला श्रद्धेचा हातभार आणि देवळाच्या एका कोपर्‍यात मनन आणि पठण करणारे काही शुभ्र-नतमस्तक भाविक... अश्या इथल्या अनेक प्रतिमा मनाच्या कवाडामध्ये साठून राहिलेल्या आहेत.
 काशी विश्वनाथ मंदिराला लागूनच ‘ग्यानवापी मशीद’ आहे, जी अर्थातच मंदिराच्या पूर्वीच्या मोठ्या आवाराचा एक भाग आहे. ‘ग्यानवापी’ हे काशी विश्वनाथ मंदिराच्या आवारातील विहिरीचं नाव आहे. आता ही विहीर मशिदीच्या आवारात गेल्याने मशिदीचं नामकरणही तसंच झालं आहे. त्या अस्वस्थ इतिहासाची हटकून आठवण यावी असंच या दोन्ही वास्तूंचं स्थळ-सानिध्य आहे. अशा पार्श्वभूमीवर, विश्वनाथाच्या गाभार्यात गुंजलेले बिस्मिल्लाखानांच्या सनईचे सूर आजही मनाला आश्वस्त करतात.
वाराणसीच्या गल्ल्या हा एक प्रबंधाचा विषय होऊ शकतो! असंख्य गल्लीबोळ, तेही अरुंद, त्यात माणसांची, गाईगुरांची, मोटारसायकलींची, बाजाराची गर्दी; बटाट्याचे पापड, लोणची, बनारसी साड्या, तांब्या-पितळेची भांडी, काचेचे देखणे मणी आणि अजून काय काय विक्रीला ठेवलेलं! मिठाई, पान, मलाई, रबडी यांचे ठेले, पूजेच्या फुलांचे अन्‌ हारांचे कोपरे; घुगनी चाट, ताजे तळलेले गुलाबजाम परोसणार्‍या छोट्या-छोट्या टपर्‍या, नदीच्या जवळच्या गल्ल्यांमध्ये गिचमिड करून उभी राहिलेली विश्रामगृहं, कुठे निर्माल्य भरून वाहणारी उघडी गटारं, तर कुठे उदबत्तीच्या वासाने आणि श्लोकपठणाने नादमय झालेल्या ओवर्‍या!
वाराणसीच्या मोठ्या रस्त्यांवरही हे माणसांचं, वाहनांचं, भाषांचं, वासांचं आणि नादांचं संमेलन भरलेलं आहेच. भारताच्या कानाकोपर्‍यांतून आलेली विविध वयांची, रंगांची, बोलींची माणसं, बायका, मुलं, परदेशातून या अनोख्या शहराच्या ओढीने आलेले प्रवासी, भस्मचर्चित, जटाधारी साधू-संन्यासी, अगदी सायकलरिक्षापासून ते मर्सिडीज गाडीपर्यंत वाहनांची हीऽऽ गर्दी, दुतर्फा गच्च भरलेली बाजारपेठ, एखाद्या पडक्या हवेलीच्या नक्षीदार खांबाला लगटून उभी राहिलेली कुठली तरी कपड्यांची आधुनिक, चमकदार शोरूम...
 तशी तर कालयंत्रामधून अनेक काल एकाच वेळी अनुभवावेत असं वाटायला लावणारी अनेक शहरं भारतात आहेत; पण वाराणसीमध्ये हा दुभंग आणि संगम, दोन्हीही सर्वात तीव्र आहे!
 संध्याकाळ होता होता विजेच्या दिव्यांनी प्रकाशू लागलेली ही प्राचीन नगरी, जिच्या नावाचा अर्थच ‘प्रकाशमयी’ असा आहे, ती आपल्याला घेऊन जाते दशाश्वमेध घाटापाशी! उतरत्या उन्हाबरोबर आणि संध्येच्या चाहुलीनिशी घाटाच्या पायर्‍यांवर पावलांची गर्दी हलके हलके जमा होऊ लागते. बघता बघता लगबग वाढते, पण कुठेच कोलाहल नसतो. आलेली माणसं जागा दिसेल तिथे बसून घेतात; कोणी उभे राहतात, तर काही नदीच्या पात्रातल्या नावांवर स्वार होतात...लवकरच सुरू होणार्‍या आरतीमधे सहभागी होण्यासाठी.

दशाश्वमेध घाटावरील आरतीचा हा सोहळा बघण्या आणि अनुभवण्यासारखा, दोन्ही असतो. आरतीची वेळ झाली की घंटांचा प्रचंड नाद सुरू होतो. धुपाचा दरवळ नाकाला जाणवतो. कुणीतरी आपल्याही कपाळाला टिका लावतो. चौथर्‍यावर नदीच्या सामोरे उभे पुजारी, त्यांच्या हातात अनेक दिव्यांनी तेजाळलेली निरांजनं; ताला-सु्राच्या लयीत ते ती निरांजनं झोकाने फिरवतात; आरतीचा गजर सुरू होतो; मान डोलू लागते; भक्तीरसाच्या पाऊसझडीमध्ये आपण कोरडे राहूच शकत नाही. अजून शेकडो दिवे नदीच्या प्रवाहाला अर्पण केले जातात आणि या बिंब-प्रतीबिंबांना सामावून घेत अक्षय प्रवाहते गंगा नदी. काळाची गती इथे नक्कीच मंदावली आहे.


 वाराणसीची ओळख फक्त मंदिरं, घाट आणि गंगा इथवरच मर्यादित ठेवता येत नाही. वाराणसी शहर गंगेच्या पश्चिम घाटावर वसलेलं आहे, तर पूर्व घाटावर आहे ‘रामनगर’, काशीच्या राजघराण्याचं पारंपरिक राजधानीचं ठिकाण आणि सध्याचं निवासस्थान सुद्धा. दक्षिण वाराणसीच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून गंगा पार करून आपण रामनगरमध्ये दाखल होतो. कोरीव प्रवेशद्वारातून आत गेल्यावर १७-१८व्या शतकात बांधलेली मुघल वास्तुशैलीचा छाप असणारी राजमहालाची भव्य इमारत नजरेस पडते. फिकट पिवळ्या व हिरव्या रंगांचा वापर केलेला हा राजवाडा नक्षीदार झरोके आणि सज्जे यांनी नटलेला आहे. राजमहालाची एक बाजू वस्तूसंग्रहालयामध्ये रूपांतरित केलेली आहे, तर गंगेच्या बाजूचा दुसरा भाग म्हणजे काशीच्या राजांचं पूर्वापार निवासस्थान आहे, जे अजूनही वापरात आहे.
बनारस हिंदू विश्वविद्यालय ही आधुनिक वाराणसीची अजून एक तेजस्वी ओळख. भारतरत्न पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रयत्नाने १९२०मध्ये सुरू झालेली ही शिक्षणगंगा अविरत आणि अव्याहत वाहते आहे. हा परिसर विलक्षण रेखीव आहे. छत्र्या आणि घुमटांचे स्थापत्य असलेल्या भव्य इमारतींमध्ये संस्कृतपासून जैवतांत्रिकी ते अभियांत्रिकीपर्यंत विविध आधुनिक ज्ञानशाखांचा शोध आणि बोध चालू आहे;
शिस्तशीर आखलेले रस्ते, खूप हिरवाई आणि डेरेदार वृक्षांनी झाकलेल्या गल्ल्या, सळसळत्या तरुणाईची नाक्यावरच्या चहा-सामोशाच्या टपरीवर उसळलेली गर्दी आणि पुस्तकं बाळगत लगबगीने चाललेले शिक्षकगण! नदी काठावरची काशी आणि ही काशी यांत केवढंतरी अंतर आहे.
 इथेच आहे भारतीय कलाभवन, विश्वविद्यालयाचा एक महत्त्वाचा घटक; इतिहासप्रेमी, कलाप्रेमी आणि अभ्यासक यांच्या दृष्टीने एक अती महत्त्वाचा थांबा. भारतीय कलाभवन हे नुसतं वस्तुसंग्रहालय नाही. भारतीय शिल्प-चित्र-वस्त्रकलांचा आणि वाराणसीच्या ऐतिहासिक अस्तित्त्वाचा फार मोठा वारसा जतन करणारी ही बनारस हिंदू विश्वविद्यालयाची मुकुटमणी संस्था आहे.
सिंधूसंस्कृतीची द्योतक अशी काही दुर्मिळ मातीची भांडी, उत्कृष्ट शिल्पकामाचा नमुना असणारा नृत्य-गणेश, गौतम बुद्धाची तप:साधनेने अतीकृश झालेली गांधार शैलीची मूर्ती, कांगडा आणि राजपूत शैलीतली राधा-कृष्णांची देखणी कथाचित्रं आणि सतराव्या शतकात विणलेल्या बनारसी रेशमाचं वस्त्र अशा विविधरंगी आणि विविधढंगी वस्तूंनी या वास्तूला महत्ता आणि मान्यता दोन्ही बहाल केलेलं आहे. या शिल्पांबरोबरच नजीकच्या भूतकाळातील वाराणसीचं हृद्य दर्शन घडवणार्‍या रेखाचित्रांचं दालन पण फार रोचक आहे.
जेम्स प्रिन्सेप हा ब्राह्मी लिपीचं प्रथम वाचन करणारा विद्वान म्हणून आपल्याला माहित आहे. पण प्रिन्सेपने आपल्या अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात एकीकडे टांकसाळीत काम करतानाच दुसरीकडे इतिहासकार, वास्तुज्ञ आणि चित्रकार म्हणूनही खूप भरीव काम केलेलं आहे, हे तिथे गेल्यावर कळतं. या दालनात प्रिन्सेप आणि इतर ब्रिटीशराजकालीन चित्रकारांनी रेखाटलेली एकोणिसाव्या शतकातील घाटांची, राजवाड्यांची, नदीची देखणी रेखाचित्रं आहेत, जी मोठी रम्य आहेत.
वाराणसीमध्ये या प्राचीन शहराची संस्कृती जतन करणार्‍या आणि संवर्धन करणार्‍या संस्था कमी नाहीत. अस्सी घाटावरील ज्ञान-प्रवाह ते राजाघाटावरील कृष्णमूर्ती फाऊण्डेशन - गंगेच्या निरामय प्रवाहाचं सान्निध्य व आशीर्वाद सगळ्यांनाच मिळाले आहेत.


वाराणसीपासून काही अंतरावर आहे सारनाथ. प्राचीन काळी इसीपत्तन, शारंगनाथ, मृगदाव या नावांनी ओळखलं जाणारं हे गाव गौतम बुद्धाच्या वास्तव्याने पवित्र झालेलं आहे. घोर तप आणि शारिरीक क्लेशानंतर सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती झाली. सारनाथ इथे त्याने सर्वप्रथम धर्मपरिवर्तन म्हणजे धर्माचं चक्र फिरवलं; अर्थात पहिलं प्रवचन केलं. सध्या सारनाथमध्ये अनेक नवे-जुने स्तूप उभे आहेत. मौर्यकालीन धमेक्ख स्तूप, धर्मराजिका स्तूप ते मध्ययुगीन चौखंडी स्तूप, त्याबरोबरच जपान, थायलंड वगैरे देशांनी कृतज्ञतेने बांधलेले नवयुगीन स्तूप !


सारनाथ इथे आपला एक फार मोठा राष्ट्रीय ठेवा आहे, जो इथल्या प्रसिद्ध वस्तूसंग्रहालयात पहायला मिळतो. सुंदर फुलांच्या बगीच्यामधून आपण वस्तूसंग्रहालयामध्ये प्रवेश करतो. प्रवेश केल्याक्षणी समोर दिसतो भव्य आणि विलक्षण असा सिंहस्तंभ. स्वतंत्र भारताचं राष्ट्रीय प्रतीक असणारा चार सिंहाच्या पूर्णाकृती देखण्या प्रतिमा असणारा हा स्तंभ अतिशय प्रभावशाली दिसतो. वरती शौर्याचे प्रतीक असणारे रेखीव आयाळीचे सिंह, त्याखाली गोलाकार व्यासपीठ आणि त्याच्या चारही बाजूंना कोरलेल्या हत्ती, घोडा, बैल आणि सिंह यांच्या चार प्रतिमा. बौद्ध साहित्यामध्ये या प्रतिमांना महत्त्वाचं स्थान आहे. या सर्व प्रतिमा व खांब म्हणजे मौर्यकालीन झळाळीयुक्त कलेचं मोठं सुंदर उदाहरण आहे.
शिल्पकलेच्या दृष्टीने इथले सिंह महाबलीपुरमच्या पल्लव सिंहांच्या प्रतिमेपेक्षा वेगळे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. मौर्यकालामधे इराण, ग्रीस यांच्याशी आपला संपर्क असल्याने शिल्पकलेवर तो प्रभावही दिसून येतो. पूर्वी हा स्तंभ धर्मराजीका स्तूपाच्या परिसरामधे उभा होता. कालौघात स्तंभाचं शीर्ष निखळून पडलं. वस्तूसंग्रहालयात हे शीर्षच पहायला मिळतं. स्तंभाचा खालचा उर्वरित भाग आजही स्तूपाच्या परिसरात उभा आहे. त्यावर सम्राट अशोकाचा लेखही कोरलेला आहे. याच वस्तूसंग्रहालयामधे मूळ अशोकचक्रही बघायला मिळतं. आश्चर्य असं, की या चक्राला बत्तीस आरे आहेत, तर आपल्या राष्ट्रध्वजावर विराजमान झालेल्या चक्रात मात्र चोवीस आरे आहेत.
वाराणसी आणि सारनाथ या दोन स्थळांचं इतिहासामध्ये स्थान फार वरचं आहे. वाराणसीमध्ये ईश्वराच्या अस्तित्वाचं आश्वासन आहे; तर सारनाथमध्ये बुद्धदेवाचं इतिहासाच्या साक्षीने प्रत्यक्ष वास्तव्यच होतं. पूर्वांचलाच्या सुपीक आणि सुफळ भूमीच्या या अलौकिक वैभवाचा वारसा या डोळ्यांनी आपण बघतो आहोत आणि या जन्मी अनुभवतो आहोत याहून भाग्य ते काय?

कुणी वाराणसीला ‘शाश्वत नगर’ म्हणालं आहे. इथली घाण आणि कचरा कुणाला सहन करण्यापलीकडे वाटला आहे. कुणी साधूंच्या जटा आणि कर्मकांडाच्या आहुत्या यांमध्येच गुंतून गेलं आहे. वाराणसी या सगळ्या पलीकडे आहे; गंगाजलानं रंगवलेला हा संस्कृतीचा चालता बोलता जीवन-पट आहे. त्या पवित्र आणि निर्मल गंगाजलाच्या प्रवाहाची एक धार आपल्या मनातही सतत प्रवाही राहो हीच सदिच्छा !

मुशाफिरी दिवाळी २०१५ अंकामध्ये पूर्वप्रकाशित

Comments

Popular Posts