न कळणार्‍या गोष्टी

आज काल बऱ्याच गोष्टींचे अर्थच कळेनासे झाले आहेत. आपली आणि लोकांची आवड यात एवढा फरक कधी पडायला लागला? आपल्याला साधारण "वाह्यात" वाटणारे वागणे हे "हिप" किंवा "कूल" आहे असे चक्क छापून कसे येते आहे?

आत बघा मी एक यादीच तयार केली आहे
१. राखी सावंतच्या स्वयंवराला येणारे इच्छुक नवरे आणि त्यांचे कुटुंबीय - सगळ्या जगाकडून हसू करून घ्यावे असे त्यांना का वाटावे? राखीचे चे मुरके, रडणे किंवा रागावणे त्यांना लोभसवाणे वाटले की काय! आणि सावंत बाईंचे लाजऱ्या भारतीय वधूचे रूप, (कलात्मक पद्धतीने अंग उघडे टाकले असले तरी) आपण खरे आहे असेच मानले ना. आता सगळ्याचे उत्तर चॅनेल साठी टीआरपी आणि भाग घेणाऱ्यांसाठी पैसे आणि प्रसिद्धी आहे असे समजून घेतले की झाले! पण खरंच ही प्रसिद्धी हवी आहे का खूप जणांना?
२. बऱ्याच वाहिन्यांवर असणारे "दादागिरी", "रोडीज" किंवा "स्प्लिटस्व्हीला" सारखे सत्याचे असत्य खेळ. एकमेकांना वाट्टेल तसे बोलावे, वाट्टेल तसे वागावे, कट कारस्थाने करावी, दुसऱ्याचे पाय ओढावेत, अशा सर्व गुणांना उत्तेजन देणारे कार्यक्रम, त्यात भाग घेणे म्हणजे परम भाग्य! निडर, शूर वगैरे स्वत:ला समजावे व प्रेक्षकांना तसे बजावून सांगावे. पण आपण बापडे प्रेक्षक.. आपल्याला ते तसे जबरदस्त न वाटता मूर्ख वाटले तरी आपल्याला विचारतो कोण? भाग घेणारे एका बाजूला तर संचलन करणारे तर विशेषच. ती कोण सोनाली म्हणे "बिच" आणि तिचे कर्तृत्व काय तर घालून पाडून बोलणे.. वर ही कुप्रसिद्धी हेच कौतुक.. अशा आपल्या व्याख्या बदलल्या कधी? बेमुर्वत आणि बेफाम बोलणे म्हणजे करमणूक असे त्यांना वाटते... पण आपल्याला?
३. आपले सिनेमा सितारे हिंदी सिनेमात काम करतात पण हिंदी बोलत नाहीत, भारतीय आहेत पण भारतीय दिसत नाहीत, यांना आवडते कॅव्हीयर आणि यांची असते चीज आणि वाइन पार्टी! यांच्या लकबी, वागण्या बोलण्याची पद्धत, काही काही म्हणून भारतीय दिसू द्यायचे नाही असा यांचा हट्ट असतो. असे का झाले आहे आपले?
४. सभ्यता हद्दपार - आजच्या सिनेमातील दृष्ये, बक्षीस सोहळे संचलन करणाऱ्यांचे बोलणे या सगळ्यातून सभ्यता निघून चालली आहे. अनेक चित्रपटात गरज नसताना टॉयलेट मधली दृष्ये, एकूणच नैसर्गिक विधी समोर ठेवून केलेले विनोद यांची गर्दी झालेली दिसते. अंग उघडे टाकण्याविषयी तर न बोललेलेच बरे. शरीराचा बराचसा भाग उघडा ठेवणारे कपडे घालताना आपण नक्की काय मिळवू पाहतो आहोत? आधुनिकता, मुक्ती की केवळ पैसा आणि प्रसिद्धीच्या स्पर्धेत आपण मागे राहू नये म्हणून केलेली तडजोड?
५. वृत्त वाहिनी- हे जरी गुणी बाळ असले तरी तेही बरेच अवगुण शिकले आहे थोड्याच वेळात.. बऱ्याच वाहिन्यांवर सर्वाधिक जोर असतो तो सिनेमा केंद्रित बातम्यांचा, मग त्यात ऐश्वर्याचा फ्लू, सलमानची साडी नाहीतर कोणतरी पायल रोहटगीचा खुलासा असे काहीही केवळ फालतू असे असू शकते. मुलाखत घेणाऱ्याकडे विषयाचे पुरेसे द्य्नान असावे अशी अपेक्षा तर ठेवायचीच नाही. बर सिनेमाविषयी कार्यक्रम हे फक्त वर्तमानाशी निगडित, भूतकाल पूर्ण विसरून जायचा. रणबीर कपूर उगवता तारा, म्हणून ऋषी कपूर तेवढा आठवायचा, सैफचा सिनेमा आला की शर्मीला टागोर आठवायची. पण ज्यांचे आत्ताच्या जगताशी बंध नाहीत त्यांना मात्र पूर्ण विसरायचे. थोडक्यात, दर्जा पेक्षा खळबळ जास्त महत्त्वाची. आपण प्रेक्षक इतके मठ्ठ आणि फक्त वरवरच्या बातम्यांचे भुकेले आहोत का हो?

बरं कसे आहे की हे सगळे नवीन विचार आणि आचार आणि आपले ते जुने टाकाऊ, संकुचित विचार असे म्हणायची पण सोय नाही. कारण हा आमचाही काळ आहे. फरक आहे तो दृष्टिकोनामध्ये. मला खरंच आश्चर्य वाटते, कुठे गेली आपली शिकवण.. संयम ठेव, विवेकाने वाग, खरे बोल, कशाचाही अतिरेक करू नको, जीवन जग, हव्यास सोड, सभ्यता, शुचिता, सुशीलता ह्या सगळ्या गोष्टी, जगण्याचे तंत्र जमवून देणारी भारतीय तत्वद्य्नानाची बैठक, कुठे गेली? हा हक्काचा वारसा उधळून देऊन आपण आपले हे काय करून घेतले आहे??

Comments

Popular Posts